बुधवार, १० जुलै, २०२४

देव हा चोरला


देव चोरला
********
देव हा थोरला कुणी रे चोरला 
हृदयी ठेवीला गुपचूप ॥

 रूप न तयाला नाव न जयाला
 तरीही ठसला पूर्णत्वाने ॥

अन घेऊ जाता सताड ते उघडे 
दारही दिसते आत रिते ॥

देव तो गिळला आणि पचवला 
काय त्या चोराला म्हणावे गा ॥

भेटवी समर्था महा त्या चोराला 
विद्या ती मजला कळू द्या हो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ९ जुलै, २०२४

पालखी

पालखी
******
पालखी हालते  पालखी डोलते
भजन चालते विठोबाचे ॥१

राम कृष्ण हरी घोष निनादतो 
टाळ दणाणतो भाविकांचा ॥२

ज्ञानोबा तुकोबा मृदुंग बोलतो 
हात कडाडतो वैष्णवांचा ॥३

पाऊल पडते रिंगण चालते 
चित्त हरपते नाद लयी ॥४

पालखीत माय कौतुके पाहते
प्रेम उधळते मायातीत ॥५

पाहता काळीज प्रेमे धडाडते 
डोळ्यात लोटते महासुख ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ८ जुलै, २०२४

धुमाची बाहुली

धुमाची बाहुली 
***********

उडता ठिणगी इथे याच क्षणी 
धडाडून अग्नी पेटेल रे ॥

सरेल अस्तित्व जगी वाहिलेले 
जरी नसलेले मनोमय ॥

सरेल कहानी नच लिहलेली 
जरी घडलेली दिसे इथे ॥

धुमाची बाहुली शोधी वावटळा 
तिचा कळवळा कुणाला ये . ॥

असणे नसणे क्षणाचे दिसणे 
दत्ता आहे जगणे कशाला रे ॥

तुझिया फुंकरी व्हावे शून्याकार
अवघा संसार मिटूनिया ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ६ जुलै, २०२४

दैवाधिन

दैवाधिन
*******
सरतांना वर्षा ऋतु
माळरानी थांबलेले
नभात दिसले मज
मेघ काही दाटलले ॥

कोसळल्याविना खुळे 
तुडुंब भाव भरलेले
लुब्ध कुण्या झाडावर 
वाहणे विसरलेले ॥

गर्द गहिरे विशाल 
स्वतःत हरवलेले
सरे ऋतू दिन गेले
तरीही रेंगाळलेले ॥

त्या मेघा ठाव नव्हते
अपार आहे धरती
कुठेतरी कुण्या डोही
मिळेन तयास वस्ती ॥

भूमी विना मेघाला रे
दुसरी  गती नसते 
पण कुठे कधी कसे 
दैवाधिन हे असते ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

ए सी लोकल

एसी लोकल
**********
चार लोकांचीच चैन 
ए सी लोकल असते .
प्लॅट फॉर्म वर गर्दी 
उगाच वाढत असते. 

एक  लोकल जाताच
गर्दी ही चौपट होते
अन रेल्वेला बोलांची
लाख लाखोली मिळते

एक दोन डबे एसी
लावा तुम्ही लोकलला
कुणाचाही मुळी सुद्धा  
नकार  नाही त्याला

चार पैसे खर्च करून
सुख सोय हवी ज्यांना
सुखनैव ती ही सदा
मिळू देत की त्यांना

पण त्यांच्या सुखासाठी 
त्रास का हो  गरिबांना
पूर्ण रिती लोकल जाते
पाहवत नाही डोळ्यांना
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ४ जुलै, २०२४

निरोपाचे वेळी

निरोपाचे वेळी
************
निघतांता खुळे डोळे व्याकुळले 
क्षणभरा साठी होते थबकले 

रोज घडणारी घडली न भेट 
मग मना लागे उगा चुटपुट

उगा खोलवर कुण्या मनी जाणे
बरे नव्हे तुझे असे हे वागणे

माझिया मनाचे आकाश रे तुझे 
चांदणे तयात तुला पाहण्याचे

 तुला पाहता मी सारे विसरते
तुझिया स्वरूपी  हरवून जाते

अरे या सुखाची काय सांगू मात 
क्षण तेच देती धुंदी जीवनात 

सुख या क्षणाचे माझे नेऊ नको 
निरोपाची वेळी नभी पाहू नको

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ३ जुलै, २०२४

भाजी आणण्यावरून

भाजी आणण्यावरून 
****************
एक भाजी आणण्यावरून 
गढूळ होते वातावरण 
थकलेला तो थकलेली ती पण 
घरंगळले त्राण 
शक्ती गेलेली हरवून 
तो हलत नाही आपल्या जागेवरून 
तिची बोलणी या कानातून 
त्या कानात जातात वाहून
मग ती उठते कुढून चिडून 
काहीतरी ठेवते शिजवून 
त्याचा वाटा बाजूस काढून 
चक्क जाते मग निजून 
काहीही बोलल्या वाचून
प्रश्नास उत्तर दिल्या वाचून 
तोही जातो मग समजून 
मनामध्ये तसाच उबगून 
खावी न खावी भाजी 
थांबतो ठरवल्या वाचून 
खाल्ले नाही काही तर 
भांडण वाढणार असते 
अन खाणे ही तर खरोखर 
त्याचीच हार असते 
मानापनाच्या संभ्रमात 
अखेर भूक जिंकते 
अन उद्याचे भांडण 
पोटामध्ये विझून जाते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...