शनिवार, ८ एप्रिल, २०१७

जोडीयला दत्तराये ||




जैसे जीवनाचे
हाती आले माप
पुण्य पाप ताप
स्वीकारले ||१

ठेविल्या बांधून
भावना कामना
निराश कामना
भगव्याची ||२

पेटवून प्राण
करी घुसळण
घडो ते घडणं
याची डोळा ||३

मनाचे अंगण
दिले मी सोडून
पाहतो बसून
येरझार ||४

विक्रांत फुटला
शतखंड झाला
पुन्हा जोडीयला
दत्तराये ||५

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

हलकेच हात सोडवत



हलकेच हात सोडवत
म्हटली ती जेव्हा
आपण फक्त
मित्र आहोत ना ?
कसमुसा हसलो मी
आणि म्हणालो
अर्थातच !
एक वादळली कविता तेव्हा
कोसळली माझ्या आत
मग जे उरले होते
ते कोऱ्या पानाचे
फडफडणे होते
म्हटले तर आता
लिहायचे कारण नव्हते
म्हटले तर लिहायला
खूप काही होते .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे







गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

नाम नाव



किती किती पाणी देवा
किती किती ही निळाई
इवलासा जन्म माझा
सांग कैसा पार होई

कैसे भेटी येवू तुवा
कैसे तव प्रेम पावू
गळुनिया गेले बळ   
सांग कैसा पुढे जावू

सांगतात संत सारे
नाम नाव पार नेई
घेवुनिया थकलो मी
खरे वाटतच नाही

थांबतो मी इथे आता
जन्म मरणाच्या रणी  
प्रेम तुझे मनी माझ्या
ठेव किंवा जा घेवूनी  

जाणतो न विक्रांत हे
येणे जाणे तुझे काही
नाकारणे पण तुला
काही केल्या होत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 




बुधवार, ५ एप्रिल, २०१७

वाटा केशरी कोवळ्या



वाटा केशरी कोवळ्या
मना क्वचित स्पर्शल्या
अश्या सामोरी येवून
का अवचित ठाकल्या

वाटा होत्याच मोडल्या
दूर ओढयात बुडाल्या
नव्या वळणी फिरून
उगा खुणावू लागल्या

साऱ्या तुटल्या जगाच्या
गाठी बुद्ध्याच सोडल्या  
हाका ओढाळ तरी का
मग माझ्यात रुतल्या  

गाव परके निष्ठुर
बाता धनाच्या चालल्या
मन विरक्त उदास
गोष्टी कुणा न कळल्या

होते भ्रम जरी कळे
साऱ्या सुखाच्या सावल्या
आस कुणाची जीवाला
पाय थांबती कश्याला

वाटा उसन्या परक्या
दत्ता कशाला दाविल्या
जाणे राहिले पुढती
सुख पायास फाटल्या

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in 





विनवणी श्रीरामा ।।



विनवणी श्रीरामा ।।

जरी मी नच राम लायक ।
परी तो प्रभू जगतपालक ।
कलीमलहारी त्रिभुवनपालक ।
ठेवो माझी अल्पशी ओळख।।

मी तो मोही तुडुंब भरला 
विषयानुरागी थिल्लर थोरला 
सदा कर्दम वाढवीत आपुला 
चित्त सरोजी भ्रमर  भरला।।

मस्त खेळती कुंजर माजले 
काम भाव जे विभ्रम उठले 
गाळी अडकले मकरी गिळले
भक्तीभाव जे मनात सजले ।।

जन्म भोगतो नशेत दुःखद
तुझी करुणा माझे औषध 
हे रघुनाथ जय नरेश अवध 
येऊन माझे हे मीपण वध ।।

सुने जैसे हाडी अडकले 
जंबुक वा चामडीत गुंतले
क्षणभोगी मन मोही जडले
नाम घेतले जणू वाया गेले ।।

भ्रमित विक्रांत खेळे चकवा 
चोरे लुटले तव निघता गावा 
गिध वानर रिस जपले तुवा 
लोटू नको या मूढ मानवा ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, ३ एप्रिल, २०१७

होय बाधा जीवनाला





वेडे उधाण वादळ     
खुळ्या मिठीत घेवुनी  
गौर पावुले जळात
होती सोडुनिया कुणी
  
काळ्या डोळ्यात दाटले
तेच आदिम काहूर
सुख उर्मीचा फुलला   
तनमनात मोहर   

तेच गेह देह तरी  
ऋतू झालेला फितूर
गंध कस्तुरी चंदन
रोमरोमात मधुर

धुंद सुखाची स्पंदने
हळू घेतांना वेचूनी
भय हातात जपले
नच जावे कि सुटूनी

रूप तेच ध्यानीमनी
वेणुनाद कणोकणी
होय बाधा जीवनाला
प्राण दुसरा होवुनी
  
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, १ एप्रिल, २०१७

ये सखी




ये सखी

हळूच येवून
डोळे चुकवून
मजला वाकून
बघ सखी ||

जरा वळून
जाई लिहून
दो ओळीतून
मन तुझे ||

मग गालातून
यावे उमलून 
ओठ दुमडून
हसू तुझे ||

जरा थबकून
मान वळवून
त्या बहाण्यातून
थांब सखी ||

शब्द उचलून
नजर झेलून
कुर्बान होवून
जाय कुणी  ||

तुझ्यावाचून
व्यर्थ जीवन
आले उमजून
साऱ्या क्षणा ||

घेई उचलून
हृदय देवून
मजला करून
आपुला तू ||

तुझ्या वाचून
शून्य होवून
जाईल निघून
अथवा मी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...