मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

डांगोरा

डांगोरा
******

दत्तभक्ती चा डांगोरा 
मी तो पिटतोय जगा
ढोल तुटका तुटका 
नाद उमटतो ढगा 

होते धडाम धुडूम 
नभी चकाकते वीज 
वाहे पापाचा तो लोंढा 
रुजे पुण्याईचे बीज 

देह दाटला व्यथांनी
जीव जातोय पापानी
नच मिटे खुमखुमी 
स्वर फुटतो तावानी 

दत्त धरतो पिटतो 
नाद डिबांग घुमतो 
दत्त डिपांग डिबांग 
महा कल्लोळ माजतो 

देह फुटणार कधी 
फुटो याच काजासाठी 
घुमे विक्रांत पोकळ 
दत्त प्रीत ओठी पोटी

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

कृष्ण गप्पा


कृष्ण गप्पा 
**********

खरंतर निळा निळा रंग 
कुठल्याच माणसाचा 
कधीच नसतो 
तरीसुद्धा आम्ही तुला 
निळ्या रंगामध्ये रंगवून
अद्वितीय म्हणून
आमच्यापेक्षा वेगळा करून 
ठेवला आहे सजवून.

 कदाचित तू असशील काळाही
पण आम्हा लोकांना 
काळेपण तेवढे आवडत नाही 
गोऱ्या त्वचेचे गारूड आहे आमच्यावर 
इथेही आड आले असेल कदाचित 
ते असो .
पण तुला निळेपण दिल्यामुळे 
तू आपोआपच निराळा झालास 
आमच्यापेक्षा दैवी 
देव देवाचा अवतार झालास 
अन माणसाला कधीच
देव व्हायचे नसते .

अरे हा मध्ये मी एक 
इंग्लिश पिक्चर बघितला 
त्याच्या मधला हिरो 
तो सुद्धा निळ्या रंगाचा होता 
आणि पिक्चरचे नाव सुद्धा 
अवतारच होतं 
हा हा हा !!

अपार्ट द जोक 
तुला निळ्या रंगात बघायला आवडतं लहानपणापासूनच
तुला अशा निळ्या रंगात बघायची 
सवय लागली आहे आम्हाला 
त्यामुळे तुझं निळ नसणं 
हे आम्हाला अतिशय  विचित्रसं
न पटणारं वाटतं 
अनैसर्गिक काही.

तसा देवा तू मला आवडतोस 
पण तुकाराम मीरा ज्ञानेश्वर नामदेव 
यांच्यासारखं तुझं वेड 
लागलं नाही मला 
का माहिती नाही 
तशी तुझ्यावर लिहिलेली गाणी 
पदे आणि अभंग 
ऐकतो वाचतो आणि गातो सुद्धा 
म्हणजे गाण्याचा प्रयत्न करतो 
वेड्यावाकड्या सुरात.

कधी कधी मला असे वाटते की 
आपले मित्र आपणच निवडत असतो 
त्याप्रमाणे तू आपले भक्त 
तू आपणच निवडत असावास 
आणि त्या निवडीमध्ये मी नाही 
हे मला माहित आहे 

वर्गातील हुशार मुलांच्या कंपूमध्ये 
आपण नाही हे समजून 
आपण त्या कंपूपासून 
जसे दूर राहावे 
तसा मी दूर आहे तुझ्यापासून 

तुझ्या हुशारीला 
अलौकिक प्रतिभेला
कल्पनेच्या बाहेर असलेल्या  
दैवी गुणांनी संपन्न नटलेल्या
व्यक्तिमत्त्वाला 
नतमस्तक होवून पाहतो.
मानवी गुणांची 
सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती झालेल्या
तुझ्या दिव्य जीवनाला 
पाहत दिडमुख होतो 
आणि दुरून वारंवार नमन करतो

का माहीत नाही 
पण माझ्या मनाने निवडला आहे 
दरी डोंगरात गुहेत राहणारा
ती खडावा घालणारा 
भगवे वस्त्र नेसणारा
खांद्यावर झोळी घेऊन 
गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून 
कधी हातात माळ धरून
कधी कमंडलू पकडून 
गावागावात फिरणारा भिक्षेकरी 
कसलेही बंध नसलेल्या 
कसलीही इच्छा नसलेला
आत्मरत वा समाधीस्थ 
कैवल्याचा झाड असलेला 
तो भगवान दत्तात्रय

हा आता त्याही कंपनीमध्ये 
तसा मी नाही खरं तर 
प्रवेश नाही आतवर
कारण त्या कंपनीचे नियम 
मला तर काही  नाही जमत
ते सोवळ्या ओवळ्याचे बंधन 
खरच अवघड जातं
मन कुरकुरतं
तरीसुद्धा तिथं माझं मन रमतं
गमतं आणि खरंच खिळून राहतं

आता तू म्हणत असशील
हे तू मला कशाला सांगतोस 
खरतर तुला सगळं माहित आहे 
पण आज बोलावसं वाटलं 
तुझ्याशी तुझ्याबद्दल 
लिहावसं वाटलं 
तुझा आज जन्मदिवस आहे ना म्हणून 

भाषणं करण्याची सवय 
लागली आहे थोडीफार 
त्यामुळे असेल.
पण खरं सांगू का 
मला अतिशय आवडणाऱ्या 
आणि प्रिय असणाऱ्या 
संतांना तू आवडतोस 
म्हणून तू मला आवडतोस. 
बाकी तुझा आकलन होणं
तुझी भक्ती मिळणं
तुझ्यात हरवून जाणं
हे काही नाही जमलं गड्या मला 
जमेल असेही वाटत नाही.
अर्थात माझ्या या 
जमण्या न जमण्याला 
आवडणे नावडण्याला 
काहीच अर्थ नाही 
काहीच किंमत नाही 
हे मुंगीचं बडबडणं आहे 
असं म्हणू या  हवं तर

बाकी तुझी गीता 
आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी 
हे माझे जीव की प्राण आहे 
हे तुला माहित आहे . 
ज्ञानेश्वर महाराजांचे नाव निघालं
आणि मन उचंबळून आलं
ज्ञानेश्वर म्हणताच 
मन हळवे का होतं
आनंदाने भरून जातं
कळत नाही
त्याच्या शब्दसृष्टीत शिरताच 
रममान होताच 
माझं मीपण हरवून जातं
काय होतं
हे मला कळत नाही 
हा ग्रंथराज माझ्या सर्व सुखाचा 
आनंदाचा स्त्रोत आहे 
यात संशय नाही.

असं म्हणतात की 
ज्ञानेश्वर माऊली तुझाच अवतार आहे 
तुझे स्वरूप आहे 
तूच ज्ञानेश्वर माऊली होऊन 
ज्ञानेश्वरी लिहलेली आहेस
तुझा जन्म आणि माऊलीचा जन्म 
एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर झाला 
त्यामुळे तो तूच आहेस 
तूच तो आहेस
अन मी तर ज्ञानेश्वर माऊलीचा आहे 
म्हणजे तुझाच आहे की.!!

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

मोह



मोह
*****

सारे माझे मोह 
मिटू दे दयाळा 
मनातून वेगळा 
करी मज ॥

कामनांचे जाळे 
सुखद ते किती 
परी अंती नेती 
खोल डोही ॥

लाळीले देहाला 
पंच इंद्रियाला 
देऊन तयाला  
हवे जेते ॥

परी त्याची काही 
मिटेनाची भीक 
अधिक ते सुख 
मागत असे ॥

जय यश कीर्ती 
दिसे किती छोटी 
काळ हरपती
 क्षण मात्रे ॥

विक्रांत जाणून
आला तुझ्यापायी 
सांभळून घेई
दत्तात्रेया ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

उत्तरेला

उत्तरेला (उपक्रमासाठी)
*********

दूरवर उत्तरेला 
खुळा जीव धाव घेई 
जन्मोजन्मीची आकांक्षा 
स्वप्न निगुढसे पाही 

उंच शिखरी बसला 
सखा जीवलग कुणी
त्याच्या भेटीची उत्कंठा
येई उरात दाटूनी 

रोज रोज मनी माझ्या 
एक उमलते गाणे 
खोल काळजात रूते 
शुभ्र काही जीवघेणे 

किती भोंगळ कल्लोळ 
चाले सभोवती असा 
आहे कागद सागर
जन्म चितारला मासा 

स्मृति मिटुनिया दार 
मिटू अस्तित्व पाहते 
तन मन प्राण सारे 
हिम शिखरी धावते 

हाक पेटली दबली 
घेई जळत उसळी 
दिशा बांधली अडली 
कळ विक्रांत अंतरी 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

एक मार्गी


एकमार्गी
********

अवघा साचला
भवती पसारा 
श्रीदत्त दातारा
मर्जी तुझी  ॥

येई जे वाट्याला 
कळू दे मनाला 
अलिप्त तयाला 
परी ठेवी॥

आहे तिथे असो 
देह माझा जरी
परी तू अंतरी 
भरून राही ॥

मग हा विक्रांत 
एकमार्गी होत
राहील स्मरत
तुज दत्ता ॥

🌾🌾🌾© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

ॐ कार गणेस

ॐ कार गणेश
***********

विश्वाचे हे बीज 
असे निराकार 
म्हणती ॐकार 
ऋषि तया  ॥

तयाने घेतले 
रूप हे साजरे 
गणेश गोजीरे 
प्रेमापायी ॥

प्रतिभा साकार 
प्रज्ञा अवतार 
सखा ज्ञानेश्वर 
तया वर्णी ॥

त्रिविध मात्रांनी 
जाहला ॐकार 
अ उ म हे स्वर
मिळूनिया ॥

अकार जणू की 
गणेश पावुले 
सुंदर सोनुले
शोभतात ॥

उकार जणू की 
गणेश उदर 
सुखाचा सागर 
मिरवता ॥

आणिक मकार 
मस्तक अपार 
वर्तुळ आकार 
विश्वव्यापी ॥

ययांनी येऊन 
ॐ कार होऊन 
टाकले व्यापून 
शब्दब्रह्म ॥

म्हणूनिया आद्य 
विश्वाचा या कोंब 
जाहला हेरंब 
सगुणात ॥

शोधता विक्रांत 
जन्माचे कारण 
देव गजानन 
दृश्य झाला ॥

जाताच शरण 
अभय देऊन 
दिले उघडून
मुलाधारा ॥

सुटता आधार 
रूपाचा गुणाचा 
देव गणेशाचा 
बोध झाला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

साहेब

साहेब
*****

केबीनमध्ये तुकडे मोडीत 
साहेब बसतो आकडेमोडीत 
तीच भाजी त्याच डब्यात 
हिरव्या नोटा पाही मनात 

बेसीन झाली पिकदानीगत 
उद्दाम भाव बनेल डोळ्यात 
आज जरासे कमीच पडले 
जळे काहीशी खंत मनात 

तसा सराईत बक्कळ धूर्त 
सावज हेरतो येताच आत 
हळूहळू मग जाळे टाकीत
ड्रावरपाशीच नेई ओढत

बधला नाही जर का पक्ष 
घालवून देई बिनदिक्कत 
बेपर्वा अन् मुजोर भाषेत 
कर्तव्याचा पण पाढा वाचत 

कैसा सापास चंदन कळतो 
निषाध हाती सज्जन पडतो 
किती युगांचे राज्य रावणी 
कधीतरी मग राम जन्मतो

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...