शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

दत्त वादळ




दत्त वादळ
********

दत्त नावाचे वादळ
आले भाग्याने जीवनी
लाख जन्म साठलेले
गेले मळभ वाहुनी

झाली मोडतोड थोडी
थोडे धडेही मिळाले
व्यर्थ साठविले ओझे
दूर उडूनिया गेले

प्रेम वादळाचे होते
उग्र राकट प्रकट
भाव कोवळा ना तिथे
आत्मारामी थेट भेट

नेला कणकण असा
किती झालो नवनवा
दिव्य प्रकाशाने कुण्या
आत पाजळला दिवा

वर जगतही तेच
उरे विक्रांत ही तोच
तुटे बंधन भ्रमाचे
जन्मा आल्याची रे बोच

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१८

एक मुल



एक मुल
********
लांबरुंद पुलावर
कठड्याच्या सावलीत
एक बालपण होते
 गुमान भीक मागत

वय वर्ष फक्त तीन
मळलेले वस्त्र जुन
काळी पुट मानेखाली
पिंगट केस मलिन

हरवले डोळे कुठे
खेळ काही मनांमध्ये
यंत्रवत हात होते
आपटत भांड्यामध्ये

थबकले पाय काही
हात खिशातही गेले
नाणी खणाण करीत
तया भांडी विसावले

तया सुख नच दु:ख
भांडे होते आदळत
केसांचे भुरे जंगल
हवेमध्ये लहरत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

बूट हरवता





बूट हरवता
*************
सज्जनगडी बूट गेले
आणि चपला आळंदीत
परी माझे मी पण हे 
कसे राहिले रे अबाधित
बुटात असतो "मी "तर 
छान झाले असते की 
परतने जगी व्यर्थ या
मग झालेच नसते की.
चपलेचा अंगठा हे जर
असते अहम वावरणे 
किती छान होते असे 
चपला चोरीस जाणे
येतो जातो इथे तिथे 
अन मागतो मागणे 
घ्या हो माझे मी पण हे 
रिते रिते आहे होणे 
**
झटकतो कोणास कोण ?
झटकता उरेल कोॆण ?
प्रश्न ऐसा उभारताच
शून्यात हरवून गेले मन
बुटांमध्ये हरवला जो
बुटाविना दिसु आला 
विक्रांतचा ब्रॅण्ड नसला
विक्रांतला कळू आला
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

सुखाची सांगता





सुखाची सांगता
***********

सुखाची वाकळ
देही अंगभर
नीज डोळ्यावर
नित्य नवी

अहो मी भाग्याचा
पाइक यशाचा
भोगतो सौख्याचा
महापूर

जगणे पाहिले
जीवित्व जाणले
हर्षात न्हाईले
मन माझे

लागावी न दृष्ट
सुखाची सुखाला
मागतो दैवाला
कृपादान

मागण्या वाचून
इतुके मिळाले  
कृतज्ञ जाहले
घेणे माझे  

आता घडो काही
देणे याच हाता
सुखाची सांगता
सुखे व्हावी

करी घडीभर
विक्रांता सावली
कुणाच्या पावुली

देवराया 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

असे मरण यावे


असे मरण यावे
************
मरणालाही हेवा वाटावा
असे मरण यावे मजला
जिवलग कुण्या मिठीमध्ये
प्राण सुटावा देहा मधला

ओठावरती स्मित असावे
ओघळलेल्या सुमनांचे
ध्वनी वाचून काही कुठल्या
पाऊल पुढती पडो क्षणाचे

येणे जाणे सारे निष्फळ
अनंत लहरी इवला सागर
खेद खंत वा दुःख कशाचे
शीळ असावी या ओठांवर

वृक्षावर न व्रण उठावा
रव उमटावा वा भूमीवर
आता असावे पान इथले
वहात जावे कुण्या लहरीवर

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

नसलेपणाची वसने




स्वर्गीय सुरांनी
भरले काळीज
तरी कुजबुज
काही कानी

नसलेपणाची
नेसून वसने
घडे मिरवणे
कुठे काही

हसे ना बोले ना
कुणाचीच वाणी
भयाची कहाणी
कानोकानी

ओल्या पानावर
चालला संसार
हक्क वृक्षांवर
सांगे तरी

माझा मी पणाला
भक्तीचा आधार
कोसळे आभार
सावरावा

पण पडणारे
कसे थांबणार
जग नसणार
मानलेल


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

आला दत्तराज



दत्तराज


सुगंधे व्यापिला
मनाचा गाभारा
आला रे आला
दत्तराज

जन्माची ओळख
दिसल्या वाचून
गेला दाखवून
क्षणी पुन्हा

जुनाट देहाचा
चालला व्यापार
मनात काहूर
नवथर

अन् मागण्यात
फिरू लागे मन
होकारा वाचून
आश्वासने

जाहली सफल
काही धावपळ
काही वायफळ
निसटली

कृष्णेत बुडाले
काळोखले मन
अंतरी रिंगण
प्रकाशाचे

आता येणे जाणे
ओखट देहाचे
दार जाणिवेचे
उघडले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...