मंगळवार, ८ मार्च, २०१६

तडकाफडकी कविता






रागावता साहेब मजला खुप राग आला
तडकाफडकी मी बसलो कविता लिहायला
सणसणीत उगाळलेले शब्द काढले शोधून
अन शिव्या काही यमकात टाकल्या घोटून
तडकाफडकी तसाच राग माझा शांत झाला
म्हटलो चला कवितेला एक विषय मिळाला
जरा विसावतो तोच एक डास खुळावला
येवून कडकडून चक्क मजला चावला
पेपरने मारता मरता हुलाकावून गेला  
ओहोहो दुसरी कविता आली उदयाला
रक्त रंजित पिसाट अन अर्थ कोंबलेला
तसाच पेपर विस्कटून घरभर पसरता
प्रतिभेला बहर आला बातमीत डोकवता
तडकाफडकी पुन्हा बैठक रचली कविता
एकही न्यूज न जावो काही न लिहता  
डोळा ठेवून होतो तसाच दुज्या पेपरवरती
सोन्याचीच मजला सारी रद्दी वाटत होती
त्या रद्दीवर प्रेम पाहूनी पोर अंग चोरती
प्रात:काळी विधीसाठी त्यावर नच बसती
दारावरी यावया कुण्या न हिम्मत रद्दीवाल्या
फरक हिलाही कळेना काय द्यावे ते त्याला
तडकाफडकी रास रचली मी शीघ्रकाव्याची  
जे न म्हणती ग्रेट मजला त्यांच्या मा**

विक्रांत प्रभाकर तिकोणे





रविवार, ६ मार्च, २०१६

सोहंच्या स्फोटापर्यंत ...





खोल खोल गेलो आत
मनाच्या तळापर्यंत
शब्दांचा सोडून हात
जाणीवेचा वेध घेत

उफाळतांना विकार
शांतपणे न्याहाळत
जाता स्वप्न उधाणत
दिसण्याचे साक्षी होत

खोल खोल खूप आत
जीवनाच्या स्पर्शापर्यंत
श्वासाचे संगीत ऐकत
सळसळ रक्त पाहत

शांत शांत खूप शांत
श्वासही थांबेपर्यंत
अस्तित्वाचे टरफल
बीजाचे रुजणे होत  

पानोपानी लहरत
मुळाच्या टोकापर्यंत
भिजला कण मातीचा
प्राजक्त गंध झेलीत

उंच उंच वर वर
आकाशाच्या पोकळीत
आदी अंत ओलांडीत
शून्याच्या निरवतेत

पाण्याच्या वाफेगत
पाहणे विरघळत
कोहंच्या उगमातून
सोहंच्या स्फोटापर्यंत


विक्रांत प्रभाकर तिकोणे





शनिवार, ५ मार्च, २०१६

घाटावरचा साधू







वाह रे दुनिया खेल मजेका
राजा चोर और साधू भुका
चुहे पेटके जगत चलाए
पैसा प्रभुके काम न आए
फक्कड साधू घाटावरचा  
मस्त गाणे काही म्हणायचा
फिकट भगवे जुनाट कपडे
प्लास्टिक वरती एक घोंगाडे
डबा कडीचा काठी वाकडी
कधी ओठावर जळती विडी
फक्कड पण ते देही मुरले
होते भोवती उमलून आले
आणि विलक्षण धुंदी डोळ्यात
मस्त कलंदर त्याच्या नाचत
असेच व्हावे आता आपण
मनी मनिषा आली दाटून
अन मैयेचा पदर ओढून
हट्ट दाविला तिला वदून  
निघता साधू डोळे मिचकून
म्हटला रे तू येशील परतून
कधी परी ते नच स्मरते
विरह दाटून मन खंतावते

विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, २ मार्च, २०१६

दु:खे दाटुनिया दत्ता






दु:खे दाटुनिया दत्ता
जरी बरळलो काही
घाली अपराध पोटी
मज अन्य कुणी नाही

आहे मनच शेवटी
तुज सारेच माहिती
किती सांभाळू तयास
पुन्हा भरती ओहोटी

जरी माखलो पापाने
चित्त दुश्चित्त तापाने
सारे होईल निर्मळ
तुझ्या पावन कृपेने

दत्तनाम अमृताने   
सरते व्याधींचे करी
आलो शरण व्याकूळ
विक्रांता हृदयी धरी


विक्रांत प्रभाकर तिकोणे


अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...