मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

प्रवास

प्रवास
******
हसणे रडणे खेळणे पडणे 
भिणे भिवविणे घडे नित्य ॥१

घडते म्हणून तेही घडू द्यावे 
रंगले दिसावे तयामध्ये ॥२

झेलावे प्रारब्ध देह मनावर 
जैसे हवेवर व्यर्थ वार ॥३

देह दुःख दैन्य मनाचे मालीन्य 
भोगल्या वाचून भोगू जावे ॥४

उपसावे पाणी जैसे चाचूवेरी
 बसून सागरी किनाऱ्याला ॥५

याहून वेगळे नसते साधन
सुटण्या कारण घडे काही ॥६

विक्रांत प्रवास असे फक्त भास
कळता जीवास भ्रांती नाही ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

श्री शिवराय

॥श्री शिवराय ॥
************
तुमच्यामुळे आज राजे 
नाव माझे विक्रांत आहे 
अन देहातील रक्तातून 
हिंदुस्थान वाहत आहे ॥

तुमच्या मुळे आज राजे
 देवघर या घरात आहे 
अन् उपनिषदांचे गूढ ते
हृदयात उलगडत आहे ॥

भाग्यवान ते पूर्वज माझे 
तुम्हा स्कंधी वाहत होते 
तुंग तिकोणा दुर्ग नाव ते
स्वकुळास मिरवत होते ॥

असेल तेव्हा मीही केव्हा 
तव चरणाच्या समीप पाहे
ती गुणसूत्र पुन्हा पुन्हा नि
आजही शिवबा स्मरत आहे॥ 

पेटवली जी ठिणगी तुम्ही 
आज अखंड ज्योत आहे 
करते रक्षण आजही आमचे 
खड़ग भवानी अंतरात आहे ॥

राहील तुमचे नाव महाराज 
जोवर माणूस जगात आहे .
शील शौर्य अन आदर्शही
तुम्हामुळेच तेजाळत आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

साबळे सिस्टर


बेल साबळे सिस्टर (श्रद्धांजली )
**********
साखर पेरल्या शब्दात .
साबळे सिस्टर बोलायच्या 
कधी कधी वाटायचे 
उगाचच मस्का लावायच्या 
पण ते तसे नव्हते कधी 
तो होता सहज स्वभाव त्यांचा 
वरिष्ठ कनिष्ठ सहकारी साऱ्यांना 
त्या सारखेच तोलायच्या 

किती सार्थ होते नाही 
त्यांचे ते नाव  बेल 
रुणझूण वाजणारी 
सांद्र स्वरात लहरणारी 
जणू प्रभूकटीची घंटीकाच

बहुतेक सर्व रुग्णांच्या लबकी  
त्यांना ठाऊक असायच्या 
अनेक काम चुकारांनाही 
सहज त्या हाताळायच्या
एक आदर्श सिस्टर म्हणून 
सदैव मला दिसायच्या

कधी भेटलो त्यांना शेवटचे 
ते आठवत नाही 
सेंड ऑफ कधी झाला 
तेही माहित नाही 
पण कधीतरी त्या झाल्या रिटायर 
भेटल्या नाहीत त्यानंतर 
पण माझ्या मेल मेडिकलमधील 
खूप खूप आठवणीत
होत असतो त्यांचा वावर 
जया सिस्टर बरोबर
त्या दोघी म्हणजे 
जसे असावेत राम लक्ष्मण सोबत
अथवा सूर आणि ताल यांची संगत

व्यक्ती आपल्या जीवनातून गेली 
तरी तिची स्मृती असते सतत 
त्या विरहाच्या नंतरही 
आपल्या मनात 
तोच प्रेमादर निर्माण करत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

उरलेले श्वास

उरलेले श्वास
*****
उरलेले श्वास किती नसे ठाऊक कोणाला 
सरलेले दिस शुन्यी जाती एकाच क्षणाला ॥१

बसलेली खुर्ची खोटी पसरली कीर्ती खोटी 
अन जमवली माया सवे कधी नच येती ॥२

कळतो ना अर्थ जरी जन्म वाहतोच पुढे 
कर्तव्याची बाराखडी रोज नवनवे धडे ॥३

देह जेव्हा जन्मा आला काळ घास ठरलेला 
द्यायचा रे सोडूनिया आज उद्या परवाला ॥४

तरी किती अहंकार ठासूनिया भरलेला 
आकाशात ढगावर राजवाडा बांधलेला ॥५

प्रिय नातलग मित्र सोडूनिया जेव्हा जाती 
जागे स्मशान वैराग्य माया पुन्हा वेटाळती ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

वाहता वाहता

वाहता वाहता
***********
कळल्या वाचून चाललो गर्दीत 
सुखाच्या धुंदीत 
रात्रंदिन ॥१
यशाच्या खाईत नशेच्या राईत 
जन्म सराईत 
वाहणारा ॥२
वाहता वाहता कळली व्यर्थता 
खुंटूनिया वाटा 
थांबलो मी ॥३
मग दूर गेले साथी जमलेले 
हाती धरलेले 
सुख यंत्रे ॥४
पुन्हा उगमाचा ध्यास जीवनाचा 
क्षण जगण्याचा 
उगवला ॥५
विक्रांत पाहतो मागे वळुनिया 
खुणा मिटलेल्या 
पावुलांच्या ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

असणे

असणे
******

संतृप्त स्तब्ध मनाचे
आकाश विरक्त होते 
वितळून मेघ सारे 
अस्तित्वही शून्य होते 

उरात न मावणारी 
अफाट पोकळी होती 
असणे कुठे कणाचे 
कोणास ठाव नव्हते 

नसण्यात निजलेले 
जग अधांतरी होते  
परी स्पंदनात काही 
चैतन्य दडले होते

नयनात प्रकाशाचे 
सागर भरले होते 
उगम सर्व नादांचे
कर्ण युगलीच होते 

मी सांगू कुणास काय 
शब्दास रूप नव्हते 
वाहून दश दिशात 
असणे अनादी होते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

रितेपण

रितेपण
****

सुखाची ही ओढ सुखे मावळली 
डोळे झाकलेली उघडेना ॥१

किती मनोहर बाई हा अंधार 
प्रकाशाची सर आठवेना ॥२

सारे धुरकट स्मृतीचे आकाश 
पाण्यावर रेष उमटली ॥३

गळे एक एक शिशिराचे पान 
पाचोळ्याचे गाणं वाऱ्यावर ॥४

एक जरतारी चांदण्याची वेल
मनात अबोल लख्ख उभी ॥५

किती घनदाट असे रितेपण 
नको नकोपण तेही मज ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...