सोमवार, ११ जुलै, २०१६

पावसा








कोटी कोटी मुखातून

उमटे प्रश्न पुन्हा रे

थकलो वाट पाहून

पावसा येशील का रे ?



तसा तर तू येशील

थोडाफार पडशील

पण तसे नको आता

हळूच पुन्हा जाशील



असा बरस आता तू

तृषा हरो जीवनाची

कणाकणातून हसो

स्वप्न उद्याच्या सुखाची



नद्या उदंड भरोत

तळी तुडुंब वाहोत

विहरी साकव आड

गाणे निळूले गावोत



कृपाघना नाव तुझे

हरसाल साच व्हावे

अंकुरती बीज सान

जीवनाचे दान द्यावे



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/




शनिवार, ९ जुलै, २०१६

मनाचे पाखरू



मनाचा पिंजरा
मनाचे पाखरू
अफाट अपारु
नच जाणे येरू

सुखाचा चारा  
संपता संपेना
वेचतांना भान
स्वत:चे येईना

उगा फडफड
मानलेले घाव
फुटतात टाहो
खुळी धावाधाव

शब्दांचे तुकडे
मांडतो पद्यात
येईना अजुनी
अर्थ तो तयात

विक्रांते पाहीले
क्षितीज धुंडले
अंतरी दिसले
काहीच नसले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  
         

बुधवार, ६ जुलै, २०१६

ओझे अजुनी







कालचे ओझे अजुनी
पाठीवरी वाहतो मी
सुटका नाही तरीही
स्वप्न एक पाहतो मी

फार काही वांछिले ना
सत्य फक्त मागतो मी
शत दु:खे वेदनांची
तरीही गाणे गातो मी

भोगणे प्राप्त मनास
पुन्हा पुन्हा सांगतो मी
आणि मार्ग सुटकेचे
रोज रोज शोधतो मी

रातदिन युद्ध माझे
रोज जरी हारतो मी
धरिले हृदयी तुवा
दत्ता नच सोडतो मी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...