शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

ते फळ तू दिलेले







ते फळ तू दिलेले
मधुर लाल रसिले
माझ्या ओठावर
तरंगत राहिले
पण ते तुझे अर्धे
असतेस तू दिले
तर अधिक मधुर
असते लागले
हे ही भाग्य पण
कमी नसे माझे
काही मिळे मज
तुझिया हातचे

विक्रांत प्रभाकर

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०१४

एका तुझ्या हाय करण्यानं







एका तुझ्या हाय करण्यानं
जीव किती सुखावतो
हृदयाच्या अवकाशात
पारव्यागत घुमत राहतो

तुला उगा वाटतं कि मी
आता आताच इथं आलो
जाता जाता तुला कुठतरी
सहज रस्त्यात भेटलो

पण तुला कसे कळावं मी     
किती प्रहर इथं थांबलो   
तुझ्या दोन शब्दासाठीच
रान जीवाचं करून आलो

तू पुढे गेल्यावरही माझे
पाय तिथून उचलत नाही
त्या हाय ला बाय करणे
खरच मला जमत नाही

विक्रांत प्रभाकर


गुरुवार, ११ सप्टेंबर, २०१४

बैरागी





घर दार टाकुनिया   
नांवगाव पुसलेले  
बेवारस अस्तित्वाचे
बैरागी दूर निघाले   

हातामध्ये झोळी काठी
वर केस बांधलेले
लुंगी शाल देहावर
भाळी नाम कोरलेले
  
जगामध्ये असूनही
सारे जग तुटलेले
सरलेल्या जीवनाचे
ओझे खोल गाडलेले

कुणी अलिप्त अबोल
तुळस भांगेमधले
कुणी धुरात पांढऱ्या
स्व:खुशीने गुंतलेले

अन्नासाठी जरी कुणी
वेषांतरही केलेले
कुणी चिंता सोडूनिया  
देहाला लाथ मारले

या चेहऱ्या नाव असे   
मेंदूमध्ये लिहिलेले
प्रीती स्मृती गोष्टी किती
उरामध्ये जपलेले

काही पाने सुटलेली
कवितेच्या वहीतली
घडीच्या होड्या होवून
धारेमध्ये पडलेली

कुणीतरी लिहितांना
अर्धी टाकूनी दिलेली
एक उदास कहाणी
शेवट न सुचलेली

विक्रांत प्रभाकर


मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

मुठभर प्रीत हवी ...




  
जीवन भर साथ दे
असं मी म्हणत नाही
हातामध्ये हात दे
असंही सांगत नाही

मुठभर प्रीत हवी
आणखी मागत नाही
मंद गंध दरवळ 
फुल ओरबाडत नाही

जीवनाच्या वाटेवर
मनाचं चालत नाही
अव्हेरलं गीत माझं
झुरणं सोडत नाही

म्हणशील कधी जरी
रे नातं लागत नाही
सांड थोडं स्मित पथी
तुझं काही जात नाही

विक्रांत प्रभाकर

  

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...