रविवार, ७ मे, २०१७

उलटून ऋतू गेले




उलटून ऋतू गेले
उलटून गेल्या रात्री
विझलेत स्वप्न सारी
अंधार दाटला नेत्री
  
आता न धमन्यात   
या वाहते मुळी रक्त
आता स्पर्श विसरून
गेली आहेत ही गात्र    

हे ओझेच प्राक्तनाचे   
घेवून वाहतो जन्म
उरला न देह आता
नुरलेच मुळी मन

हा गंध लेवून देही
कागदी फुलांचा रंग   
मिरवितो काही जगी  
चोरून विटले अंग     

उगाच जगणे होते
आता उगाच मरणे
स्मरूनी तया स्मृतींना
आता निरर्थ म्हणणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे








  

शनिवार, ६ मे, २०१७

इवल्याश्या प्रेमासाठी


इवल्याश्या प्रेमासाठी
धडपडे मन
कुणीतरी असावे रे
सोबती सजन

प्रेम माझे तुझ्यावर
शब्दाला आतुर
काळजात उमटावे
उगाच काहूर

नाहीतर ओढायचे
जगण्याचे प्रेत
रोज रोज जाळायचे
जीवनाचे बेत

पाठी पोटी ओठी सदा
यावी आठवण
चोचीसाठी चोच एक
जमा कणकण

एवढेच जीवना दे
एक वरदान
कुण्या प्रिय मांडीवर
जावे माझे प्राण

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ५ मे, २०१७

कृपेचा सावळा


*************


कृपेचा सावळा
ओघळला पार्था
ऐकीयली कथा
तुझी फार ।।


देवा तू लबाड
पाहतो वशिला
म्हणुनी भावाला
देसी सारे ।।


चालावा बरवा
संसार भद्रेचा
म्हणुनी पतीचा
मान राखी ।।


अथवा पुळका
मित्राच्या प्रेमाचा
नशीब सख्ख्याचा
लाभ त्याला।।


आम्ही तो बापुडे
गोकुळीचे वेडे
तुवा वेडे कोडे
भजियले ।।


बहुदा गावंढे
समजून खुळे
तोंडाशी पुसले
प्रीती पाने ।।


फिरतो जन्मात
कळल्यावाचून
आग पेटवून
हृदयात ।।


कधीतरी येवो
तुला आठवण
जावो हे सरोन
स्वप्न दृष्य ।।


विक्रांत व्याकुळ
अंतरात टाहो
जीवनास लाहो
स्पर्श तुझा ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, ४ मे, २०१७

दत्त नामाविण





दत्त नामाविण
अन्य ना साधन
दत्त प्रेमाविण
काज काही ||

रुजविले प्रेम
माझ्या हृदयात
दत्त कृपावंत  
होवूनिया ||

दत्त पान फुली  
वृक्ष मी जाहलो
सर्वांगी फुललो
स्वानंदाने ||

आता उन वारा
त्याचाच तो सारा
जाणतो जिव्हाळा
कणोकणी ||

नामाची राखण
करी रुपावीन
आषाढ होवून
तृप्त करी ||

विक्रांत भाविका
विसावतो काही
शब्द सावूली ही
देवूनिया  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने




वाटले थोडे




थवे इथे उजेडाचे असावे वाटले थोडे 
क्षण काही प्रकाशाचे जगावे वाटले थोडे ।।

भोवती अंधार दाट वाट हरवून गेली 
उजेडात चांदण्याच्या चालावे वाटले थोडे।।

तसे तर नाते इथे कधी घटलेच नाही 
घेऊन हातात हात बोलावे वाटले थोडे ।।

भेटलीस युगे जाता दोन तीरावरी जन्म
होडी घेऊनी कुठली तरावे वाटले थोडे ।।

मातीतले जीणे माझे मातीत या मरणे
तृण होऊनी इथला हसावे वाटले थोडे ।।

हरलो हजार वेळा फासे उलटेच सदा 
तरीही शतदा इथे खेळावे वाटले थोडे ।।

बेवफा पाहुनी जग दाटलेले दुःख जरी 
जुलमी डोळ्यात कुण्या डुबावे वाटले थोडे ।।

ज्ञानदेवा हाक माझी अजुनी भरीव नाही
आळंदीत मग तुझ्या  मरावे वाटले थोडे ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


बुधवार, ३ मे, २०१७

एक जगण्याचे नाटक



एक जगण्याचे नाटक

जीवनाच्या वाटेवर चाल चालतांना
दिवसांची वाळू हातून निसटतांना
तिला उमजले हळू हळू
अरे आपण चालतोय खरं
पण ही वाट आपली नाही           
आणि त्या वाटेवर चालणारा ही !
हे उमजताच
खरतर ती थोडी घाबरली
थोडी गडबडली
अन सारे यत्न पणाला लावले तिने  
त्या वाटेवरच मन गुतवायला
नव्या आडव्या आलेल्या वाटेतून मन काढायला
पण शक्य होईना
मग तिने सोबत्याच्या हात घट्ट ठरला
अन घेवून जावू लागली त्याला
त्या नवीन मार्गावर
जिथे होती तिची पाखरे
तिची फुले अन तिच्या वेली
तिचीच गाणी गाणारी झाडे
आणि त्यांची गंधित सावली

पण तो मुळी बधलाच नाही
त्याच्यासाठी हीच वाट होती
आणि ती अगदी सुयोग्य होती
कदाचित
सामाजिक संस्कार
किंवा पुरुषी अहंकार
काहीतरी आड येत होते
कादाचित ते दोन जगातले अंतर होते
अन ती जावू लागली
फरफटत त्याच्या मागे  

हळू हळू शब्दांचा दुरावा आला
मग स्पर्श ही परका झाला
शिशिरात झाडणाऱ्या पानागत
भावना ही गळून पडल्या
त्या बधीर गोठणाऱ्या दुराव्यात
रात्री वर्षांच्या झाल्या
अन एकांताच्या भिंती गेल्या
गगनापर्यंत
न जोडण्यासाठी
अहंकाराचा आक्रोश झाला
अस्तित्वाच्या दरीत
व्यक्तीत्वाच्या ठिकऱ्या उडवीत
आणि जोडलेले नाते गेले
फाटत चिंध्या होत
काटेरी तारेत अडकलेल्या  
विरळ कापडागत  

एक दिवस तिने त्याला
सांगून टाकले न राहवून
बिनदिक्क्तपणे
तू माझा जिवलग नाहीस
माझा सोलमेट कुणी वेगळाच आहे
खचलेल्या घराला ते धक्का देणे होते
एक धुळीचा लोट उठला
आणि पुन्हा खाली बसला
तेव्हा जग बदललेले होते

पण आता नवीन घर बांधणे
दोघांनाही शक्य नव्हते
मग त्या तुटलेल्या ढिगाऱ्यावरील
पसारा दूर करीत
उघड्यावरच अदृश्य भिंती बंधित
ते जगत राहिले  
धर्मशाळेत भेटलेल्या वाटसरूगत
एकमेकांची ओळख न वाढवत
तरीही साखर चहा काडेपेटी
यांची देवाण घेवाण करत
अपरिहार्यतेने

ती होती तिच्या खुणावणाऱ्या  
वाटेला पुन्हा साद घालत
आणि तो त्याच्या अहंकार कुरवाळत
आणि एक जगण्याचे नाटक होते घडत  

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...