बुधवार, २७ मे, २०१५

कोंबडी ..





मरणाऱ्या कोंबडीचा आक्रोश
कधीच रश्यात उतरत नाही
अन तिची शेवटची तडफड
तवंग जराही हलवत नाही  

वजनावर आडवी ठेवे कसाई  
कधीच जीव म्हणून बघत नाही
अन मिनटात निष्प्राण होते
तरी कधीच काही वाटत नाही

मसाल्यातील मांसाच्या दरवळीने
भाकरी होईस्तो धीर धरवत नाही
तोच रानटी आदिम शिकारी
अजून मनातून हटत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २५ मे, २०१५

हो प्रेमगीत




 असे असू दे
तसे असू दे
शब्द तुझे
कानी पडू दे

बघ रागाने
बघ प्रेमाने
त्या पाहण्याने
धुंद होऊ दे

तव ओठांचे
तव डोळ्यांचे
कण प्रेमाचे
मज प्राशु दे

ये मिठीत
हो प्रेमगीत
झंकारुनी जे
गात्री भरू दे

 विक्रांत प्रभाकर
 kavitesathikavita.blogspot in 

शनिवार, २३ मे, २०१५

दिलपाके मेट्रन





दिलपाके सिस्टरांना पहिले की
मला आठवण येते ती
एका रानातील पावुलवाटेची 
वर्षोनुवर्ष पावुसपाणी उनवारा
सोसत उभी असलेली
घट्ट स्पष्ट पक्की
ठामपणे पुढे पुढे जाणारी
झाडाझुडपाची पर्वा न करता
चढ उतारांना दाद न देता
सारे जंगल आपल्यात
सहज सामावून घेणारी
प्रेमळ अन हळवी
कठोर पण रुळलेली
कधी गूढ तटस्थ
पण आपलीशी वाटणारी

बऱ्याचवेळा ही वाट
सरळ डांबरी राजेशाही मार्गांना
आपल्या पासून दूर ठेवते
त्यांच्याशी फटकून वागते
स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित ठेवत
निश्चित केलेल्या मार्गावरून चालते

ही वाट जाते
निर्जर जागेची भीती न बाळगता
फुलबागेची आशा न धरता
तकलादू खोटीनाटी तोरणं शोभेची
सहज झुगारून देते
हरवलेल्या पांथस्थाला जवळ करते
आईची माया देवून
गावात आणून सोडते

खरतर या रानवाटेला जायला
हा आडमार्ग जाणायला
सारेच घाबरतात
पण या वाटेची मवाळ माती
आणि हिरवी सावली
ज्यांना मिळते ते तिचेच होतात

आपल्या जवळून वाहणारी ही वाट
आता वळण बदलणार आहे
दूरवर आणखी कुठे
वेगळ्या दुनियेत जाणार आहे
तसे तर प्रत्येक वाटेशी
आपले नाते असते
कधी घडीभरचे कधी जन्माचे
पण या वळणाऱ्या वाटेशी
असलेले आपले ऋणानुबंध
आपले नाते
सदैव अक्षय राहावे
ही सदिच्छा बाळगून
पुनः पुन्हा भेटण्यासाठी
आपण तिचा निरोप घेवू यात

 विक्रांत प्रभाकर

गुरुवार, २१ मे, २०१५

मिटिंग



मिटिंग

प्रत्येक मिटिंग म्हणजे एक
पोटात कळ येणे असते
अन निष्पत्ति काय होणार
कधीच कुणा माहित नसते

तरी पण प्रत्येक वेळी
त्याची तयारी करावीच लागते
पेपर पाणी घेवून काखेत
चक्कर मारावीच लागते

तसे पाहिले तर मिटिंगीत
कुणी फाशी देणार नसते
बोलले जर फार कुणी
मना लावून घ्यायचे नसते

पण  पोटातील कळेपेक्षा
चकरा मारून जातो त्रासुन
रोज रोज धावून कावून
जातो पिकुचे बाप होवून

कधी फतवा निघेल ते
कुणालाही माहित नसते
अठरा वीर सज्ज सदैव
एक पावुल दारात असते

तरीही तीन वाजता रोज
मनामध्ये प्रार्थना उमटते
आणि पांच वाजल्यानंतर
मन उगाच भरून येते

पण शेवटी कळच  ती
तिचे काही खरे नसते
पेपर पाणि सज्ज ठेवून
सुसाटपणे निघणे असते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...