गुरुवार, २० एप्रिल, २०१७

तीच परी ती तू ती नाही




तीच परी ती तू ती नाही
*******************

तीच परी ती तू ती नाही
ओठ दुमडली हसली नाही

तशीच नाजूक अवखळ थोडी
परी ती गोडी दिसली नाही

अजून दिसते खपली दुखली
ओंजळ अजून भरली नाही

आता मी तो त्रयस्थ कुणी
नजर तुझी ती फिरली नाही

असे भेटता आज अवचित
खुळी पापणी मिटली नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


बुधवार, १९ एप्रिल, २०१७

वाया घालवला




वाया घालवला

दत्ते नादावला
वाया घालवला
इह दुरावला
भ्रांत पणे ||

आता मार बोंबा
कर तोबा तोबा
दत्तोबा दत्तोबा
साद घाली ||

गोळा करी श्वान
तुकडे घालून
मजेने कीर्तन
मग करी ||

भिकेची करोटी
घेवूनी हातात
घाल रे मातींत
बाप नाव ||

घालूनी लंगोटी
कुल्ले जागा दावी
फुकट घालावी
जिंदगानी ||

विक्रांत फसला
जगास कळला
दत्तमय झाला
मूढपणी ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


नवीन वेदना


काहीतरी कारण ती
जगायला शोधतांना
विस्कटल्या दिवसांना 
नीट रचू पाहतांना



भेटलीच तिला पुन्हा
एक नवीन वेदना
विझलेली आग पुन्हा
दिसे धगधगतांना

सावलीची मिठी जैसी
तना मनास स्पर्शेना
स्वीकारून सांत्वनाही
कधी सोबत येईना

कड्याकडे जाणारी ती
जणू काही धुंद वाट
जीव धावतो उनाड
वारा बांधून पायात

सांभाळ ग सखीबाई
दुनिया ही खरी नाही
वेड्या वेंधळ्या मनाची
धाव ही ग बरी नाही

इथे गोष्टी शापांच्याच
मनामनात नांदती
कथा चुकल्या पायांची
धडा होवुनी सांगती

सारे कर्मठ पिंजरे
लाल चाबूक गोजिरे
दाही दिशांना आरसे
मार्ग अडलेले सारे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

त्या एकाच क्षणासाठी






त्या एकाच क्षणासाठी
**************** 

त्या एकाच क्षणासाठी 
सार्थकतेच्या स्पर्शासाठी
लावूनी चूड सुखांना 
वेदनाच बांधल्या गाठी 

गात्रात विझल्या चिता
स्मशान सुनेच सारे 
तरीही सताड उघडे 
हे भिंगुळ पिंगुळ डोळे

हे शब्द पाझर कातळ
ठिबकती दुःख नितळ 
ओल पांघरून भिंती 
उगवती दारुण शेवाळ 

करुणेची बांधुनी झोळी 
कुणी गेला वाटेवरूनी
वा भासच हा मनकवडा 
मिरवतो नशा बांधुनी

वक्षात कुणाच्या व्यथा
रुतलेले पायच खोल
पाचूचे माणिक दु:ख
का नखी खरडते ओल

मिटणार कधी हा क्षोभ
विरहात विकल का व्योम
अगणित कृष्ण विवरे
गिळतात निनादी ओम

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, १५ एप्रिल, २०१७

एकांत



एकांत
*******
एकाचा जिथे अंत होतो
तो एकांत
जिथे नुसते निखळ अस्तित्व उरते
तो एकांत
बाकी मनाला शांत वाटते
निसर्गाचे सुख मिळते
प्रिया येवून भेटते
प्रेम शृंगार धीट होते
वगैरे वागिरे व्याख्या म्हणजे
एकांताला चिटकवलेले
मूर्खवत मुखवटे आहेत
दुसरा कुणीही नकोसा वाटणे
हा त्या मितीत होणारा प्रवेश आहे
असा एकांत उदय व्हायला
जंगलाची गरज नसते
ना गुहेची ना मठाची
मुमुक्षुत्वाची परिणीती
परमसीमा गाठते
प्रभूप्रेमाची चुणूक मनाला मिळते
आत्मप्रेम जेव्हा जागृत होते
तेव्हा ती स्थिती आपोआप उमटते
ती आणता येत नाही मित्रांनो  !!


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

निळूल्या ज्योतीचा



निळूल्या ज्योतीचा | निळूला प्रकाश|
भरले आकाश | अंतरीचे ||१ ||

तुवा दिले दान | सरले अज्ञान |
दु:खाचे प्रांगण | आक्रसले ||२ ||

अजुनी तरीही | आहे काही सल |
मनात शेवाळ | द्वेषाचे त्या ||३ ||

आपुलेच परी | किती दुरवरी |
तुटले अंतरी | आप्तजन ||४ ||

तुवा देवपण | देते जन मन |
सहिष्णुतेवीन | दिसे मज  ||५ ||

विक्रांत हा अज्ञ |पायी ठेवी माथा |
दिसो काही वाटा |बंधुत्वाच्या ||६ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

प्रवासी






एकटा चाले प्रवासी
स्वप्न राहिलेले दूर
माथ्यावरी ओझे अन
डोळी दाटले काहूर


सोडले जीवलग ज्या
भेटेल का तो प्रियकर
गाठण्या आधीच किंवा 

दाटून येईल अंधार

संध्याछाया भोवताली
नयनी दाटला पूर
व्यापूनी ह्रदयी आग
प्राण जाहले अधीर 


थकले हे तनमन
फुटूनिया गेला  उर
मिटती डोळे निजतो
फक्त तू  कृपा पांघर



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...