मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

उपवास

उपवास
*****
श्रद्धाळू मनाचे सरे उपवास 
केलेले सायास पूर्ण झाले ॥१

कुणा न ठाऊक काय मिळवले 
काय गमावले कुठे किती ॥२

परी दृढ गाठ बसली मनात 
झाली बळकट श्रद्धा एक ॥३

उठली मनात प्रार्थना ही खोल 
ओठी आले बोल ज्ञानेशाचे ॥४

हरवली मात अस्तित्वाचा अर्थ 
माणसाची जात सुखी कर ॥५

रहा रे कृपाळू सदा जगावर 
दुःखाचा आकार मिटवून ॥६

बाकी तो आहार कुणा निराहार
व्यर्थ कारभार झाला उगा ॥ ७

विक्रांता कळला अर्थ उपवासी 
जोडलो देवासी जगताशी ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


सोमवार, २४ एप्रिल, २०२३

बीजेचा चंद्र

बीजेचा चंद्र
**********

तुझिया बीजेची दिसे चंद्रकोर 
आनंद मोहर मन झाले ॥१

इवलीशी रेखा जणू भाळावर 
कोणी तालेवार मिरवती ॥२

तैसे ते आकाश प्रोढीने भरले 
शुक्र विसरले भरजरी ॥३

पश्चिमेची गाणी आली कानावर 
दूर रेतीवर उमटली ॥४

कुठे उगवली कुठे पेरलेली 
श्रद्धा थरारली मनातली ॥५

पाहता पाहता देखावा सरला 
आभास मिटला विलक्षण ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रविवार, २३ एप्रिल, २०२३

भास


भास
*****
ऐसा पाठीपोटी दत्त घनदाट 
पाणि पाणियात मिसळले ॥१
द्वैताची झुळूक जन्मा ये लहर 
निमे हळुवार जीवनात ॥२
सुवर्ण शलाके कारण अरुण 
जाता अस्तावून तीही नाही ॥३
तैसे माझेपण दुजे दत्ताहून 
अंतरी जाणून मीची दत्त ॥४
परी ते कौतुक मिरवतो वरी
भक्तीच्या लहरी नांदुनिया ॥५
विक्रांत वेगळा दत्तात आटला 
दिसे जगताला भास उगा ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

सुन्न

सुन्न
*****

तो कोपरा या मनाचा अजूनही सुन्न आहे 
ते आकाश जीवनाचे सर्व ऋतूत खिन्न आहे ॥

लाख शोधली कारणे अर्थाविन शून्य आहे 
मीच कारे मलाच का अनुत्तरीत प्रश्न आहे ॥

ते दान दिले दैवाने स्वप्न फुलून आलेले 
ओघळून मातीवरी आज छिन्न भिन्न आहे ॥

नाही जरी तू ती सवे गमते अजून आहे 
शब्द स्पर्शाविन तुझ्या भ्रमित हे मन आहे ॥

जाणतो मी दारात तू थांबली अजून आहे 
जन्म मृत्यू पायरीला मजसाठी बसून आहे ॥

यावेसे वाटते परी शपथेत बांधून आहे 
तुझ्यासाठी जगतोय जगणे थांबून आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

कुठे जावू

कुठे जावू
********
अवघा जाहला व्यय जीवनाचा 
तुझिया प्राप्तीचा लेश नाही ॥१
केले जप तप जरी हिरीरीने 
तीर्थव्रत वने आदरली ॥२
पाहिला बाजार आतला बाहेर 
केला व्यवहार वाट्या आला ॥३
तूवा विसरलो नाही कदा दत्ता 
विरक्त व भोक्ता असतांना ॥४
सुखावलो देवा तुझा म्हणतांना 
पथी चालतांना भेटण्याच्या ॥५
परंतु चालणे नसते भेटणे 
अन आठवणे आलिंगने ॥६
घडेल कै देवा हीच आस जीवी 
आळी पुरवावी मानसीची ॥७
सोडून चरण कुठे जाऊ आणी
विक्रांता ठिकाणी  ज्ञात नाही ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

रान

रान
*****
अतृप्तीचे रान घनावले गर्द 
जातिवंत जर्द 
नाग त्यात ॥१
विकार गरळ मुखी दाटलेले 
क्रूर टपलेले 
डसण्याला ॥२
सरती ना दंश वेदना अपार 
भान थाऱ्यावर 
येत नाही ॥३
मरणा वाचून घडते मरण 
कळल्या वाचून 
जगणे हे ॥४
निळकंठ बाबा करी दया आता 
गुरुदेव दत्ता 
मजवरी ॥५
सोडव हे वेढे पायी पडलेले 
भय दाटलेले 
मरणाचे ॥६
विक्रांत पामर देही नाही बळ 
तुची तू केवळ 
त्राता माझा ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

आकाशाचा ताव

आकाशाचा ताव 
************

काय सांगू बंधु तुज माझी माव 
आकाशाचा ताव सदा कोरा ॥१
येतात जातात ढगांची अक्षरे
विचार पाखरे क्षणोक्षणी ॥२
उठे धुळ माती धुरांचे वा लोट 
निर्मळ निघोट सर्वकाळ ॥३
नितळ चांदणे सूर्याची किरणे 
अपार स्पंदने ओत प्रोत ॥४
घेतल्या वाचून घेतच राहतो
मळतो मिळतो नच कदा ॥५
ज्ञान भक्ती योग जीव जन्म भोग 
ओघावीन ओघ उरलेला ॥६
कोणी म्हणे नित्य कोणी म्हणे दत्त
अनामा सतत शून्यी रत ॥७
ठेविले विक्रांत म्हणून हे नाव
थेंबुट्याचा ठाव काय गाव ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...