सोमवार, २२ सप्टेंबर, २०१४

चिकन फळे





बाबा तुम्ही चिकन का खात नाही ?
छोटा मला म्हणाला
अरे मी शाकाहारी आहे
पशुपक्षी मारून खाणे मला आवडत नाही
माझ्या या उत्तरावर  तो म्हणाला
तेच तर सांगतोय मी बाबा मी
चिकन शाकाहारी आहे .
मी चकित होवून त्याला विचारले
कसे काय ?
तो म्हणाला , तुम्हाला माहित आहे ?
चिकनची बाग असते
तिथे अंडी एका मोठ्या कपाटात उबवतात
ते रुजवण्यासारखेच असते.
मग त्यातून चिकन पिल्लू उगवते
उगवते ?!!  मी
हो बाहेर येते ना उगवल्या सारखे ,
मग हळू हळू वाढते
त्यांना अन्न पाणी टॉनिक
सेम झाडा सारखे देतात
ते पूर्ण वाढले म्हणजे पिकले...
म्हणजे आपल्याला खायला मिळते
म्हणून सांगतो चिकनच्या बागेतील
चिकन हे फळ असते
मी विचारले , अरे तुला कुणी सांगितले हे ?
तो म्हणाला, मला कळले, आपोआप !
टीवी वर पोल्ट्री फार्म बघितला
अन मला नॉलेज आले .
त्याच्या ज्ञानाने चकाकणाऱ्या चेहऱ्याने
अन आत्म विश्वासाने भरलेल्या डोळ्याकडे
पाहता पाहता
मला त्याचे म्हणणे पटून गेले
अन मी बायकोला मोठ्याने सांगितले
अगं आपल्याला आज संध्याकाळी
चिकन फळे घेवून ये
खूप वर्ष झाली खाल्ली नाहीत !!

विक्रांत प्रभाकर










तिचा हट्ट






तिचे दु:ख मणभर
असे तिच्या उरावर
माझे दु:ख कणभर
सांभाळे मी जन्मभर

पावसात जावूनी मी
कधी भिजतच नाही
सुरामध्ये वाहुनी ती
गाणी म्हणतच नाही

तिने आग प्यायलेली
कडवट वंचनेची
तन मन विटाळून
उरी खंत वेदनेची

मागतो मी प्रीत तिला
फुटलेले तळ भांडे
तिच्या हाती अंगाराची
तप्त आग तडतडे

थोडे सुख द्यावे घ्यावे
प्रीती मध्ये जगू जावे
जीवनाचे गाडे जरा
सावलीत विसावावे   

परी तिचा हट्ट जुना
मन मिरवीते खुणा
कधी काही कटाक्षांनी
वेडी खुळी आशा मना  

 विक्रांत प्रभाकर



रविवार, २१ सप्टेंबर, २०१४

ती, मी अन खुर्ची ..








खुर्ची अन मी
बाजू बाजूला
दरवाजा अडवून
उभे होतो
गॅलरी जवळ ..
ती तणतणत
आली अन
लाथेनेच खुर्ची
बाजूला केली
खर तर
तेव्हा
ती खुर्ची म्हणजे
मीच होतो .

विक्रांत प्रभाकर

शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

प्रेमातील विदुषक




तू गा म्हणालीस म्हणून
गळा फाटेस्तोवर गाईलो
तू नाच म्हणालीस म्हणून
पाय तुटेस्तोवर नाचलो
तू टाळ्या पिटत होतीस
मोठ्याने आरोळ्या मारीत होतीस
माझ्या विदुषकत्वाला
साऱ्यासह हसत होतीस
मी ही बेभान झालो होतो
का कुणास ठावूक 
पण खर सांगू
तेव्हा मला तुझा राग येत नव्हता
आताही येत नाही
अन वाटत होते
तू कधी तरी जाणशील
कधी तरी आपला म्हणशील
म्हणून त्या विदुषकी चाळ्यामागेही
माझे डोळे शोधत होते
तुझ्या डोळ्यातील आपलेपण  

विक्रांत प्रभाकर


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...