शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

एक छोटासा भ्रष्ट ..







फुकट काळ्या पैशाचा
राजमान्य भ्रष्टाचाराचा
एक प्रवाह छोटासा
बाजूनेच वाहतो आहे.
आणि तो बिनदिक्कत
त्यात पाणी भरतो आहे.
पापाची भिती नाही
चोरीची लाज नाही
प्रौढीने मिरवतो
अन मोठ्याने म्हणतो
इथे काय मी आज नाही...
..
तसा माणूस चांगला आहे  
मानतो देवाला
धावतो पूजेला
जातो नेहमीच शिर्डीला
येतो मित्रांस कामाला
प्रेमाने सांभाळतो
बायको आणि पोराला
..
म्हणतो मी तर प्यादे आहे
नव्हे छोटा उंदीर आहे
कुरतडतो उगाच थोडे
तिथे कळप अफाट आहे
..
दोन थेंब विषाचे पण
असतात खूप भारी
भले थोरले धूड ही
येते क्षणात भूमीवरी
हे त्याला कळत नाही
धनोर्मी मिटत नाही
..
वाटेमध्ये आलेल्यांना
अलगद दूर करायचे
नाही जमले तर
छान पैकी नडायचे
तंत्र सारी अवगत आहे
मंत्र सारी पाठ आहेत
त्याची गणित सौद्याची
अगदी पक्की आहेत
प्रत्येक व्यवहार सावध
डाव बेरकी आहे
कधी कुठला पत्ता काढायचा
त्याला माहित नक्की आहे
त्याच्या हाती कळ आहे
तो पाईपचा नळ आहे
इवलासा जीव परी
सारे आकाश पाताळ आहे

विक्रांत प्रभाकर



गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

पहाड..





एक पहाड अजस्त्र कातळी
दोन्ही हात पसरून
उभा आहे कधीचा   
सारी वाट अडवून
प्रत्येक प्रहार आवेगी
सपशेल व्यर्थ करणारा
छिन्नी हातोडी पोलादी  
प्रत्येक भग्न करणारा ...
खुंटलेली हरेक वाट
वळून वाकवून फिरफिरून   
तिथेच येते अगदी काहीही करून  ..
खेळा अलिकडे हवे तेवढे
रस..रंग..रूप.. मेळा
नाव..सत्ता..प्रतिष्ठा..
कितीही करा गोळा
मातीला तुमची कीव येईपर्यंत ..
पुढे जायच्या पण नकोच बाता.
एक म्हातारा थरथरत्या मानेचा
तेवढ्यात न कळे येतो कुठून
अनघड गोष्ट एक सांगतो रंगवून
पटते जी नच पटून
मनात बसते पण खोल घुसून
तो सांगतो.. 
कुठल्यातरी गूढ रात्री
वितळतो पहाड पुढे सरते वाट 
अन पुढे गेलेला वाटसरू
येत नाही कधीच परतून
त्यासाठी पण
प्रत्येक रात्र जागे राहावे लागते
अन आपण आपल्या पाहण्याला
सदैव पहावे लागते

विक्रांत प्रभाकर






मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

लग्न ...




लग्न का असत नाही
एक निखळ वैयक्तित निर्णय
आईबाप सगे सोयरे
यांनी गळ्यात बांधलेल्या
वांझ अपेक्षांच्या ओझ्या शिवाय
एक विमुक्त नाते
का जुळू शकत नाही इथे ?
मान्य आहे प्रत्येकाला
घर हवे असते
मुल हवे असते
समाजात प्रतिष्ठेने
जगायचे असते
पण म्हणून या दुनियेच्या
हजारो निकषांनी आणि
हजारो अपेक्षांनी   
वाकवलेल्या पाईपमधून
सरपटत जायलाच हवे का ?
लग्नाच्या बाजारात
प्रेमाच्या चिंधड्या होतात 
मनाची लत्करे उडतात
सारे सुंदर हसरे जग
भेसूर दिसू लागते
तरीही
गळ्यात टाय बांधून अन
भरजरी साडी नेसून
ते उभे राहतात त्या बाजारात
पुढे ते ही जगतात
संसार करतात
सुखी असल्याचे दाखवतात
पण गंधहीन फुलांचे ताटवे असतात
सारीच मनस्वी मिलन
यशस्वी होतात असे नाही
त्यांच्या जीवनात संघर्ष
नसतात असेही नाही
पण ते जगतात तेव्हा
ते आकाश त्यांचे असते
त्यांची दिशा त्यांचे फुलणे
त्यांनी ठरविलेले असते
ते जगणे सुगंधी असते

विक्रांत प्रभाकर


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...