गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

बाजार

दत्ता .
****
कसे आळवू तुला मी
या संसार कबाड्यात 
कसे शोधू तुला मी
या रोजच्या बाजारात ।

इथले हिशोब तेच जुनाट 
चालतात दिनरात
तीच बोली तोच भाव 
तोच रडेल चिडेल डाव ।

कधी खाली कधी वर 
आकडे हलत राहतात
खाली कुणाचे खिसे तर 
कुणाचे  तुडुंब भरतात

गुंजु दे रे तुझे नाव 
अखंड या गात्रात 
वाहू दे रे तुझे चरित्र
सदैव कणकणात 

कधीही न पडो वाटे
विसर तुझ्या प्रीतीचा
पण घोंगावतो भोवती
कल्लोळ स्वार्थी जगाचा

या दोघांचा मेळ देवा
मी रे कसा घालणार 
सभोवतालचा बाजार
हा तुच आता आवर
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

तुज स्मरता

तुज स्मरता
*******
तुज स्मरता स्मरता माझा सरला एकांत 
स्मृती एकेक लाघवी आली फुलून मनात 

झाले आकाश कुसुंबी रूप भरले दिशात 
किती न्याहाळू कुणाला मन विखुरे कणात 

तूच चंद्र सूर्य तारे तूच तेज गंध वारे 
स्पर्श रोमरोमी निळे माझे अस्तित्व थरारे 

शुभ्र पुनवेची रात्र कृष्ण झावळ्या नाचऱ्या 
पाना पानावर किती तुझ्या मोहक सावल्या 

लाटा मंथर पाण्यात रव इवला खळाळ
ओली पाऊले वाळूत आणि थांबलेला काळ 

नुरे अस्तित्व हे माझे गेले विरून तुझ्यात 
गूढ तृप्तीचा हुंकार माझ्या उतरे देहात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

दार

दार
****
माझ्या मना बंद कर 
दार खिडक्या हजार 
लाख दृश्य जगताची 
किती फसशील बरं ॥१

दिसण्याला अंत नाही 
प्रकाशाची येरझार
 बघ निहाळून नीट 
कोण धावतो चौखुर ॥२

सारा कोंडलेला आत 
तोच जगाचा बाजार 
धूळ बसू देत खाली 
मग दिसेल आकार ॥३

दत्त करुणा अगाध 
मिटू लागताच दार 
वृक्ष चैतन्याचा आत 
दिसे कोंदाटे अपार ॥४

नीट पाहता शोधून
काही आत ना बाहेर 
दृष्टी असून नसली 
जाते हरवून द्वार ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

लायक

लायक
******
जाणतो मी माझे मन काळे दत्ता 
स्तुती आइकता खंत वाटे ॥१

तेच दाटलेले मोहाचे आभाळ 
डोळ्यात काजळ अनुरागी ॥२

तीच ती आसक्ती सदा भुलविते 
वाट चुकविते वारंवार ॥३

चाले पथावर तुझ्या हेच सुख 
चालती अनेक भाग्यवंत ॥४

त्यात मी एक जाणतो पतित
पथ आक्रमित वाटसरू ॥५

येथ चालण्याला करी रे लायक 
भेटीचा चातक चित्त शुद्ध ॥६

विक्रांत पेटारा काम क्रोध भोगी
रिता कर वेगी दत्तात्रेया ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ५ जानेवारी, २०२५

निरोप


निरोप
*****
अटळ असतात निरोप काही 
जीवन वाहत असता प्रवाही 

कधी सुटतात सखे जिवलग 
कधी तुटतात प्रिय नातलग 

नसूनही इच्छा देण्यास निरोप 
दुरावले जाती पथ आपोआप 

किती खेळगडी किती सवंगडी 
निरोप घेऊन सुटू जाते गाडी 

असंख्य निरोप खोल अंतरात 
वियोगाचे अश्रू राहती ढाळत

पुन्हा पुन्हा स्मृती मनी उजळत
स्वप्न भेटण्याची राहते पाहत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

खेडेकर सिस्टर

खेडेकर सिस्टर
***********
कधी चालतांना एखादा खळाळता निर्झर  
 यावा डोळ्यासमोर अन प्रसन्न व्हावे अंतर 
तसे होते जेव्हा भेटतात कधी खेडेकर सिस्टर 
आपल्या निर्मळ हास्याचे विखुरत तुषार 
अन लाघवी बोलल्याने मिळवत प्रेमादर 
त्या होत्या वावरत एक अख्याईका होऊन 
आपल्या सोबत 
कुणाचे शत्रुत्व न घेता कुणाचे वैर न पत्करता
येते जगता शांतपणे आपल्या चाकोरीत  
याचा एक वस्तूपाठ होत्या खेडेकर सिस्टर 
कर्तव्यात कसूर नव्हती घरी आणि दारी 
म्हणून घरच्या तीनही वेली गेल्या गगनावेरी 
खरंतर जग जिंकणं सोपं असतं पण 
मन जिंकणे अतिशय खडतर 
जग जिंकायला करावे लागतात युद्ध 
पण मनं न लढताच जिंकावी लागतात
समोर ठाकलेली अंगावर आलेली युद्ध 
सीकारून त्यांना देणे कलाटणी मैत्रीची स्नेहाची 
हे कसब सहजच साधले होते त्यांना
त्यामुळे अजातशत्रूचा किताब 
सहजच शोभून दिसतो त्यांना
लहान सहान वाद मतभेद
कर्तव्यातील नियमात परखड बोलणे 
घडत असेलही कधीकाळी
 पण त्यात वैयक्तिक स्वार्थ नसल्याने 
वाद वितळायचे  शरदातील मेघासारखे 
अन उरायचे नितांत निळे मोकळे निर्मळआकाश 
सारे व्हायचे कुठल्याही अट्टाहासाविन अनायासे
 म्हणूनच हे वेगळेपण हि निर्मळता 
उमटते त्यांच्या  हास्यात मोगऱ्याच्या फुलागत 
सारे वातावरण मधुर करून टाकत 
आता हा स्मितांचा काफिला होत आहे निवृत्त 
दूर जात आहे आपल्यापासून 
त्यांना ही सदिच्छा की
तुम्ही रहा अशाच झऱ्यागत लहरत 
सुमनागत जगाला आनंद आमोद देत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

गुजगोष्टी


गुजगोष्टी
*******
कुणा फळले जन्म इथले 
जगून मेले जग सरले १

तरीही स्वप्ने जगती त्यांची 
काही उद्याची काही कालची २

रे भानावर ये लवकर 
काही खरे ना मुक्कामावर  ३

हित तुझे रे तुझ्याच हाती 
तुटू सुटू दे आतील गाठी .४

फक्त कळावे याच कारणे 
जन्म जीवन व्हावे वाहणे ५

शब्द भरणी गातोय काही 
गळाखरड ही फुकट नाही ६

 जळे काहूर आत अपार 
खरेच बाता नाहीत यार ७

कळो तुजला खुणा त्यातल्या 
 गुजगोष्टी ज्या हृदयी लिहिल्या ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...