बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

आळंदी अशीही

दोन दिवसांपूर्वी आळंदीत होतो '
आळंदीत 
********
भयानक गर्दी , अत्यंत घाण .
प्रचंड बेशिस्तपणा 
ठरलेला बाजार होणारी लुटमार
पावला पावलावर धूर्त व्यवहार
पैशाची ओरबाड दर्शनाची धडपड
हाकलणाऱ्यांची गडबड

चपलांचे ठीग भिकाऱ्यांची रीघ
गलिच्छ इंद्रायणी गटाराचे ओघ 
भजनांचा गोंगाट 
कर्कश माइक भक्तीचे प्रदर्शन 
नाटकी अवडंबर पोलीसी दडपण 
अन्
निवांत निर्विकार  तोंडावर बोट
ठेवून बसलेले ज्ञानदेव भगवंत 

कुठल्याही भल्यानी उत्पत्ती एकादशी 
आसपास दिवशी नोलंडावी वेशी 
आळंदीची 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .








मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

धन

धन
****
अवघ्या दुःखाचे एकच कारण 
साठवले धन गाठी पोटी ॥१
धनाने दुश्मनी जगी जन्म घेते 
वधती एकाते एक इथे ॥२
धने भाऊ तुटे भगिनीस लोटे
वाटतात खोटे सोयरे ही ॥३
धन अभिमान जगा करी अंध 
जन्मोजन्मी बंध देत असे ॥४
जगण्या साधन जरी असे धन 
तया भगवान माने जन ॥५
तया साधनास जाणून साधन 
करावे साधन अंतरीचे ॥६
अन्यथा हे धन जन्म वेटाळून
श्रेय हरवून नेई दूर ॥७
कष्टाच्या धनाने विक्रांत तुष्टला 
कारणी लावला देह मग ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा
*********
पुन्हा एकदा आकाश
चांदण्यांनी भरून गेले 
पुन्हा अनाम सुखाने
मन बहरून गेले ॥

तेच स्थळ तीच भेट
देहातील आवेग थेट
पुन्हा एकदा उधाण 
जीवास उधळून गेले ॥

 हिंडलो मी रानमाळी 
गिरीशिखर धुंडाळले 
सौख्य त्या क्षणाचे मज 
आज इथे मिळून गेले ॥

नव्हतोच तेव्हा मी 
नव्हतेच जग राहिले 
अस्तित्व हे आणलेले
तुझ्यात हरवून गेले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा
***********

सरला प्रवास परी तुझा भास 
वेढून मनास आहे दत्ता ॥१

माझे पदरव मज ऐकू येती 
तरंग  गुंजती पाण्यावर ॥२

पान सळसळ आत की बाहेर
डोळ्यांची पाखर निळाईत ॥३

आशा निराशेचा सरलेला खेळ 
पाऊलात काळ थांबलेला ॥४

माझे कणपण मज कळू देते
सर्व व्यापी होते भान तुझे ॥५

मज न कळतो कुठला मी खरा 
अवघा पसारा तुच जाणे॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

ठसा

ठसा
****
जया प्रकाशाची हाव  
ज्याचे आकाशाचे गाव 
त्याचे दत्तात्रेय ठाव 
ठरलेले ॥१
जया कळते बंधन 
जरा जन्माचे कारण 
तया दत्ताचे स्मरण 
नित्य घडे ॥२
जग अंधार कोठडी 
नाना यंत्राने भरली 
सदा दुःखाने दाटली 
भयावह  ॥३
जन्ममरणा जो भ्याला 
घाव अंतरी लागला 
बोध सदना निघाला 
धुंडाळत ॥४
वाट तयाची श्रीदत्त 
वाट राखण श्रीदत्त 
ठाव मुक्काम श्री दत्त 
निसंशय ॥५
दृष्टी दिसल्या वाचून
दत्त विक्रांता भेटला
ठसा एकदा बसला 
पुसेनाचि ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी )
******
वळवले दाम ठोठावले काम 
मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥

तुझाच भरोसा आता तीर्थंकरा
उणीव न यावी तुझिया नावाला ॥

दुक्कडम दुक्कडं कितीही करा 
हिशोबी तसाच का कागज कोरा ॥

पुण्याईचा जन्म होतो रे मनात 
नेतो रसतळा अन तळतळाट  ॥

शुभेच्छा वाचून उत्कर्ष तो नाही 
झाकले कान त्या कळणार नाही ॥

मिच्छामी खरेच प्रगट ती व्हावी 
देण्याऱ्याची झोळी भरूनिया जावी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

कारणावाचून

कारणावाचून
*********
कुणीतरी आपल्यासाठी थांबावं 
आणि आपण कुणासाठी तरी थांबावं 
हा अट्टाहास म्हणजे
मूर्खपणाचे दुसरे नाव असते 
तसे तर थांबतात लोक 
आणि बोलतातही हसून 
पण ते थांबणे नसते 
कधीच कारणावाचून 
जर या जगात कोणाचेच 
काही कधीच अडले नसते 
दुसऱ्या वाचून
 तर जग किती सुंदर झाले असते 
तर मग घडले असते 
बोलणे बोलण्यासाठी 
थांबणे थांबण्यासाठी 
भेटणे भेटण्यासाठी 
जगणे जगण्यासाठी
अंतरीच्या तारा जुळून 
कदाचित शब्दा वाचून 
गरज मग ती असू दे कितीही सूक्ष्म 
आलेली अचेतन मनाच्या पडद्या मागून 
टाकते सारेच आकाश काळवंडून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...