मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

पुणे शहर


पुणे शहर
*******
सरले मिटले काल पुजियले 
माथी मिरवले मातब्बर ॥
जुनाट वाड्यांच्या काल झाल्या चाळी 
इमारत ओळी आज उभ्या ॥
नाव गाव गेले बखरी लिहिले 
पराक्रमी झाले कारकून ॥
कुणाच्या रक्ताने कोण राजे झाले 
ऐश्वर्ये वाढले होते कोण ॥
अजून चालती फुटलेली नाणी
कुण्या पूर्वजांनी वेचलेली ॥
चार गुंठियाचे चार कोट झाले 
पूर्वज पावले अनेकांना ॥
चाले गजबज पुराण शहरी 
शेजारी पाजारी हरवले ॥
काळाची पाऊले कुणाला कळती
घडती मोडती किती जग ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

मागणे

मागणे
*****
आता माझे हे एकच मागणे
दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥

हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त 
स्पर्शात दृष्टीत भरावा तोच ॥

देहाची या माती पडो तया पदी
अन्य काही गती नको मुळी ॥

तयाच्या प्रीतीस व्हावे मी उत्तीर्ण 
सार्थक जीवन होऊनिया ॥

विक्रांत लाजतो देह हा वाहतो 
उदास जगतो दत्ता विन ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 kavitesathikavita. .   
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

रंग

रंग
****
एक माझा रंग आहे 
रंग माझा मळलेला 
लाल माती चढलेला
भगव्यात गढलेला ॥

आत एक धिंगा चाले 
मन एकांतात रंगे
घरदार अवधूत 
स्वप्न झोळीतील जागे ॥

लाख लाटा प्रवाहात
कल्लोळ नि दाटलेला 
कणोकणी नाद तोच 
माझेपण मिटलेला ॥

तोच रंग तोच गंध 
दत्त सखा खेळे संग 
तन मन सुटलेले 
वाट पावुलात दंग ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

मागत आहे

मागत आहे
**********
या माझ्या नीरस जगण्यात 
तुझे गीत मी गात आहे 
या माझ्या फुटक्या भांड्यात 
तुझे प्रेम मी भरत आहे १
कधी करशील कृपा तू 
नभ रिकामे दिसत आहे
पाश जाळती प्रारब्धाचे
तया  तप मी म्हणत आहे २
दयाळा तुजला प्रेमे 
माझा मी म्हणत आहे
सोडू नको कधी हात 
हेच तुला मी प्रार्थित आहे  ३
खूप चालून थकलोय 
आता उगा राहत आहे
येई मजला घेऊन जाई
अवघे तुला मी वाहत आहे  ४
कोण कुठला विक्रांत 
वाळूकण जगत आहे
स्पर्श पावूलांचा तुझा 
अन्य नच मी मागत आहे ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

भार


भार 
****
एक एक दिवसांचा जिवा भार होत आहे 
भेटल्या वाचून तुला हा जन्म हरवत आहे 

असे भाग्य थोर माझे मजला जाळत आहे 
हळूहळू धूप निळा अस्तित्व हे होत आहे 

अंधाराची खंत आता मनाची विरत आहे 
हरवल्या सुखाला मी झटकून टाकत आहे 

दत्ता टाहो माझा आत काय व्यर्थ होत आहे 
बदलून कुस जाग नीज नाकारीत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

साई कृपा

.
साई कृपा
*******
काय किती सांगू साईची करुणा
सांभळी या दीना सदोदीत ॥
काय माझे होते काय माझे झाले 
प्रारब्धच दिले बदलून ॥

भेटले वादळ आधार सरले
तेधवा धावले साईनाथ ॥
यत्नाला कृपेचा देवूनिया हात 
राहे मज साथ सर्वकाळ ॥

तयाने दिधले शक्तीच्या बाहेर 
सुखाचा सागर ओसंडला ॥
धरूनिया हात चालविले वाटे 
पायातले काटे काढूनिया ॥

झाली कृपा थोर लागलो पोटाला 
वाढवले नावाला काही एक ॥
तयाचा चाकर म्हणून राबतो 
तोच करवतो कामकाज ॥

नाही दिले अति उताया माताया 
पांढऱ्या पेश्या या राखीयले ॥
पराभव काही अतृप्ती टोचणी
बुद्ध्याचच मनी ठेवियली ॥

मग पायी दोर बांधीयला थोर
दत्त दरबार दावियला ॥
दिले धनमान लोभ हरवला
प्रिय माहेराला भेटविले ॥

दत्त कुळी केले मज ऐसा पैठा 
सुखाचा बोभाटा जन्म झाला ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

बळ

बळ
*****

इथे पाप वाहण्याचे काय कुणा बळ आहे 
सभोवती भक्त गोळा दक्षिणा बख्खळ आहे

घुमतात कोणी इथे पिसाटल्या झाडागत 
जिरवला घाम देही तेवढीच ओल आहे 

घडो पूजा अर्चा कुण्या सजविल्या मंदिरात 
अंतरात जाळ माझ्या प्रारब्ध कंगाल आहे 

म्हणोत विक्रांत कुणी वाया गेला पार आहे 
दत्ता तुझ्या पायाखाली माझे रे जिव्हार आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...