बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

हे मायेचे रूप मनोहर




हे मायेचे रूप मनोहर
जीव अजुनी होय अनावर
अन मातीच्या वृक्षाला या
अजुनी येतो मुग्ध मोहर

सरला ऋतू काल वसंती
तरीही मनी शरद अजुनी
तमात गेली विझली गाणी
सूर कुठूनी हे येती कानी

सुटली साथ स्पर्श हरवले
नावा पुरते नाते राहिले
कोन्यामधल्या अंधारास    
फुटता कुपी गंधी व्यापले

जन्म धावतो कळल्यावाचुनी
कशास घटते अशी कहाणी
मिटता मिटता पान पापणी
दार उघडते स्वप्न दालनी

अंती काय ते मना न कळते
फिरणे नाही नदी जाणते
झगमगत्या रंगात अखंड  
जललहरींचे नृत्य चालते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

वादळ



  वादळ

वादळ त्या उरातले
मज हलवून गेले
आकाश खिन्न भरले
आज हरवून गेले

उलट प्रवास माझा
जरा थांबवून गेले
देहात पेटले दुख
याद विसरून गेले

ते दार बंद चिनले
हळू उघडून गेले
बीज एक त्या सुखाचे
मनी रुजवून गेले

मी अनंत आभारांनी
आज मोहरून आले
जे बंदिस्त खोल होते
गीत उमलून आले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने





सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

स्थिती मनाची




स्थिती मनाची ।
खात्री जीवाची ।
अवस्था चित्ताची ।
घटायला हवी ।।

मग हे चरण ।
मी न सोडिन ।
राहो जावो प्राण ।
काही केल्या।।

कृपेचा किरण।
हृदयी धरीन।
जीव ओवाळीन ।
पायी तुझ्या।।

एवढेच स्वामी।
ठसो माझे मनी।
विक्रांता आणि ।
काय हवे।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

गुरुवर



खुळी खुशामत मन हे करता
नकळत नेता स्वप्नरंगी  ||१||

उगा अचानक ध्यान हरवतो
मार्ग मी चुकतो माझ्यातच   ||२||

परी गुरुदेव तोच अवधूत
घेवून परत जातो मज ||३||

खरेतर छोटी असते परीक्षा
परी नच शिक्षा नापासाला ||४||

हळूच हसतो मज थोपटतो
सरळ दावतो पुन्हा रस्ता  ||५||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

फेसबुकवर




फेसबुकवर  

चित्र बोलके 
कुण्या भित्तीवर
घेवून शंभर 
वा वाहवा ||

शब्द नेमके 
कुण्या भित्तीवर
होवून सुंदर 
गान अहा ||

मीही लिहितो
मनात वाकून  
उगाच नेटून 
मग जरा ||

जशी रात्रीची 
वाट मोकळी
अडली नडली 
नाही कुणा ||

तसाच हिंडतो 
चित्र डकवतो
वेळ घालवतो 
वांझ उगा  ||

घर हे निजते 
जग मालवते
तम साकळते 
मनी पुन्हा ||

संगणकाच्या 
पडदयावाचुनी  
कुजके हसुनी 
जाते कुणी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने




शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

मान्य मला




मान्य मला
********

चालले जगणे हसून भोगणे
प्रारब्ध झेलणे मान्य मला ||

दु:खात रडणे सुखांना शोधणे
काळीज फाटणे मान्य मला ||

मनी उजळने क्षणी मावळणे
कधी हरवणे मान्य मला ||

माझे हे असणे अथवा नसणे  
जीवनी वाहणे मान्य मला ||

करी रे स्वीकार अथवा नाकार
होणे निराधार मान्य मला ||

आले ते झेलणे कौतुके पाहणे 
विक्रांत म्हणे मान्य मला ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavaita.blogspot.in


गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

जैसी ते शुकाचेनि आंगभारें, नळिका भोविन्नली एरी मोहरें


  
साऱ्या पोपटा माहीत होते 
नळी कुठे ठेवली आहे ते 
तरीही धावले मोही पडले
लटकून अन उलटे झाले 

पिंजऱ्यात मग त्या लवंडून
पाठ शब्द घोकून घोकून 
पेरू मजेने खात राहिले
जगा ज्ञान देवू लागले

जागे व्हा रे नीट पहा रे  
आत्मरूप ते जाणून घ्या रे 
पाहता पाहता भरले पिंजरे 
भक्त माना डोलू लागले 

काही शिकलो मग मी ही 
जाड शब्द कधी न जाणले
आणि भोवती खूप जमवले
खुश मस्करे स्वार्थ भरले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...