शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

तेजोनिधी

तेजोनिधी
********

कशाला रे देसी फुका मानपान 
रूते तनमन संसारात ॥

सुखाची भोंगळ दुःखमयी काया 
मिरवतो माया डोईवर ॥

पुरे झाले देवा गळा लागे फास
 झाला कासावीस प्राण माझा ॥

कृपेचा दयाळू उभा दीनासाठी 
असे काय खोटी कीर्ती तुझी ॥

देई विलक्षण तुझा एक क्षण 
करी पेटवण ठिणगीने ॥

अवघे अंधारी जगताचे गाडे 
करी उजियडे तेजोनिधी ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

ओझे

ओझे
*****

नको व्यवहार वाटे हा संसार 
परी खांद्यावर भार आहे ॥

का नच कळे हा जन्म चाललेला 
अर्थ हरवला असा तसा . ॥

हातात येऊन जाते हरवून .
सुख वेडावून पुन्हा पुन्हा ॥

अन उरलेले बळ हे जन्माचे 
वदे करुणेचे शब्द तेच ॥

त्राही त्राही मज जड झाले ओझे
व्यर्थ जीवनाचे भक्तीहीन ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 




गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

विश्वास

विश्वास
*******
घुसू दे पायात लाख काटेकुटे
दत्ता तुझ्या वाटे मुकु नये ॥

चालतो मी वाट दिशा धरुनिया
नच जावी वाया धडपड ॥

दिशा हरवता तम काजळता 
हात देई हाता प्रेमाचा रे ॥

दिवा विझताना यत्न सरतांना 
विश्वास या मना राहू दे रे ॥

सरता विश्वास अर्थ ना कशाला 
विक्रांत काळाला प्राप्त होवो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

उसना


उसना
******

मी कुठे मागतो मोक्ष या जन्मात 
प्रवेश  शून्यात क्षण मात्रे ॥

देई रे पावुले ठेवण्यास माथा 
दत्त अवधूता कृपावंता ॥ 

सरो धावाधाव पडो मी निवांत 
तुझिया दारात एकवार ॥ 

तुझिया प्रेमात आकंठ बुडावे 
साधन घडावे असे काही ॥

सरो माझेपण तुच यावे मना 
विक्रांत उसना  देह व्हावा. ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

विसर्जन


 विसर्जन
********
भर मध्यरात्री साडेबारा वाजता 
ढोल ताशांच्या आवाजात 
देव आणणे किंवा विसर्जन करणे
हि काही भूषणास्पद आणि
तर्क शुद्ध गोष्ट नाही कुणासाठी 

पूर्वी विसर्जनाच्या वेळचे ध्वनी प्रदूषण
अभिशाप म्हणून स्वीकारायचो आम्ही 
पण आता आगमनाच्या वेळी ही ....?
हि आपली संस्कृती नाही 
हा गुन्हा आहे हा उन्माद आहे.
जमवलेल्या पैशाचा जमावाचा
सत्तेचा आणि मग्रुरीचा 
लोकांची पर्वा न करणाऱ्या बेमुर्वत 
झुंडशाहीचा गुंडशाहींचा

हा गणपती कुणाला वरदान देईल 
याची मुळीच शक्यता नाही 
कदाचित त्यांना त्याची पर्वाही नाही 
श्रींच्या विशाल कानात ढोल ताशांचे 
कानठळ्या बसणारे आवाज घुसळून 
नाचणारे तथाकथित भक्त  
बीभत्सपणें मिरवत असतात स्वतःला 
कोणास ठाऊक  कुठल्या नशेत
 साऱ्या जगाची झोप मोड करत 
झोपलेल्यांना जागे करत ताटकळत ठेवत आकाशात फटाक्याचा उजेड पाडत 
प्रचंड मोठे आवाज करत
निशब्दतेच्या सौंदर्यावर ओरखडे ओढत

लहान मुलांची रुग्णांची म्हातार्‍यांची 
पक्ष्यांची प्राण्यांची फिकीर न करता
ते असतात वाजत गाजत नाचत
प्रचंड ढोल ताशांचे ध्वनी उधळत
ते बाप्पाचे कधीच नसतात
ते  असतात फक्त स्वतःचे 
अप्पल पोटी दिखाव्याचे  
शत्रू समाजाचे निसर्गाचे आणि
इथल्या समृद्ध सखोल धर्माचे

पण त्यांच्याविरुद्ध बोलून 
चालणार नाही तुम्हाला 
तसे बोलला तर तुम्ही ठरता धर्मद्रोही
आणि देशद्रोही ही.
तुमच्या वक्तव्याची अन इथल्या गजराची
तुलना केली जाते पहाटेच्या भोंग्याशी
मग तर पुढचे बोलणेच खुंटते 

सौंदर्याला अभिजाताचे भावनेला भक्तीचे 
उधाणाला आनंदाचे सुराला मांगल्याचे 
रूप खरेच का देता येणार नाही?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

जीवन

जीवन
*******
नभा मधले जीवन भिजले 
मातीमध्ये अलगद पडले 
पोर इवले अंगणा मधले 
रडे विसरून हसू लागले 
त्या हसण्याच्या कवडश्यातून
झाड उगवले नभात घुसले 
शाळा हिरवी अंगण हिरवी 
पाटी पुस्तक हिरवे झाले
पाहता पाहता हिरवाईस त्या
सुंदर सुरेख फळ लागले 
फळात होते शून्यच भरले
ज्याला दिसले त्याला दिसले
अक्षर जीवन अनंत स्वप्ने 
अक्षरात क्षर हरवून गेले 
आणि कुणास किती सांगावे 
आरसा तैसे चित्र उमटले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

मोल

मोल
*****
 शब्द सजलेले सारे 
आज मिटले विरले 
काल पेटलेले दिवे 
कुण्या अंधारी बुडाले 

कोण लिहितो कशाला
मन कुणाला सांगाया 
अर्थ सुटती सरती 
भाव जाताच विलया 

सारे आधार जगण्या 
मी तो आहे रे सांगण्या 
चार पदांचा प्रवास 
कोण उरतो पाहण्या 

किती ओंजळी भरल्या
कुठे किती उधळल्या 
मोल थेंबुट्याचे काय 
असे सागरा भरल्या
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 kavitesathikavita. 
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...