सोमवार, १३ मे, २०१३

कैसा दत्ता तुझा




कैसा दत्ता तुझा l पडला विसरl
जळो व्यवहार l माझा आता ll ll
काम धंदा उगा l घेतला बोडखी l
केली मानतुकी l घेण्या देण्या llll
म्हणवितो भक्त l रचितो कवित्व l
परी असे रिक्त l घडा माझा ll ll
गेला किती काळ l तुझ्या विस्मरणी l
लागली टोचणी l माझ्या जीवा ll ll
तुची माय बाप l करावी करुणा l
माझिया स्मरणा l नित्य यावे ll ll
हाती असो हात l पाय चलो साथ l
नाम तुझे गात l रात्रंदिन ll ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ११ मे, २०१३

मराठमोळी






साधी भोळी मराठमोळी
रेखीव चेहरा काळी सावळी
कुंकूम रेखा उंच कपाळी
खाली गोंदण हिरव शेवाळी
गळ्यात एकच पोथ काळी
किंचित विटकी जांभळी चोळी
जुनेर लुगडे जोड लावली
जुळी जोडवी उघड्या पावली
कुठे लाल हिरवी पिवळी
कंकण होती हाती भरली
आणि होती तेजाळलेली
चंद्रभागा निर्मळ डोळी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, १० मे, २०१३

चाहूल पावसाळी




बिलोरी नभाला जांभळी झालर
निळ्या सागरी सावळी थरथर
ग्रीष्मात तापल्या काळ्या भूमीवर
फुलले निश्वास तापले हळुवार
दुरून कुठून शीतल वारा
सूक्ष्मसा गंध मातीचा भिजरा
घेवून आला निरोप नाचरा
आतुर देह झाला हा सारा
होईल आता किमया हिरवी
कातळांना ही मखमल जादुई
शुष्क तिरसट कोरडे झरेही
गातील आता झुळझुळ काही
फुलेल कुठे निळा पिसारा
घुमेल टोहो पंचम नाचरा
भिजेल उर तापाचा नाचरा
लागली चाहूल लागली अंतरा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, ७ मे, २०१३

एक दुपार



सूर्य होता आग ओकत
जणू सुडाने विश्व जाळत
एकच ढग निळ्या नभात
उभा होता अंग चोरत
उष्ण वारा उगा वळवळत
होता वाळली पाने हलवत
दारात अंगणात माजघरात
सुन्न शांतता होती नांदत
झाडाखाली थोड्या सावलीत
कुत्रे होते पडले निपचित
भर पेठेत मोकळ्या रस्त्यात
उन रणरणत सुन्न निवांत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

नृत्य समाधी .



नृत्याची झिंग कर्पुरी देहावर
नाचते वीज अंगागावर
कमनीय बांधा लचकेत थरार
उसळत्या लाटा किनाऱ्यावर
आवेग आवर्तन अणूरेणूवर
पावलो पावली नुपूर झंकार
यौवन देही साक्षात मंदार
स्वैर होवून बटा चुकार
चुंबती उन्नत कपोल हळुवार
काळवेळ विसरून सार
अनामाशी जुळले सूर
बेहोष समाधी लौकिका शरीर
थकला श्वास स्वेद चेहऱ्यावर
तृप्तीचे हासू रेखीव ओठावर
मृगनयनात अनोखी हुरहूर 

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १ मे, २०१३

साधकांच्या कथा



वाचता अद्भुत l साधकांच्या कथा l
दाटे मनी व्यथा l उगाचच ll ll
काय त्यांचे भाग्य l वाटतसे हेवा l
माझ्या वाट्या देवा l येईल का ? ll ll
तैसे ते वैराग्य l तैसे समर्पण l
कधी का घडेन l जीवनी या ? ll ll
तैसी गुरु भेट l कृपेचा पाऊस l
साधनेची हौस l फिटेल का ? ll ll
तैसी तीर्थ यात्रा l सज्जनांचा संग l
विरक्तीचा रंग l चढेल का ? ll ll
तैश्या विरहात l जळेल जीवन l
माझे रात्रंदिन l कधी देवा ? ll ll
तैश्या त्या प्रेमान l जीवन सजून l
येईल भरून l तुझ्या ठायी ? ll ll
व्याकूळ अंतर l झाले तुझ्याविण l
द्वार का अजून l मिटलेले ? ll ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...