बुधवार, १६ जानेवारी, २०१३

बंदुक आणि शब्द







असा निराश होवू नको    

असा उदास होवू नको

हातामध्ये बंदूक घ्यायची

वेळ तर आणूच नको

भ्रष्टाचाराच्या बाजारात

सत्तेच्या दलालात

जीव पिसून गेला आहे

प्रत्येक हाताला कुठेतरी

कधी डाग लागला आहे

पापी कोण हे त्या

बंदुकींना कळले तर

भरल्या बंदुका नक्कीच

उलटतील घेणाऱ्यावर

माझ्या मुळे सत्ता आहे

मीच व्यवस्थेची वीट आहे  

मीच मला सांगा कसे

उपसून दूर भिरकावणार ?

या जगात नाही केवळ

एकच पिसाट तुझ्यागत

इथे तिथे आहेत

हजार वेडे धडाडत

बोलत नसले तरीही

अन्यायाशी झगडत

ती ताकत त्यांना आहे

तुझ्या शब्दातून मिळत



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १३ जानेवारी, २०१३

म्हातारपण





पिकलेल्या फळासारख

असाव म्हातारपण

मधुर हळव रसरसलेल

हळू हळू आपणच आपल

आंबटपण टाकलेलं

उन वारा पाऊस खात

आयुष्य जाणून घेतलेलं

तारुण्यातील निबरता

विसरून गेलेलं

सहजच आणि आता

मृदुता धारण केलेलं

जपायचं तेवढ जपलं

मिळवायचं तेवढ मिळवलं

वाटायला आता अधीर,

उत्सुक असलेलं



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १२ जानेवारी, २०१३

देवाकडे पाहू नका



देवाकडे पाहू नका
भाव भोळा आणू नका
व्यवहारात भावनेचा
घोळ उगा घालू नका ll ll
देव सदा उभा आहे
पण हाक देवू नका
जन्माची वाट लागेल
भुली त्याच्या पडू नका ll ll
हळू तो मनी शिरता   
जग निरर्थ दिसेल  
कमावलेले अवघे
मग नकोसे वाटेल   ill ll ll
माझे जरा नीट ऐका
अशी चूक करू नका
सुखी तुमच्या संसारा
आग उगा लावू नका ll ll
देव छान मंदिरात
वा दिसे देवघरात  
आणताच जीवनात
समजा गेला खड्ड्यात   ll ll
काम धंदा रोजगार  
सारा सुटून जाईन
पैश्यापाण्याविना तुम्हा  
भीक मागणे उरेन ll  ll
बायको पोरे मित्रादी
सारी दूर लोटतील  
घेणाऱ्यांच्या जगात या  
तुमचा कोण राहील   ll ll
पूजाअर्चा दानधर्म
कथा व्रते यात्रा करा
वरवर पण जरा
मनी देऊ नका थारा  ll ll

विक्रांत प्रभाकर  
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १० जानेवारी, २०१३

स्मर्तृगामी प्रभू





काय तुझी देवा|सरली ती दया|मज गरीबा या|लाथाडीसी ||||

अहो चक्रपाणी|कमंडलू धरा|पदीचा आसरा|द्यावा मज ||||

नको धन मान|नको यशोगान|पायीचा तो श्वान|करी मज ||||

बोधिले यदुशी|तैसे अंगीकारा|संसार पसारा|आवरा हा ||||

स्मर्तृगामी प्रभू|ऐशी तुझी कीर्ती|आणि टाहो किती|फोडावा मी ||||



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

लिहायचे कुणासाठी




लिहायचे कुणासाठी

लिहायचे कश्यासाठी

शेवाळल्या तळ्याकाठी

जड जड झाली दिठी

सुकलेल्या पानावरी

उदासली सांज सारी

मनातली अक्षरे ही

मनाआड गेली सारी

वेदनांत मरतांना

वेदनांचे गाणे झाले

ऐकतांना दूर कुठे

कुणा डोळी पाणी आले



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...