शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

अश्रू

अश्रू (उपक्रमा साठी)
*****

आज-काल डोळ्यात या
अश्रू मुळी येत नाही 
हरवल्या भावना का
काहीच कळत नाही

काय झाले मनाचे या 
स्वप्न खोटी वाटतात
दया प्रेम  करुणा हे
शब्द फोल भासतात 

मरतात बालके ती 
युद्धात होरपळूनी
जळतात तरुवेली 
आग ती लावुनी कुणी

कत्तलीला राजरोस 
धर्म रूप देते कुणी
कलेवर कोवळी ती 
घेतात ओरबाडूनी 

तरीसुद्धा मनात या 
न येते दुःख दाटूनी
चालणार जग असेच 
जणू येतसे कळूनी

पेटूनी रक्तात क्रोध
येतसे कधी भरुनी
परी होत हतबल 
जातसे व्यर्थ विझुनी 

निष्टुरता जगताची 
सांगतोच इतिहास
आटतात डोळे मग
होवून उगा उदास 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

ठसा (CLHIV)

ठसा (CLHIV)
************
मृत्यूचा ठसा देहावर उमटूनही 
जन्मलेले जीवन 
हसते प्रसन्नतेने खेळते आनंदाने 
जगते सुखाने 
कारण तो ठसा म्हणजे 
नसते मरण 
इथे असते केवळ जीवन
कालातीत 
या क्षणात संपूर्ण 
थोडीशी इच्छा थोडे नियोजन
थोडी औषध थोडेसे विज्ञान
येते मदतीला अन्
विरत जातो तो शापित ठसा 
जणू नसल्यागत नगण्य होत 
वेगळी असतात तिथली आव्हान 
दुःखही येतात सावली होऊन 
अन् मर्यादा आखून 
नियम पाळून 
जगावे लागते हे ही खरे 
पण एक चैतन्य भरले
संपूर्ण जीवन असणे हातात   
याहून श्रेष्ठ गोष्ट 
कुठलीच नाही जगात 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

भेट

भेट
****
पुन्हा एका वळणावर 
भेटलोच आपण 
अर्थात तुझ्यासाठी त्यात 
विशेष काही नव्हतं 
एक मित्र अवचित 
भेटला एवढंच 
माझंही म्हणशील तर 
तसंच काही होतं 

फार काही उरलं नाही 
मिळवायचं आयुष्यात 
आहे संतुष्ट बऱ्यापैकी 
जे काही मिळालं त्यात 
जर तर चे तर्क काही 
नाही उमटत मनात 
तर आता  फक्त एक
औपचारिकता तुझ्यामाझ्यात

अन त्या कवितांचं म्हणशील 
तुझ्यासाठी लिहिलेल्या 
होय आहेत अजून 
त्या माझ्या जुन्या डायरीत 
आज बघेन म्हणतो त्यांना मी 
पुन्हा एकदा शोधून 
माझी खात्री आहे 
त्या तिथेच असतील अजून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

पावूस परतीचा

पावूस परतीचा
**************
पाऊस परतीचा 
भिजलेल्या प्रीतीचा 
दान सर्वस्वाचे
देण्याच्या वृत्तीचा 

पाऊस परतीचा 
चार पाच दिसांचा
असंख्य भुरभुरत्या
मुलायम आठवांचा 

पाऊस परतीचा
अनावर ओढीचा 
निसटल्या क्षणांच्या 
हळुवार मिठीचा 

पावूस परतीचा
भिजलेल्या मातीचा
फोफावल्या गवतात 
बहरल्या स्वप्नांचा 

परतीच्या पावसात 
मन भरे काठोकाठ
अलगद ओघळते
काही दाटलेले आत

परतीच्या पावसात 
चिंब भिजून घेतो  
अन् गीत राहिलेले 
पुन्हा गावून घेतो 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

एक बाल कविता

 
 एक बाल कविता 
घाबरगुंडी 
*****************
उंदीर बघुनी ताई ची 
ती घाबरगुंडी उडाली 
धूम ठोकून ती तो 
कॉट वरती चढली 

आवाजाने त्या गादी 
मागील पालही घाबरली 
सरसर करत ती मग 
माळ्यावर धावली 

पाल पाहून ताई ची 
बोबडीच वळली 
अन आईच्या अंगावरती
तिने उडी मारली 

तोल आईचा गेला ती 
पडता पडता वाचली 
एक धम्मक लाडू घेऊन 
ताई रुसून बसली
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कवी सुनील जोशी

 
कवी सुनील जोशी एक आठवण
******************
या माणसाला 
मी कधीच भेटलो नाही प्रत्यक्षात 
तसे फोन कॉल झाले होते काही क्वचित 
पण हा माणूस भेटायचा 
त्याच्या कवितेतून नियमित 
त्याचे प्रेम होते राधेवर कृष्णावर
तसेच भाषेवर आणि शब्दावर 
अगदी शब्दातीत 
कुठलाही शब्द प्रसंग चित्र मिळणे
हे जणू व्हायचे एक निमित्त 
मग बसायच्या कविता 
जणू की पाऊस 
कधी रिमझिमत कधी कोसळत 

पण का न माहीत
दुसऱ्याच्या कवितेवर 
ते सहसा प्रतिक्रिया देत नसत 
आपल्या कवितेत बुडून गेलेले 
आपल्या रंगात वाहत असलेले
त्या स्व कवितेतून बाहेर पडायला 
फुरसत नसलेले 
आत्ममग्न शब्दमग्न व्यक्तिमत्व होते ते 

कविता क्वचित कुणाची अमर होते 
किंवा कालौघात थोडीफार टिकते 
अर्थात कविता लिहिणाऱ्याला 
त्याची मुळीच पर्वा न असते 
तसाच सुनील जगला 
त्या कवितेच्या विश्वात राहिला 
सदैव शब्दरत साधनारत 
मला वाटते हे असे जगणे 
यातच कवी होण्याचे सार्थकत्व असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

कार्यकर्ता अन् पोट

कार्यकर्ता अन् पोट 
***************
मला नेहमी एक प्रश्न पडायचा 
या कार्यकर्त्यांचे पोट कसे काय भरत असेल 
ते साहेबांच पत्र घेऊन धावणारे 
विविध कार्यालयात फेऱ्या मारणारे 
आवाज करणारे विनंती करणारे 
आडनावा प्रमाणेच पक्ष असणारे 
काहींचे तंत्र विनंतीचे काहींचे तंत्र दबावाचे 
तर काहींचे दादागिरीचे पण सगळ्यात मोठे तंत्र 
मोबाईलवरील साहेबाच्या नंबरचे 
आणि डीपीवरील साहेबांच्या फोटोचे 
तर मग असाच एक कार्यकर्ता झाला 
ओळखीचा अन मैत्रीचा 
त्याला विचारला प्रश्न मनातला 
त्यावर तो हसला आणि म्हणाला 
या भानगडीत नकाच पडू साहेब 
पण सोपं गणित आहे मोठा वाटा छोटा वाटा 
लहान वाटा किंचित वाटा संपले गणित 
कळले तर कळले नाही तर द्या सोडून 
तसे भेटतात काही साभार आभार 
त्यात काम होऊन जातं 
लोकांचं काम होतं साहेबाचं नाव होतं 
आपलं निभावून जातं
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...