शुक्रवार, २९ मे, २०१५

भेट झाली नाही






इथे भेट झाली नाही
तिथे भेटशील याची
मुळी सुद्धा खात्री नाही 
पण शोधणे प्रारब्ध   

माझ्या मनातील मूर्ती
खंडित होते शतदा
अन नव्या मूर्तीसाठी
हे मन धावते पुन्हा

संगमरवरी छान
कधी पाषाण काळी
मनाचा मोह करतो
सदैव तुझी आरती

खंडित कधी त्यजली
धरतो मी हृदयाशी
अप्राप्त कधी मंदिरी
भजतो भाव भक्तीनी

जन्म साधना झाले हे
जळे व्याकूळ अंतरी
अतृप्त अप्राप्य का रे
सुख कल्पना जगाची

ते कळणे ते झुरणे
सारेच वृथा का होते
चिंब कोसळून वर्षा  
पिक करपून गेले

जरी जाणतो इथल्या
साऱ्याच रीतीभाती मी
दोन दिसाची जिंदगी
अन प्रेम व्यवहारी

बघ चालतो पुन्हा मी
रे त्याच व्यर्थ शोधाला
पडेल विसर जगा
खेळ चाले मरणाचा

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...