शनिवार, १९ मार्च, २०१६

तुमची खुर्ची



तुम्ही महाथोर
बैसला टिकून
खुर्ची सांभाळून
धन्यभाग ||
सह्यांचेच धनी
आज्ञेचे गुलाम
बांधिला लगाम
सदा नाकी ||
अहो इवलाले
झालात की प्यादे
खातात मलिदे
दुजे कोण ||
किती कष्टवाल
आपुल्या मनाला 
दिलेत रोगाला
आवतन ||
बीपी मधुमेह
ताण नि तणाव
बोनस हा राव
न मागता ||
अंकुशा वाचून
मिळतो न मान
कुंजर होवून
जाणीयले ||
ऐसे व्यर्थ राजे
आपुल्या घराचे
हुकुम जगाचे
डोईवरी ||
इवलासा मान 
डोईवरी काटे
अवघे ओखटे
कामकाज ||
ऐसे हे त्रांगडे
जमते जयाला
नमन तयाला
विक्रांतचे ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, १६ मार्च, २०१६

मजला दत्ता चालणे अजून



मासाचा तुकडा
माझिया मुखात
झुंबड चोरात
घार मीच ||

घेतली उपाधी
जमवून काही
माहितही नाही
ओझे किती  ||

धावतो उगाच
जगणे मनात
अडल्या पायात
कनक बेडी ||

अवधूत मार्ग
सरळ समोर
आणिक संसार
चिकटला ||

कुणाचा दिलासा
कुणाचा हवाला
परी काळजाला
शांती नाही ||

बरे हे भोगतो
उरले मी काही  
अन वाट पाही
सुटण्याची ||

तुझे चालू दे रे
वर्तुळी जगणे
पाच ठिकाणे
ठरवली ||

मजला दत्ता
चालणे अजून
प्राक्तन भरून
ठेवलेले ||

भेटू कधीतरी
कुठल्या वाटेला
आठव प्रेमाला
उन्यादुण्या ||

विक्रांत धावता  
दुनिया भोगता
उठतो पडता
दत्त कृपा ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे





मंगळवार, १५ मार्च, २०१६

दत्ता तुझी कृपा




दत्ता तुझी कृपा | म्हणून जगतो |
नाहीतर होतो | फुका गेलो ||१
कृपेचे किरण | दिलेस धाडून |
अवघे मिटून | खटाटोप||२
आजकाल रोज | सजवतो मन
असलेले तण | उपटून ||३
कधीतरी तूच | धावत येवून
नेशील ओढून | जाणतो मी ||४
घेतोय चाहूल  | हृदयी काहूर
खडावाचे सूर | ऐकायला ||५
विक्रांत शरण | देहाला लोटतो
दत्ता बोलावतो | हृदयात ||६

सोमवार, १४ मार्च, २०१६

वेड्यांच्या बाजारी



मुर्खाचीया बोंबा
ऐकतात कान  
दूरवर श्वान
तव बरे ||
मद भरलेला
कुणाच्या रक्तात
पडेल रस्त्यात
कधीतरी ||
रस्त्यावर घाण
जावी ओलांडून
नाकास दाबून
आपुलिया ||
तयापरी तया
त्यजियले मने
पिसाळले सुणे
समजून ||
मग अपमान
चिंध्या गुंडाळून
बसला रुसून
कोपऱ्यात ||
दत्ता दावियले
जग माजलेले
चित्ता सांभाळिले
सुखरूप ||
बसला विक्रांत
वेड्यांच्या बाजारी
दुनिया ही सारी
वगळून ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे



गुरुवार, १० मार्च, २०१६

नको रे समाधी











नको रे समाधी
मज अवधूता
भक्तीच्या वाटा
दावी फक्त  ||
प्रेमाने रडणे
नामात रंगणे  
द्वैतात नांदणे
सुखनैव ||
याहून अधिक
काही न मागणे
दिगंबर चिंतने
जन्म जावा ||
विरक्त मनाच्या
आकाशी रंगून
जिणे उधळून
मस्त व्हावे ||
विक्रांता लागला
चैतन्य लळा
हृदयी ठेवला
दत्त सखा  ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...