बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

नाते


नाते
****
भुई खिळलेले डोळे 
भाव पुसलेले खुळे 
तरी गंध परिमळे 
भरुनिया नभ निळे ॥१

नको सखी बाई अशी 
उगाचच शेला ओढू 
पापण्यात अडलेले 
काजळ ते उगा काढू ॥२

भेट तर होणारच 
जग फार मोठे नाही 
कोण भेटे कोण घटे 
नदीला त्या ठाव नाही ॥३

मागील ते जाऊ दे गं
सूर्य उगवतो नवा 
नात्याविन नाते कुठे 
शब्द कशाला ग हवा ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

शहर




शहर
*****
आता हे शहर खूप वेगळे असे वाटते 
आकाश इथले आता फाटलेले दिसते ॥१

माणसे आहेत खरी माणसासारखी जरी 
कोष कीटकांची जिंदगी हर दिनी वाढते ॥२

उजाडते कधी इथे कळेना मावळते कधी 
शुभ्र एलईडी प्रकाश घर अहो रात्र वाहते ॥३

आलो होतो इथे मी स्वप्न रेशीमसे पाहत 
कर्म जगण्याचे उरे स्वप्न गर्दीत फाटते  ॥४

सजण्याची स्पर्धा इथे कुणा मारते वाढवते
छाटण्याची भीती अन प्रत्येक फांदीस वाटते ॥५

क्रमप्राप्त आहे जगणे हा देहभार वाहणे
जग वेशी पलीकडचे परी आहे रे खुणावते ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

दत्त स्वप्न


दत्त स्वप्न
******
स्वप्नातला दत्त दिसावा सत्यात 
चिन्मय ते स्मित यावे हृदयात ॥

बालिश मागणे माझे विनविणे 
खरे व्हावे  देवा पाऊली पडणे ॥

सरो तन मन सारे धनमान 
भक्तीचेच देवा मज द्यावे दान ॥
  
अवधूत गाणे गुंजावे रे मनी
तयात सुखाने जावे मी रंगूनी ॥

विक्रांत इवले पाहतसे स्वप्न 
दत्ता तुच व्हावे जगणे जीवन ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

स्वामी राया

स्वामी राया
********
जन्म हा विकला तुज स्वामी राया 
तुझ्यावरी काया ओवाळली ॥१

किती सांभाळले आपदी रक्षिले 
येऊनी जपले कुण्या रुपी ॥२

दाखविला पथ यशही दाविले 
अपयशी दिले चटकेही ॥३

परी शिकविले जीवन दाविले 
धरून ठेविले दयाघना ॥४

आता करा देवा एक काम माझे 
दावी मज तुझे रुप डोळा ॥५

राहा निरंतर माझिया मनात 
चित्ती एकारत सर्वकाळ ॥६

विक्रांत जगाला स्वामी जगविला
स्वामीचाच झाला असे व्हावे ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

स्वप्न


स्वप्न
*****

रे तू माझ्या मनात आहे
हे तुजला माहित आहे 
डोळ्यातील स्वप्न माझे
नित्य तुजला पाहत आहे 

स्वप्न परंतु स्वप्नच असते
मना मोहून हरवून जाते 
आणि प्रभाती उठल्यावर
 तेच जगणे उभे ठाकते  

जगता जगता त्या वाटेने
तुज वाचून काही न रुचते 
तीच निराशा मनी दाटून 
प्राक्तन माझे मजला हसते

काय करू मी तुज भेटले 
तरी अजूनही नच भेटले 
नयना मधील भावभावना 
तव पदी का सुमन न झाले

तू न घेशील मज उचलूनी
जगणे नेईल दूर ओढूनी
सांग परी का कधी जाशील 
या हृदयातून प्रिया निघूनी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

नको मोक्ष

पाणी ओंजळीत
************
नको मज मोक्ष नसे स्वर्गी काज 
भक्तीचे ते व्याज सरू नये ॥१

सगुणी अखंड राहावा डुंबत 
दत्ताच्या रंगात रात्रंदिन ॥२

नको पैलतीर त्रासणे संसारी
सुखे ऐलतीरी जन्मा यावे ॥३

मागतो विक्रांत भाव सदोदित
पाणी ओंजळीत सागराचे ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

लाचावली जिव्हा

लाचावली जिव्हा
************
अन्ना लाचावली जिव्हा 
गेली चवीच्या गावाला 
ताट मांडूनिया तेच 
भूक लागे नाचायला ॥१

मृत संस्कार जुनाट 
आले देहात जन्माला 
षडरसी त्या रंगला 
प्राण तृषार्थ जाहला ॥२

मन ओढतसे मागे 
जिभ परी पटाईत
व्रत मोडूनिया म्हणे 
हीच जगण्याची रीत ॥३

कशी दत्ताची परीक्षा 
प्रश्न कठीण मठ्ठाला 
गुरु दिधल्या वाचून 
बळे लावी अभ्यासाला ॥ ४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...