गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

तू तशी मुळीच नाही





कुणी म्हणो तुला काही
नावे ठेवो उगा काही 
पण मज माहित की 
तू तशी मुळीच नाही

घेरतील सारे तुला
सोडणार मुळी नाही
टोचतील सारे तुला
झेपणार बघ नाही

सांग किती लढशील
जग थांबणार नाही
सांभाळून चाल किती
माग सोडणार नाही

तुला सारे कळूनही
पर्वा मुळीसुद्धा नाही
आगीसवे खेळण्याचा
छंद अन जात नाही

सांगू कसे अन किती
तू ती ऐकणार नाही
परी मज ठाव आहे
कधी चुकणार नाही  

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

म्हटले तर..





ती हसली म्हणून
मी हसलो
म्हटले तर वाचलो
म्हटले तर मेलो
घर का गुलाबीच होते ?  
ना आठवते !
पण बहुदा ते
तसेच होते
काय काय इथे  
जमा मी केले
आश्चर्य वाटते
काय मीच कमावले
बरे असो आता ते
झाले ते झाले
जगण्यास काही
कारण मिळाले
आणि बाकी
तसेच सारे,
पोरे सोरे
शाळा फिळा
डोनेशन वगैरे वगैरे
चाललीय गाडी
होते कधी पंक्चर
झाडावर कुठल्या
आदळले बंपर
म्हटले तर
व्यर्थ बरळणे आहे
म्हटले तर
आनंदे गाणे आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, २३ फेब्रुवारी, २०१५

सखे कसे सांग तुला



सखे कसे सांग तुला प्रेम हे कळलेच नाही 
वाटेवर पडलेले फुल मुळी दिसलेच नाही 

जरी होते कुणाचे ते पथावरी सांडलेले
खोचलेले स्वप्न त्याचे कधी पुरे झालेच नाही

फार काही नव्हते गं त्याचे इवले मागणे
क्षणभर तू हाती घ्यावे पण ते घडलेच नाही

गंध तुझ्या श्वासातला भाव अन डोळ्यातला
जन्माचे प्रेय त्याला पण कधी भेटलेच नाही

उगवणारा सूर्य कोवळा त्याचा नसेल कदाचित     
ओघळला जन्म उगाच अन हसू फुललेच नाही

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

लिहिले ते




लिहिले ते सारे जुने 
नवे आता काही नाही .
लिहिणारा लिहतसे
पण तोच आता नाही

सांभाळून घेतलेसे
धन्यवाद म्हणतसे 
तुमचेच होते सारे 
नाव खाली लिहतसे 

पुन्हा काही फुटतील 
नवनवे धुमारेही
अन फळ फुलांसाठी 
खग गण येतीलही 

माझे होते उगा काही 
कोमेजून जाईलही 
जीवनाचे हुंकार ते 
अरे बाकी काही नाही

विक्रांत प्रभाकर तिकोणे




शनिवार, २१ फेब्रुवारी, २०१५

फुटावे हे भांडे आता






फुटावे हे भांडे आता
चेपलेले जागोजागी
खूप खूप वाहिलेले
पुरे आता व्हावे उगी

वाहणेच जन्म होता
साठवले काही नाही
कुणासाठी किती वेळा
मोजण्याला अंत नाही

वाहीलो भरभरुनी
कधी गेलो ओसंडूनी
परी काही हरवले
सापडले ना शोधूनी

झिजण्याचा क्षोभ नाही
वाहिल्याचा क्रोध नाही
थकुनीही कणकण
सावलीचा लोभ नाही

पलीकडे जावे आता
जिथे भय हाव नाही
मनामध्ये रुजलेले  
ते सुखाचे गाव नाही   


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५

गप्पाच गांजेकसच्या ..





जीवा घेरून राहिलं
एकाकी एकटेपण
माझ्या फुटक्या नावेच
निरर्थक वल्ह्वण

कळत नाही तरीही
कुणास हाक मारतो
सुकलेला गळा अन  
आणखी ओढला जातो

समोरच असूनही   
अर्थ न उकलतात
अवघ्या प्रकाशकथा
आत विझून जातात  

आत आत किती आत
अंधार हा घनदाट
स्वप्ने सारी भयावह
खदखदा हसतात

निराधार आधार या
गप्पाच गांजेकसच्या
ठणाणा कानात घोष
चाले नावाचा कुणाच्या

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...