शनिवार, १४ जानेवारी, २०१७

उदास वावरे




उदास वावरे
तुझ्या मंदिरात
तोच घंटा नाद
रोज करी ||
तीच ती आरती
तीर्थ नि प्रसाद
करी मोजदाद
पुण्याची मी ||
नच हालचाल
नच बोलचाल
ओघळेना कौल
फुलातला ||
अहो विश्वंभरा  
देई मज दान
कृपेचा लहान
घास मुखी ||
विक्रांत लाचार
कुठे रे जाणार
तुझ्या पायावर
प्राण माझा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

पापण्याआड




मिटल्या पापण्याआड माझ्या
आता स्वप्न उमलत नाही
तोच काळोख काळा कभिन्न
बाकी काहीच दिसतं नाही

पापण्यांच्या बंद कडातून
दु:ख आता ओघळत नाही  
उरले मागे नीरस सुख
ते ही मज साहवत नाही  

जगण्या मरण्याची पोकळी
मी पणास या कळत नाही
लाख दुभंगून खांब गेले
सत्य परि प्रकटत नाही

डोळ्याच्या का या खाचा जाहल्या
स्पर्श कशाचे टोचत नाही
असे भोवती नसे कुणी वा
खाई आतली भरत नाही

दूरवरती कंपन काही
तरीही खात्री पटत नाही
दृष्य जरी ना खोल अंतरी
ठिणगी अन विझत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/






रविवार, ८ जानेवारी, २०१७

बँकवाला मित्र



जुन्या नोटा बंद पडल्या
अन नव्या मिळेनाश्या झाल्या 
तेव्हा मला आठवण आली  
प्रिय मित्रा तुझी
अन त्या तुझ्या बँकेची

खरंच सांगतो
तूच मित्र माझा खरा
अगदी भावाहून जवळचा
नाही भेटलो बहू दिवसात वा
जरी फोन हि साधा न केला
पण खरंच सांगतो
नोट पाहिली की तुझी आठवण
नित्य येत असे मजला 
अन मी विचारत असे
त्या प्रत्येक नोटेला 
कसा आहे भाऊ माझा 
नोटा मोजून नाही ना दमला 

उसने मागण्या कुणी आला 
देतसे पत्ता सदा तुझा 
लोनच घे तुझ्याकडूनच 
बघ बजावत असे त्याला 

आजकाल तर तू स्वप्नात येतोस
रोज नोटा बदलून देतोस
शर्ट गुलाबी पॅन्ट करडी
मॅचिंग असा छान शोभतोस 

बरं तर ते राहू दे
महिण्यापूर्वी गेलो होतो केरळला
वाहिनीसाठी कांजीवरम अन
खास एक आणला शेला
आणि ते मसाले थेट बागेतले
तुझ्यासाठी होते आणले 
काजू गोव्याचे अन ते काही
छोट्यासाठी खेळणेही 
कधी येऊ मग सांग भेटायला 
तसे काम बिक काही नाही 
पण भेटल्यावर बोलू काही 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, ७ जानेवारी, २०१७

कसे म्हणू मग माया




इवल्याश्या फांदीवर
उबदार घरट्यात
पाखराचे गाणे चाले
रोज चिवचिवाटात

ऋतू येती ऋतू जाती
निळ्या निळ्या आभाळात
कुणा भाळी किती असे
काय अर्थ मोजण्यात

पानोपानी लहरते
दव हळू ओघळते
इवल्याश्या फुलासाठी
रान सारे गोळा होते

उत्सवात सजलेले
वृक्ष गाण कानी येते
जीवनाचे ऋचा मंत्र
सळसळ भारावते

व्याकुळती प्राण कधी
कधी होतात पराग
आणि मनी सुरावती  
अनवट काही राग

घननीळ सावळ्याची
जाणवता स्पर्श छाया  
भरलेल्या आभाळाला
कसे म्हणू मग माया


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


ज्ञानदेव ओठी



ज्ञानदेव पोटी ज्ञानदेव ओठी  
लावियली गोडी परमार्थी ||
इतुके सुंदर सांगावया येते
ज्ञान जे असते गूढ गम्य ||
पाहुनिया मनी विस्मय जाहला
आनंदे नाचला मनमोर ||
देवे मराठीत बांधला कैलास
विद्येचा विलास करुनिया ||
कळेना मजला शब्दास या वेचू
की ज्ञानास खोचू हृदयात ||
शब्दासवे कवि राज ज्ञानदेव
अंतरीचा भाव झाला माझ्या ||
विक्रांत उन्मत्त शब्दात डुंबत
अंतरी पेटत निवळला ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

©https://kavitesathikavita.blogspot.com/

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

गोष्ट संपून जाते




बहुतेक वेळा आपल्याला
पक्के माहित असते
संपणाऱ्या गोष्टी अंती
काय घडणार आहे ते

तरीही आपण ऐकतो
कान  देवून पाहतो
गोष्टी मध्ये स्वतःला
पूर्ण हरवून टाकतो

खर तर ती प्रत्येक गोष्ट
अगदी आपली असते
तसे नव्हे रूढार्थाने नव्हे
ती खरेच आपली असते 

जन्म मरणाच्या टोकांना 
बांधलेल्या दोरीवर
सुखदुःखाच्या चिध्याविना
आणखी काय असणार

चार सुखे चार दु:खे
अन मग दोरी तुटणार
एक दोन कमी जास्त
कुणा कसे कळणार

त्या सुखाची फडफड
ऐकूण मन खिदळते
अन दुखाची तडफड
जाणून सुन्न पडते

एक लाट दुसरी लाट
लाटावरती कथा येते
कळे कुणा नच कळे
मनोमनी तेच असते   

एक होता विक्रांत..बरं का  
गोष्ट एक सुरु होते  
हसतो रडतो जगतो अन
गोष्ट संपून जाते  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...