बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

सोडूनही देव




सोडूनही देव
********
सोडूनही देव सुटत नाही 
मोडूनही देव मोडत नाही ॥

कृष्ण सुटतो बुद्ध हरवतो
परंतु श्रद्धा तुटत नाही ॥

येशु बुद्ध कृष्ण वेगळे रे नाही
परी अट्टाहास वैरभाव देईं ॥

भट भंते पाद्री सारेच पुजारी 
मध्यस्थ माणसा लागतात बाजारी ॥

आत्म धर्म एक असे या जगाचा 
एकाच कणातून उद्गम जगताचा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

जीवना

जीवना
******
नक्षत्रांनी ठरवलेले भाग्य 
आणि ग्रहांनी मांडलेले सौख्य 
खरे असतात की नाही ठाऊक नाही 
पण जगण्याच्या अंगणात पडलेल्या  
या काचा कवड्या वेचतांना 
आणि सांभाळतांना झालेला आनंद 
तो कुठल्याही पत्रिकेत मांडता येत नाही 
ते मातीमध्ये मळलेले हात 
धुळींनी भरलेले कपडे 
किती अनमोल असतात 
हे कुठलेही जवाहरला कळत नाही 
खरंच का प्रारब्धाने भेटतात 
हे सवंगडी मित्र मैत्रिणी 
नाव गाव चेहरे वेगळे असतात 
तरीही प्रत्येकाच्या जीवनात 
बहरतात हे वर्षा ऋतू 
भक्तीशिवाय मिळणारी 
तपस्येविना फलद्रूप होणारी 
ही कुणाची कृपा असावी ..
तना मनाला निववणारा 
न मागता मिळणारा 
हा कुणाचा प्रसाद असावा ..
जीवना तू खरच सुंदर आहेस
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

खळांची व्यंकटी .

खळांची व्यंकटी
*************
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्।।16.4।। भगवद्गीता !
पारुष्यमेव=काठिण्य अभिजातस्य = जन्मास येणे

तर ही अशी माणसं समोर येऊन उभी ठाकली तर काय करायचं ?आणि एक ते तीन श्लोकामध्ये वर्णन केलेले दैवी गुण अजून आपल्यात उतरले नाही तर काय करायचं?
जग हे त्रिगुणांनी भरलेले आहे त्यामुळे सात्विक  राजसिक तामसिक लोक ही तर भेटणारच.

तेव्हा त्या व्यक्तीचाही स्वीकार करायचा त्याच्या रागाचा, अहंकाराचा, काठिण्याचा, दर्पाचा सुद्धा. कारण त्या बिचाऱ्याला काय ठाऊक आहे तो कुठे आहे, ते जर त्याला कळते तर तो तिथे नसता ना.
सात्विक माणसाच्या केल्या गेलेल्या छळाचा प्रतिवाद सात्विक माणसाकडे नसतो तर सात्विकतेचे रक्षण करणाऱ्या परमेश्वराकडे असतो. तो त्याचे ब्रीद कधीही मोडत नाही. त्यामुळे  हा शरणागतीचा भाव घेऊन त्या परमेश्वराच्या दारात सर्वांसाठी  ज्ञानदेवांनी दिलेले पसायदान मागणे हेच आपल्या हातात असते.
जे खळांची व्‍यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे.|

डॉ.विक्रांत तिकोणे 




शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

लज्जत

लज्जत
*******

माझ्या तथाकथित 
दुःखाबद्दल  
माझ्याशी हुज्जत 
घालणाऱ्या कविता 

जेव्हा उतरतात 
संध्याकाळी खाली
माझ्या घराच्या छतातून 
दाटणाऱ्या अंधाराचा हात धरून
वा येतात स्मृतीच्या अडगळीतून 
मनाचे कवाड उघडून 
रेंगाळत दबकत धूर्तपणे 
किंवा आक्रमक आगावू पणाने 
अन् पसरु पाहतात सभोवताली 
माझे अस्तिव गिळून 

मी  त्यांना पकडतो अन्
टाकतो  बुडवून 
चहाच्या कपात 
मग पितो चवीचवीने 
हलकेच फुंकर मारत 

खरच सांगतो 
तो चहा खूपच चविष्ट असतो 

मला ठाऊक आहे 
कविताची हुज्जत कधीच 
थांबणार नाही 
आणि चहाची तलपही 
सरणार नाही

अर्थातच तोवर
सुख दुःखाला कवटाळून 
असोशीने जगणाऱ्या झिंगणाऱ्या 
जीवनाची लज्जतही
मिटणार नाही 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

काय चूक अन्

काय चुक अन ....
***********
काय चूक अन् काय बरोबर 
कुणास कधी कळते काय ?

आकाशाच्या डोक्यावर 
कोण देतो कधी पाय ?

का कधी अन असे कशाला 
प्रश्न उगा का हवे पडायला ?

आभाळ भरते पडते पाणी 
मनी उमलती उगाच गाणी 

या साऱ्याला अर्थ असतो 
ज्याला दिसतो त्याला दिसतो 

कुणा पाहुनी मन हरखते 
बोलून कुणाशी मन उमलते 

नाते नसते तरीही असते 
उगाच का मग सुख वाटते 

जगणे म्हणजे असते जगणे 
ऊन कोवळे टिपूर चांदणे 

जगून घ्यावे क्षण हातातले 
उधळीत मोती ओंजळ भरले
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

ना.धो.महानोर

ना.धो. महानोरांची गाणी
******************

ही गाणी 
पावसाची अन् रानाची 
गर्भार मातीच्या 
सृजनत्वाची 

तिच्यासारखी 
रुजलेली फुटलेली 
फाडीत अंतर 
उफाळलेली 

रानाचे चैतन्य 
रानाच्या भाषेत 
रानाच्या गंधात 
घेऊन आलेली 

ओलीचिंब झालेली 
रानाच्या गंधाने 
दरवळणारी
उत्कतेने भारावली 

ही गाणी
गावाचे दैन्य 
विद्ध शब्दात 
मांडणारी

हृदयाला भिडणारी 
काळीज पोखरणारी 
मातीच्या कुशीत 
शिरून रडणारी 

ही गाणी जेव्हा 
मी वाचली 
तेव्हा माझी नाळ 
माझ्याशी कुजबजली 
म्हणाली 

इथूनच
यायचे असते
रुजून 
या मातीचे अन् आकाशाचे
सत्व घेवून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

गरज


गरज
*****
माझिया शब्दाची तुला न गरज 
कळतेय मज दत्तात्रेय  ॥१
लिहिणे हे शब्द माझीच गरज 
कळतेय मज अवधूता ॥२
आता सरू आली शब्दाची ही रास 
लिहिण्याची आस पुन्हा पुन्हा ॥३
वाटते सोडावी आता ही लेखणी 
कृपेची मागणी अर्थशून्य ॥४
मातीच्या फुलाला गंध तो कुठला 
दोष त्या कुलाला मग कैसा ॥५
मिटून ठेवतो तुझ्या पायी वही 
फार दूर नाही होळी आता ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...