शनिवार, १९ एप्रिल, २०२५

धावणे

धावणे
.*****
नको नको वाटते आता हे धावणे 
उगाच वाहणे दिनरात ॥

मातीवर माती थापूनिया माती 
होऊनिया माती जाणे-अंती ॥

भंगुर सुखाची मांडली आरास 
झाकून दुःखास ठेवलेली ॥

परी चाखताच चव कळू  येते
गळून पडते आवरण ॥

काय अवधूता सरेल हे स्वप्न 
उजाडून दिन कधीतरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

 

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

अधिकार

अधिकार
*******
जाणतो मी दत्ता माझा अधिकार 
झालो भुमिभार तुजविण १

मजहून श्वान बरे भगवन 
पदी ते येवून बसे सुखे २

मज नाही ठाव कुठे तुझा गाव 
ज्ञानाचा अभाव सर्वकाळ३

घर नाही दार फिरे वणवण 
देहाला धरून रात्रंदिन:४

तूच तुझी वाट दाखव रे आता 
सरो आटापिटा संसाराचा ५

विक्रांत निरर्थ फिरे गरगरा 
धाव घे वासरा- साठी  माय ६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

सूर्य

सूर्य 
****
दिशा पेटवून सूर्य 
होताच नामा निराळा 
ती वाट दिगंतरीची 
करुनी पायात गोळा ॥

ते स्वप्न चांदण्याचे
त्याला कसे कळावे 
मिरवून भास सारे 
गेले जिरून उमाळे ॥

होतेच रंग ते त्याचे 
ठाऊक त्या का नव्हते 
प्रत्येक अभ्रावरती .
अस्तित रेखले होते ॥

तो हट्ट विरक्त भगवा 
ती उग्र भव्य तपस्या 
चालणार किती युगे 
उरेल कोण पहाया ॥

मिळतो पूर्ण विराम 
हर एक आकाराला
शून्यास अर्थ असतो
का नसे ठाव कुणाला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

बाबा

प्रिय बाबासाहेब 
***********
कृतज्ञतेच्या किनाऱ्यावर येवुन 
तुम्हाला करतो आहे मी अभिवादन 
कुठलाही रंग कुठलाही झेंडा 
हातात घेतल्या वाचून 
तुम्ही  सागर आहात म्हणून 
तुम्ही आभाळ आहात म्हणून 
मनामनातील मनुष्य धर्माचे
तुम्ही शिल्पकार आहात म्हणून 

तुम्हाला अभिप्रेत असलेले जग 
आहे प्रतीक्षेत अजून 
तुम्हाला हवे असलेले बदल 
तसे जुबबी आहेत अजून 
संपूर्ण एकतेचे समानतेचे 
अवतरण बाकी आहे अजून 

पण इथे जे झाले आहे 
ते ही शब्दातीत आहे
शोषितांचे उत्थापन ही
एक क्रांतीच आहे 

एक चीरा खाली पडतो
तेव्हा बुरुज जातो ढासळत
माणसाला विलग करणारे 
ते तट होतीलच नेस्तनाबुत 

कारण तुमची स्वप्न ही
एका दृष्ट्याची स्वप्न आहे. 
आणि ती पूर्ण करणे हे 
दृष्टअदृष्टाचे कर्तव्य आहे.

माझ्या मनात उमटणाऱ्या 
त्या स्वप्नांच्या प्रतिबिंबासकट 
तुम्हाला पुन्हा पुन्हा नमन.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

माय

माऊली
*******
चालव माऊली तुझ्या वाटेवर 
जन्म पायावर उभा कर 

रांगलो बहुत घेऊनी आधार 
इथे आजवर काल्पनिक 

भयभीत जिणे चाललो चाकोरी 
दृढ व्यवहारी चिटकून 

कळू कळू येते माझे वेडेपण
झापड लावून चालणे ते 

कानी येते काही मंद तुझी साद
स्वप्न हृदयात उसळते 

पाहू नको अंत तुझ्या लेकराचा 
आक्रोश जीवाचा शांत करी 

करी तडातोडी पायीची ही बेडी 
येवुन तातडी कृपा कर 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

भेट

भेट
***
तुझ्या डोळ्यांचे काजळ 
आणी जगात वादळ 
तुझ्या डोळ्यातील धार 
करी काळजात घर ॥१
नाते तुफानाचे तुझे 
गीत स्वच्छंद धारांचे 
देही भिनलेले वारे 
मनी पिसारे स्वप्नांचे ॥२
घोर वादळी तरीही 
ज्योत प्रेमळ निर्मळ 
आभा मिरवे कोवळ 
तेज प्रकाश सोज्वळ ॥३
तुझे येणे होते मनी 
जणू पागोळ्याची गाणी 
देह भिजल्या वाचून 
भरे ओंजळ स्पर्शानी ॥४
भेट क्षणाची मनाची 
जणू शुभ्र दामिनीची 
क्षण भेटीत अद्भुत 
घडे वर्षाच सुखाची ll५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

देणे

स्वाहा
****
हात लावता आगीस
बसे चटका जीवास 
खेळ नाही रे हा सोपा 
जन्म लागतो पणास ॥

ज्याला हवी उब थोडी 
त्याने दूरच राहावे 
तेल शोभेस उगाच
वर वर ना टाकावे ॥

असा पेटवून जाळ
मजा बसणे पाहत 
बरा नव्हे वेडेपणा  
खेळ पडे महागात ॥

स्वतः जळणे आणिक 
जगा जाळणे उगाच 
व्यर्थ मिरवणे असे
नच घडावे कधीच ॥ .

इथे सर्वस्वाचे देणे 
स्वाहा स्वधा स्वतः होणे 
नव्हे लौकिक बाजारी 
हे तो ईश्वराचे देणे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...