सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

भेटून येता ...




भेटून येता ...

त्या क्षणाला
असे भेटून येता
स्पर्शातून कृतज्ञता
कधी ओघळता 

शांत झाले मन
देवालयी जणू
भगवती तूच ती  
व्यापून अणुरेणु

मौनातून गुह्य
किती आकळले
प्रकाशात तुझ्या
जग उजळले 

जगणे भेटले
पुन्हा तापसाला
प्रसाद तुझा मी
हातात घेतला 

मांगल्य तूची या
आधार मनाला
दिलेस चैतन्य
पुन्हा या शवाला

दे जन्म दे वा
दे मृत्यू मला
पदी तुझ्या मी
हा जन्म वाहिला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


अरुण व स्नेहासाठी लिहलेली कविता



स्नेह पल्लवी तुझ्या सखी मी
बंदिवान जरी किती सुखी मी ||
बालपणीची तू मैत्रीण लाभली  
सहचारिणी होय यौवनातली ||
या गळ्यातील मौतिकमाला
तू हर्ष व्यापला या हृदयाला ||
गौरवर्णा सखी कमलनयना
कनक भूषणी गमे देवांगना ||
चित्त विलोपणा सौख कामना
अशीच भरुनी या रहा जीवना ||

Feelings of Arun for sneha
On snehas birthday    
I just put them in words


डॉ.विक्रांत तिकोने 

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

खेळ हा कशाचा **





खेळ हा कशाचा
************

देहात कोंडलेला
श्वास हा कुणाचा
मनात चालणारा
खेळ हा कशाचा

का शोधतो जीव
हा तुकडा सुखाचा
कळेना तरी मार्ग
शोधे तो यशाचा  

भिजताच माती ये
जन्म अंकुराला
आकाश किती ते
ना माहित कुणाला

उन वारा पावूस
हा वृक्ष आकारला
वखार ओंडक्यांची
ती ठाव न त्याला


साराच सिनेमा
हा असे ठरलेला
रीळ पुढे धावे
नि सीन बांधलेला

उजेडी भरे मनी
भाव भावनेला
मागचा दिवा तो
कुणी लावलेला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

प्राजक्त





पुन्हा एक शुभ्र सडा
पडे माझ्या अंगणात
दरवळे गंध तोच
आज या कणाकणात

भूमीवर सांडलेले
चांदणे ते घनदाट
कोमलता कोंडलेली
होती जणू त्या क्षणात

एक एक शब्द होता
ओघाळता शुन्य नाद
रानीवनी पोहचला
गूढ त्याचा पडसाद

कसा जन्म कसा मृत्यू
घटनेला अर्थ नाही
प्राजक्ताचा जन्म मनी
पेक्षा जीणे सार्थ नाही
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने.



 https://kavitesathikavita.blogspot.in/ 

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

अघोरी






अघोरी

त्या तुझ्या तिसऱ्या डोळ्याने
मी मला पाहतो निरखून
आणि आश्चर्य दिसते कि
मी जळतच नाही अजून

मी मनाचा तरंग होवून
मी तृष्णेचा गंध लेवून
भिरभिरतो त्याच पथाने
तारे वारे हृदयात भरून

आणि कुठल्या व्याकुळ नयनी
आयुष्याला देतो उधळून
क्षणाक्षणाला जळते चिता
उबेत तिच्या राहतो बसून

दिसे भोवती रुंडमाला
पांढुरका रंग पसरला
तडतडणारा शब्द आणि
सरल्या गर्दीचा पसारा

अरे असू दे हे माझ्यासाठी
मी तर आहे एक अघोरी
बेपर्वा बेहोष स्मशानी
नृत्य सुखाचे अखंड करी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

फुलझडी २




फुलझडी



ती मंत्रमुग्ध नजर
खिळलेली कुणावर
अजाणता क्षणभर
मी व्याकुळ जन्मभर

ते ओझरते  पाहणे
कुणी हरखून जाणे
मनात फुलझडीचे
अजून तडतडणे

माझे सजलेले गाणे
जन्म फुलांनी भरणे
तिचे व्याकुळ तराने
स्मृती सुवर्णी खिळणे

तुझी माझी भेट जरी
परत होणार नाही
माझ्यात तुझे असणे
कधी मिटणार नाही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
kavitesathikavita.blogspot.in

फुलझडी १






 फुलझडी १

तुजला पाहता मन फुलझडी।।
स्वरूपाची गोडी कळे त्याला ।।

तुझिया स्मरणे येते मोहरून
गंधाने वेढून जातो देह ।।

क्षणांचे आयुष्य देतो उधळून
तुजला जाणून अतरंगी

सावळा सुंदर  प्राणांचा विसावा
मनी या राहावा सदोतीत ।।


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...