कारणावाचून
*********
कुणीतरी आपल्यासाठी थांबावं आणि आपण कुणासाठी तरी थांबावं
हा अट्टाहास म्हणजे
मूर्खपणाचे दुसरे नाव असते
तसे तर थांबतात लोक
आणि बोलतातही हसून
पण ते थांबणे नसते
कधीच कारणावाचून
जर या जगात कोणाचेच
काही कधीच अडले नसते
दुसऱ्या वाचून
तर जग किती सुंदर झाले असते
तर मग घडले असते
बोलणे बोलण्यासाठी
थांबणे थांबण्यासाठी
भेटणे भेटण्यासाठी
जगणे जगण्यासाठी
अंतरीच्या तारा जुळून
कदाचित शब्दा वाचून
गरज मग ती असू दे कितीही सूक्ष्म
आलेली अचेतन मनाच्या पडद्या मागून
टाकते सारेच आकाश काळवंडून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा