शनिवार, १ मार्च, २०१४

फुटपाथवरची मुलं ....



फुटपाथवर खेळणारी
अनवाणी पायांची
मळक्या कपड्यांची
आक्रमक मुलं...
काही कळल्यावाचून
असभ्य भाषेतून  
आईबहिणी वरून
शिव्या देणारी मुलं...
शिव्यांनीच संबोधन
शिव्यांचीच विशेषण
शिव्यांचीच अवतरण
मुखात पेरलेली मुलं...
गल्लीगल्लीतून उगाच   
उनाड धावणारी
गाड्यासमोर बिनधास्त
बेफिकीर पळणारी
निरंकुश सशक्त
तेज तर्रार मुलं....
सिनेमाच्या कथातून
घेत घेत प्रशिक्षण
गुंड रोड छाप हिरोला
आपला आदर्श मानून
थंड उद्धट मग्रूर
संवाद बोलणारी मुलं....
त्यांचे डोळे शाळेला कंटाळलेले
हात अवेळीच पैशाला चटावलेले
ती  स्वैर विमुक्त बेपर्वा
जीवनाचे व्यसन लागलेली मुलं....
त्यांना पहिले की
मला आठवतात ते
गावच्या माळावर
वेडेवाकडे आडवेतिडवे
वाढलेले प्रचंड तण.....
अवती भवतीच्या साऱ्या
लहान झुडूपांना खाली दाबून
वारेमाप धसमुसळेपणान
पसरलेले सैराट रान...
त्यांची तीष्ण काटेरी
धारधार पानं
अन तीव्र उग्र तिखट
ओल्या गंधानं
दरवळलेले माळरान ...
कुणाचीही पर्वा केल्यावाचून
उद्दंडपणे जीवनाकडून
उन वारा पाणी
घेणारे ओरबाडून  
राकट चिवट रानवट आणि बेपर्वा ..
जीवनाचे आदिम रसायन  
धमन्यातून खेळवणारी मुलं....
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

  




शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

आस्तिक




कश्यासाठी कष्ट सारे
सोसायाचे उन वारे
काही शब्द अन सल्ले
यावरी उंच मनोरे ||
स्वप्नही उसने होते
उसनेच सत्य हाती
चाकोरीत कालच्याच 
नित्य वाटे सारी गती ||
हात ज्याचे रिक्त त्याला
सारेच दाते वाटती
आशाळभूत होऊनी
दार दार ठोठावती ||
अहो स्वामी असा कुठे
कुणास ठावूक किंवा
उधळली वर्ष किती
धावतांना उगाच वा ||
जाब जरी मागू म्हणे
मीच माझा प्रतिध्वनी
आत बाहेर शोधूनी
न ये दृष्टीस कुणी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

राजांच्या नावाला विसरली आहेत ||



माझी ही मानसं
विटाळली आहेत
राजांच्या नावाला
विसरली आहेत ||
दुहीच्या द्वेषात
आपसात भांडत
मराठी मातीला
विसरली आहेत ||
सत्तेच्या मदाने
मातली आहेत
धनाच्या ढिगाला
हपापली आहेत ||
बोलणे माझे हे
ऐकणार नाहीत
मला ही कदाचित
ठेवणार नाहीत ||
परी मजला हे
ठावूक आहे
नावात त्या किती
ताकद आहे ||
पेटेल ज्वाला ती
पुन्हा धडाडून
जाईल हिणकस
अवघे जळून ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




मुन्सीपाल्टीतील मित्र



अफाट बुद्धीचा
गमत्या मुळचा
मित्र आमचा
आहे एक ||
कुठे कधीही
कुणा समोरही
बोले काहीही
जीभ घसरून ||
प्रेम खाण्यावर
साऱ्या डब्यावर
गोड धोडावर
ताव मारणारा ||
लेट येणारा
हळूच पळणारा
झोपा काढणारा
कामावरती ||
त्याचे देणे
असते घेणे
प्रत्येक नाणे
वाजवाजवून||
हा पगार तर
चालू राहणार
सही केल्यावर
घाई कसली ||
लोक येतात
लोक जातात
कामे होतात
आपोआप ||
आपण कशाला
हवे मरायला
चहा प्यायला
जाई सदा ||
त्याला कळली
देही मुरली
कोळून प्यायली
मुन्सीपाल्टी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४

नामाभिधारण




किती सहज त्याने मजला सोडले
जुने खेळणे जणू मोडले फेकले
ते होते प्रेम अथवा व्यवहार खोटा
करणे सौदा एक दुजा ठेवून हाता
असे का सदा प्रीत कळेना कठीण
आदिम खेळ वा वाढविण्या वीण
व्यर्थ उमटतात उर्मी देही सनातन
मिटविण्या त्यास हे नामाभिधारण 

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

  

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...