रविवार, २७ एप्रिल, २०१४

भांडी घासा धुणे धुवा





भांडी घासा धुणे धुवा
झाडू काढा लादी पुसा
रांधा वाढा उष्टी काढा
सोडू नका थोर वसा

दिनरात तेच तेच
आयुष्याचा होतो वेच
कुठलीच शुद्ध नाही
घरदार सुख हेच

कधीतरी स्वत:साठी
जगायला धीर नाही
पिंजऱ्याचे सुख पक्ष्या
पंख आठवत नाही

आभाळाची भीती मोठी
असे खरी असे खोटी
मनातल्या सावल्यात
शिकाऱ्यांची असे दाटी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २६ एप्रिल, २०१४

जार फुलांचा गंध






ओढाळ पक्षाची
ओढाळ गाणी
ओढाळ गाण्यात
जीवाची राणी |
जीवाची राणी
दूरच्या गावी
एकल्या राती
झुरते मनी |
झुरते मनी
जळते पापणी
देहात वादळ
शिंपिते पाणी |
शिंपिते पाणी
विझेना वन्ही
कावरी बावरी
पाहता कुणी |
पाहता कुणी
खुलते कळी
भ्रमर मातला
धावतो वनी |
धावता  वनी
सुखाची धनी
गुपित दडते
हिरव्या रानी |
हिरव्या रानी
फुलते कुणी
जार फुलांचा
गंध होवुनी |
गंध होवुनी
निवता मनी
पुण्यांची लंका
जाते जळूनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

रामराया...


तुझ्याविना जगण्याचे    
बळ दे रे रामराया
तुझा भक्त म्हणविण्या
धैर्य दे रे रामराया ||१||
जीवनाचा प्रवाह हा
मिळतोय सागराला
क्षुब्ध त्या गलबलाटी 
स्थैर्य दे रे रामराया ||२||
सांभाळीले कड्यावरी
न बोलविता झेलले
तो तुझा स्पर्श सुखाचा
पुन्हा दे रे रामराया ||३||
मरण्याचे भय नाही
पुन्हा जन्म असो नसो
तुझे प्रेम अंतरंगी
फुलू दे रे रामराया ||४||


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २४ एप्रिल, २०१४

होती इथेच कधी ती





होती इथेच कधी ती
घरकुली चंद्रमौळी
दारास तोरण अन
ओढाळ विरह डोळी

अजुनी श्वासात माझ्या
गंध धुंद दरवळे
मृदूल स्पर्श हळवा
देहावरी घुटमळे

चांदण्यात विणली ती
स्वप्ने कुठे हरवली
हाती हाताने रेखली
रेषा कुणी मिटवली

पेरली आग ह्रदयी
जाग कुणी ही आणली
घुसमटे प्राण आणि 
स्वप्ने जळुन गेली

असा भाग्यहीन का मी
माझे मलाच कळेना
चुकली वाट कुठली
मज शोधूनी दिसेना  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...