शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

थांबणे


थांबणे
*******

जर मरे पर्यंत मी
अडकून पडणार असेल
त्याच त्या जगण्यात 
त्याच त्या शब्दात 
अन त्याच त्या आसक्तीत

व अचानक समोर 
येवून ठेपेल मरण
चल म्हणेन 
तेव्हा नसेल बहाणा 
नसेल कारण 
थांबायला .

कुणीच थांबू शकत नाही.

माझी कालची 
अर्धवट पडलेली कथा 
कवितेची अपूर्ण कडवी 
नाही पूर्ण होणार कधी

ती तर कधीच होत नसते .

जर कधीतरी थांबणेच आहे मला
जबरदस्तीने पूर्णविरामाने.
निरूपायाने वेदनेने
आक्रोशाने

तर मग थांबणे हसत
आधीच का शिकू नये मी?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

पदन्यासी

पदन्यासी
********

कुणाच्या पाऊली 
वाजती पैंजणे
उधळते गाणे 
पदन्यासी ॥१

काही मिरवणे 
होते हरवणे 
काही रे जगणे 
प्रकर्षाने ॥२

देह होतो सूर 
हरवतो जीव 
उलगडे भाव 
डोळियात ॥३

जग सदा अशी 
जग विसरून 
मेघ तो  होऊन 
आनंदाचा॥४

कोसळ अथवा
नको कोसळूस 
आर्द्रता सोडूस 
पण कधी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

दर्शन

दर्शन
******

ऊर्जेचे भांडार तुझिया दारात 
माझिया देहात  वीज झाले॥१

जाहलो तटस्थ उगा राहे वृत्ती 
आनंद आवर्ती  निश्चळसा॥२

दिधल्या वाचून दिले मज देणे 
जरी न मागणे मनी आले ॥३

कोण गे तू माय कुठे बसलीस 
वस्त्रन्ना देहास देती झाली ॥४

निर्धन हा रंक केलास सधन 
दिलेस दर्शन कृपाकरे ॥५

विक्रांत लेकरू अजून अजान 
कळेना गहन लीला तुझी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

क्षमा याचना

क्षमा याचना
**********

कधी निराशेचा आणि कटुतेचा 
क्षण अंधाराचा 
दाटताच ॥१

मुखा येती उगे शब्द ते वावगे 
उसळून वेगे 
रागावले ॥२

लागताच वन्हि जाळू घाले रान
विवेक जळून 
खाक होय ॥३

नको रागावूस तेव्हा मजवर  
दत्त प्रभुवर 
कृपा कर ॥४

तू तो दयावंत कृपाळू अनंत
घेई रे पोटात 
अपराध ॥५

विक्रांत शरण धरतो चरण 
क्षमेचे भूषण 
मिरवी गा ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

पुटी


पुटी
****
दत्त म्हणता म्हणता
दत्त स्थिरावतो चित्ता
 सार्‍या हरवती वृत्ती
 त्याची कणोकणी सत्ता 

अहं दत्ताचे स्फुरण  
ब्रह्म दत्त नाम दोन
म्हणा नभ वा गगन 
राही अवघ्या व्यापून

 दत्त जरी निराकार
घेई भक्तीने आकार
मन बुद्धीच्या अतीत 
 घेई पूजा उपचार 

ऐसा दत्त जाणवा रे 
सदा स्फुरणी ठेवावा 
असे सदोदित जिथे 
त्या त्या क्षणात पहावा

कोण पाहतो कोणाला 
प्रश्न थोरला उरतो
कोहं सोहं जळुनिया 
फक्त तोच तो राहतो 

काय सांगावे शब्दात 
वाचा वर्णाविन उगी 
नाम रूपाची ही सृष्टी
नाही विक्रांता रे जगी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

हाक


हाक
*****

माझी थकलेली हाक तव कानी 
पडेना अजुनि काय दत्ता?॥१

जळू गेले प्राण सरे माझी शक्ती 
रिक्ततेची भीती फक्त पोटी ॥२

हरवलो रानी धावे अनवाणी 
तुटल्या वाटांनी निशी दिन॥३

 बापा अवधूता किती कष्ट देशी 
परीक्षा पाहसी दिनाची या ॥४

मूर्ख शिरोमणी उद्दाम अडाणी 
विक्रांता जाणुनि क्षमा करी॥५

 नको धनमान नको यशोगान
दाखवी चरण एक वेळ ॥६

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

नसणे

नसणे
******

विक्रांत जगला अथवा की मेला 
दत्ताचा जाहला आहे आता॥१
कुणी ठेवो नावो कुणी गुण गावो 
चित्ता नाही ठावो कशाचाही॥२
नको धनमान नको यशोगान
दत्ताचे चिंतन पुरे मज ॥३
सरले कारण आता जगण्याचे
नाही मरण्याचे काम उरे ॥४
आहे तिथे आहे जाय तिथे जाय 
आणि सांगू काय मात इथे ॥५
घडले न काही घडणे न काही 
नसणे मी पाही माझे आता ॥ ६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘
 


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...