गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

शंभुच्या वेदना


शंभुच्या वेदना
*********

सत्तेचे कुतरे । जयाला चावले ।
तया न उरले । विषामृत ॥१
सत्तेसाठी होते। डोई टोपी गोल ।
आवडे हलाल । आपुल्यांचा ॥२
क्षण सुखासाठी ।भविष्याची राख ।
करती ते खाक। श्रेष्ठ मुल्य ॥३
कुठल्या मातीचे ।घडविले दत्ता ।
पापाचीही खंता ।ज्यास नाही ॥४
विक्रांत शंभुच्या । वेदनांचा भागी ।
ठेवी जखम जागी ।ह्रदयात ॥५

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

श्री शिव छत्रपती



श्री शिव छत्रपती महाराजांना
**********************

माझ्या राजा
तुझ्यासाठी
वाहिन मी
जीव पथी

आयुष्याची
कुरबानी
पुन्हा पुन्हा
करीन मी

पुन्हा येई
जन्म घे
खरा अर्थ
राष्ट्रा देई

देव देश
धर्मासाठी
येई राजा
आम्हासाठी

तुझे नाव
घेणारे ही
उरले ते
तुझे नाही

तुझे नाव
झाले इथे
एक नाणे
खणाणते

आणि आम्ही
तयाला रे
सदोदित
विकलेले

तुझा ध्वज
चारी खांदी
आडवीच
परि फांदी

जयकार
पेटीसाठी
खजिन्यात
कोटी-कोटी

लुटलो रे
तुझ्यासाठी
लुटणार
तुझ्यासाठी

एकदाच
पुन्हा येई
ह्रदयांत
अाग होई

विझणार्‍या
राष्ट्राला या
संजीवन
पुन्हा देई

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

दत्ता राहू दे रे जाग



दत्ता राहू दे रे जाग
***************
काळ्या काळ्या अंधारात
फणा धरलेला नाग
हातातल्या दिव्याला या
दत्ता राहू दे रे जाग     
 .
इवलेच तेल आहे
इवलीच आहे वात
धडाडून विझू पाहे
सावर दे तुझा हात 
 .
पायाखाली विंचू काटे
वाट मुळी नच दिसे
देई साद अवधूता
बोलाव रे तुझ्या दिशे
 .
घरदार सोडूनिया
बेभान मी निघाले रे
लोकलाज मानपान
चिंता नाही मजला रे 
 .
तुझ्या भेटी आधी पण
सरू नये तेल बाकी
काळोखाचा जय इथे
होऊ नये कधीच की
 .

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कधी मी दत्ताचा




कधी मी दत्ताचा
********
कधी मी दत्ताचा
कधी मी स्वतःचा
होऊनी जगाचा
भटकतो ॥

कधी मी शक्तीचा
कधी स्वरूपाचा
पांथस्थ वाटेचा
देवाचिया ॥

कधी मी रूपाचा
कधी अरूपाचा
आसक्त जगाचा
भासतोचि ॥

कधी सौंदर्याचा
कधी वैराग्याचा
साधक शब्दांचा
लीन होतो ॥

अवघे उदात्त
घुसे काळजात
ओढावतो त्यात
आपोआप ॥

जग म्हणू देत
अस्थिर विक्रांत
परि जगण्यात
दत्त आहे॥
.
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

तुझ्या दारी आलो






तुझ्या दारी आलो
*******************
चैतन्याच्या शोधात मी
पुन्हा तुझ्या दारी आलो
प्रेमाचा पाईक होत
शब्द उधळीत गेलो

सारे देणे असून ही  
हात तुझे थांबलेले
सारे घेणे असूनही
हात माझे बांधलेले

येणे माझे व्यर्थ नच
तुझे ते बोलावणेही
अप्राप्यचि क्षण होते
खरेच रे ते मलाही  

देई  पुन्हा कधीतरी
एकरुपता ती सारी
चांदण्याचा देह होवो
येताच मी तुझ्या दारी

असो सदा विक्रांत हा  
बघ वेडा तुझ्यासाठी
डोळीयांत तयाच्या त्या  
सदा जळो प्रेमवाती

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in
१६ .२.२०२०

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

बाप गजानन



बाप गजानन
राहतो उन्मनी
देह पांघरूनी
देहावर ॥
अति कनवाळू
त्रिकाळाचा ज्ञानी
लीलाधर मुनी
भक्त काम ॥
धावतो हाकेला
शरणागताला
अनन्य भावाला
भुकेला जो ॥
सोडा अहंकार
पडा पायावर
बाप हातावर
झेलीतो तो ॥
विक्रांत जाणतो
तत्व गुरुदत्त
तयाला मागत
आहे तेच ॥
***:
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

दर्शन



दर्शन
******
कृपेने दर्शन
आले ते घडून
प्रेमाने भरून
मन गेले ॥
अहो महाराज
बसवले पंक्ती
नसुनिया शक्ती
दान दिले ॥
क्षण सहवास
स्नेहाने दिलात
सुख हृदयात
उमलले ॥
घडे ना भाषण
साधना सांत्वन
उपदेश हान
शब्दे काही ॥
परि मी पातले
अंतरी जाणले
नाथे अंगीकारले
कृपा मूर्ती ॥
विक्रांत नाथाचा
जन्म ऋणाईत
बांधी खूणगाठ
मनामध्ये॥
.....
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह) ******* कशाला श्रावणा येशी माझ्या दारा  घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा  तुजला पाहता आठवते कुणी   एकटे पणाची खंत ये द...