गुरुवार, १४ मे, २०१५

माक्याची आई (आजी.)








पिकलेल्या पानासारखी
एक दिवस आजी
हळूच गळून पडली
आवाज नाही
धडपड नाही
देवघरातील दिव्यागत
गुपचूप विझून गेली
गावाहून आणले तेव्हा
थोडासाच जीव होता
कुणामध्ये अडकला
ते तेव्हा कळत नव्हता
लुकलुकणारे तिचे डोळे
कष्टाने उघडत होते
शाळेतील पोरे आम्ही
मरणाची चाहूल नव्हती
आजी सिरीयस आहे किती
मुळीसुद्धा कळत नव्हते
आम्हा सर्वास तिने पाहिले
मुकेपणाने.. खुणेवाचून..
अन डोळे मिटून घेतले
पुन्हा न कधी उघडले
तोच दिवस होती ती  
अन मग निघून गेली
परक्या गावी कुठल्या घरी
तिची संघर्ष यात्रा संपली

परी भवती माणसं होती
तिची प्रिय जिवलग लाडकी..
तेच तिचे सर्वस्व होते
तिने रुजवले सांभाळले
जीवापाड अन जपलेले  

अफाट मेहनत करता करता
एकच स्वप्न तिने पाहीले
नव्या पिढीचे जग सुखाचे
बहु कष्टाने तिने रचले

त्या तिच्या बलिदानाने
धडपडण्याने दूरदृष्टीने
सौख्य नांदते या घरात
सदैव ती या घराची
गृहदेवता निर्विवाद
अन जाणवतो कणाकणात
आम्हा तिचा आशीर्वाद  

विक्रांत प्रभाकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...