शनिवार, ४ मार्च, २०२३

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी
*********

तुझ्यासाठी किती केल्या उठाठेवी 
पांघरले जग आलो देह गावी 

तुझ्यासाठी मोक्ष सारला मी दूर 
सजवला देह जाहलो कापूर 

तुझ्यासाठी आड वाटेला लागलो 
जन्म मरणाचा चकवा धावलो

तुझ्यासाठी झालो उन्हात पळस
लक्ष तारकांची काळोखी अवस

तुझ्यासाठी फुल पानात सजलो 
सागर सरिता जीवनी बुडालो 

तुझ्यामुळे जन्म माझिया मिठीत 
अव्यक्त ते व्यक्त पाहिले दिठीत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

गुरुवार, २ मार्च, २०२३

भूमिका


भूमिका
*****
नाटकातील नटागत 
वठवावी लागते भूमिका 
जगतांना या जगात 

कधी जिवलग मित्र होत 
कधी दिलदार सोबती बनत 
कधी नियमात कठोर वागत 
कधी नियमाचे धागे तोडत

 पण उमटच नाही मनात कधीच कटुता 
रुजत नाही आत कधीच दुष्टता 
माहीत असतो तुम्हाला तुमचा मुखवटा 
आणि समोरील व्यक्तीतील गुणवत्ता 

वेळ काळ परिस्थिती अन् ती व्यवस्था 
असते तुम्हाला पळवत 
किंवा खेचून नेत 
परंतु त्या पलीकडचे नाते 
माणसातील माणुसकीचे 
असते आत वाहत  
नितळ निवांत 
आत्मीयतेने भरलेले 
सदैव शांत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

बुधवार, १ मार्च, २०२३

ओला घाट

ओला घाट
********

मी थांबलो आहे वेस ओलांडून 
परका उपरा बेवारस होऊन 
अन तुला ती खबरही नाही अजून
का तू बेखबर आहे खबर असून ?

मी विझलो आहे संपूर्ण जळून 
आग आणि प्रकाश सरून 
अन तू ती राखही पाहत नाहीस ढुंकून
ते भाग्य मी आणू कुठून ?

हे जगणे माझे चालू आहे अजून 
संपत नाही म्हणून, पण प्राण..
तो तर कधीच गेला आहे उडून 
रे तू आहेस ना सारे जाणून ?

तुला धावत ये म्हणत नाही 
अन् मी  रडतही बसत नाही 
तुझ्याविना न कळणार कुणाही
यात ही अर्थ असेल काही ?

प्रतिक्षेत त्या दक्षिणदारी बसून
मी आहे प्रतिक्षाच होवून
जरी हे जीवन गेलेय वाहून
तो घाट ओला आहे अजून !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

विचार


विचार
******

स्वतःत स्वतः असणे किती सोपे असते 
विचाराचे असणे जेव्हा अस्तित्वात नसते

पाहता कळू येते तुझ्या माझ्यात राहणारा 
विचार हा परजीवी आहे ऊर्जा खेचणारा 

अस्तित्वाचा सदोदित दरवाजा रोखणारा 
त्याच त्याच चक्रात पुन:पुन्हा फिरवणारा


मला सुख देणारा हा सुंदरसा विचार 
मला दुःख देणारा त्रासदायक विचार 

स्वप्नांतील प्रियेचा अन देवाचा विचार 
तोच तो एकच असे बहुरूपी आकार 

ओळखून पहावा जरी बहरू द्यावा 
माझ्यातील विचार कधी मी न व्हावा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

ॐ काराचा काटा

ॐ काराचा काटा
************

घोकली मी गीता दिव्य ज्ञानेश्वरी 
अभंग ही उरी खोचले गा ॥१
भजला विठ्ठल नमियला दत्त 
बुद्ध तथागत आदरला ॥२
किती पाठ केली संतांची कवणे 
भक्तांची भजने वारे माप ॥३
बांधली वासना जाळली कामना 
बांधियले मना वेळोवेळी ॥४
परी आता सारे सुटू जात आहे 
मन होत आहे पाठमोरे ॥५
नाम ध्यान पाठ झाले काठोकाठ 
भरुनिया माठ वाहतसे ॥ ६
गेला भक्तिभाव शून्यातील धाव 
नभातला गाव गंधर्वांचा ॥७
विक्रांत ठणाणा ध्वनिविना घंटा 
ॐ काराचा काटा घशामध्ये ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

पार

पार
****
नकारी नटले देवळाचे दार 
भरलेला पार गंजाडानी ||१
भरली चिलीम आदान प्रदान 
धुराने भरून झाड गेले ||२
चालली आरती देवापुढे पेढा 
खाऊनिया वेडा खुश होय ||३
सुखाचे मागणं दुःख आक्रंदन 
गेले हरवून कल्लोळात ||४
मिळे तो हसतो दुसरा रडतो 
नशिबाला देतो दोष उगा ||५
मरतो आतला मरे बाहेरला 
नदीच्या वाटेला गाव जातो ||६
दिसेना कोणाला कोणाची पुण्याई 
पाप भरपाई करी कोण ||७
विक्रांत करतो आत मी बाहेर 
जीव थाऱ्यावर नाही जरी ||८
इथला तिथला कधी म्हणवतो 
घालतो काढतो माळ गळा ||९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

खेळ

खेळ 
****
असा कसा खेळ खेळशी तू दत्ता 
मजला कळता नच कळे ॥१
कुणा संतासवे धाडसी सांगावा 
येई म्हणे गावा आपुलिया ॥२
कुणा शोधुनिया धरून हाताला 
घेवून घराला जात असे ॥३
कुणा जागेवरी देऊनिया बोध 
थांबवसी शोध बाहेरील ॥४
कुणा योगरुढ बसवी निश्चळे
कुणा भक्तीबळे नाचवसी ॥५
आणिक कुणाला धाडसी जगती 
डोळ्यावर पट्टी बांधूनिया ॥६
कळेना कुठे तो चालतो फिरतो .
काय नि करतो कशासाठी ॥७
धावरे दयाळा सोडव ही पट्टी 
पाहू देत सृष्टी तुझ्या रूपे ॥८
विक्रांत तिमिरी चाचपडतसे 
खोडकर हसे थांबवी रे ॥ ९
सरू दे खेळणे उगा लांबलेले 
जीवन आंबले अहंकारी ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...