बुधवार, १० मे, २०१७

पुन्हा जडे जीव जगावर




लाख तुझे ऋण मजवर
झालीस तू मेहरनजर  
मानू कितीदा तुझे आभार
शब्दाविन मी तुझ्यासमोर

त्याच रोजच्या मरणात मी
होतो चालत विना कारण
त्याच व्यथा अन कथातून
वाहत होते उगाच जीवन

आल्हादक तू उषा होवून
जाळत गेली गर्द अंधार
पुन्हा दिसे सुंदर जीवन  
पुन्हा जडे जीव जगावर  

तुझ्या पथी जीव अंथरून
वाटे उगा पडून राहावे
तुझ्या पावुला उरी झेलून  
हर पदी मी चुंबून घ्यावे

असे क्षण कुण्या जीवनात
क्वचित कधीतरी येतात
कृपावंत ते होवून धन्य  
जीवन जगुनिया जातात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


अदमास !!

  

अदमास !!


"हसून टाळतेस का ?
वळून हसतेस का ?"
असे विचारावे तुला 
कितीदा वाटले होते 
पण तुझ्या चपलांचे 
भय सदोदित होते 

"रस्त्यात थांबतेस का ?
बहाणे करतेस का ?,"
असे वाटणे बहुदा
माझाच भ्रम होता 
मुंगेरीलाल स्वप्नात 
सदैव मश्गुल होता 

"हृदयात येतेस का ?
जीवास छळतेस का ?"
स्वप्नांचिया वाटेवर 
टोलनाका नसतो 
समजून होतो तरी 
बळे विचारात होतो 

,,"माझी तू होशील का ?
जीवनी येशील का ?"
खडा टाकून उगाच
अदमास घेत होतो
पळाया बूट आधीच
घालून बसलो होतो


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ९ मे, २०१७

एकच मागणे



एकच मागणे  
*********

एकच मागणे  
तुजला दयाळा
तुझिया पदाला  
ठाव द्यावा ||

सरोत प्रार्थना
अवघ्या कृपाळा  
जाणावा जिव्हाळा
पदोपदी ||

नको घेणे देणे
नको येणे जाणे
प्रेमात जगणे
घडो तुझ्या ||

नको प्राणायाम
नको जप ध्यान
जगण्या कारण
भक्ती व्हावे ||

दत्ता अवधूता
तुझा तूच दाता
म्हणून विक्रांता
आस मोठी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




सोमवार, ८ मे, २०१७

वेडेपणा


वेडेपणा
******
वेडेपणा माझ्यातला
मज येतसे दिसून 
गाठ कुठल्या जन्माची 
काही येतसे कळून
जन्म जन्मात हिंडता 
कधी दुरावलो कुठे 
असे भेटल्या वरती 
वाट पाऊलात अडे
पुन्हा भेटलो अवेळी
भेट राहिली अधुरी 
नव्या अतृप्त जन्माची
कडी आणिक जुळली
आता सुटावी बंधने 
मन मनात गुंतून 
ऋण कालचे जीवाचे 
जरा जाऊ दे फिटून
तुझे हिशेब कसले 
मज कळेना अजून 
कर आतातरी सौदा 
जन्म जाऊ दे वाहून


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ७ मे, २०१७

उलटून ऋतू गेले




उलटून ऋतू गेले
उलटून गेल्या रात्री
विझलेत स्वप्न सारी
अंधार दाटला नेत्री
  
आता न धमन्यात   
या वाहते मुळी रक्त
आता स्पर्श विसरून
गेली आहेत ही गात्र    

हे ओझेच प्राक्तनाचे   
घेवून वाहतो जन्म
उरला न देह आता
नुरलेच मुळी मन

हा गंध लेवून देही
कागदी फुलांचा रंग   
मिरवितो काही जगी  
चोरून विटले अंग     

उगाच जगणे होते
आता उगाच मरणे
स्मरूनी तया स्मृतींना
आता निरर्थ म्हणणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे








  

शनिवार, ६ मे, २०१७

इवल्याश्या प्रेमासाठी


इवल्याश्या प्रेमासाठी
धडपडे मन
कुणीतरी असावे रे
सोबती सजन

प्रेम माझे तुझ्यावर
शब्दाला आतुर
काळजात उमटावे
उगाच काहूर

नाहीतर ओढायचे
जगण्याचे प्रेत
रोज रोज जाळायचे
जीवनाचे बेत

पाठी पोटी ओठी सदा
यावी आठवण
चोचीसाठी चोच एक
जमा कणकण

एवढेच जीवना दे
एक वरदान
कुण्या प्रिय मांडीवर
जावे माझे प्राण

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ५ मे, २०१७

कृपेचा सावळा


*************


कृपेचा सावळा
ओघळला पार्था
ऐकीयली कथा
तुझी फार ।।


देवा तू लबाड
पाहतो वशिला
म्हणुनी भावाला
देसी सारे ।।


चालावा बरवा
संसार भद्रेचा
म्हणुनी पतीचा
मान राखी ।।


अथवा पुळका
मित्राच्या प्रेमाचा
नशीब सख्ख्याचा
लाभ त्याला।।


आम्ही तो बापुडे
गोकुळीचे वेडे
तुवा वेडे कोडे
भजियले ।।


बहुदा गावंढे
समजून खुळे
तोंडाशी पुसले
प्रीती पाने ।।


फिरतो जन्मात
कळल्यावाचून
आग पेटवून
हृदयात ।।


कधीतरी येवो
तुला आठवण
जावो हे सरोन
स्वप्न दृष्य ।।


विक्रांत व्याकुळ
अंतरात टाहो
जीवनास लाहो
स्पर्श तुझा ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...