शनिवार, ७ जानेवारी, २०२३

राधिकेची माय

राधिकेची माय
***********

ती तिची वाट जरी एकटीची 
सवे तिच्या परी मुर्त राधिकेची ॥
शामला कोमला सुखाची पुतळी 
डोळियात सौख्य स्नेह भरलेली ॥
राधिका मनाची घेऊन बासरी 
जरी का सारते  केशवास दूरी ॥
जाणतो कृष्ण तो पेलतच नाही 
सांभाळणे पिस जमतच नाही ॥
सोडला तिने तो मग अट्टाहास 
वाहिले स्वतःला राधेच्या रूपास॥
ती अन तिची ती राधा अवखळ 
कृष्ण उरे मग निळुले आभाळ॥
राधिकेची माय राधिकाच होय 
हरवे विरह तीच पूर्ण होय ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

शीला पाटील सिस्टर ( श्रद्धांजली)

शीला पाटील सिस्टर ( श्रद्धांजली)
****************
तिला माहित नसेलही हे कदाचित 
सात्विकता होती ती जग पाजळीत ॥
यायची घेऊन सौम्य चांदणे सवेत
अन व्हायचे सारे जग प्रकाशित ॥
ती बोलायची मोजके जरी ना मित 
सभोवार उमटायचे  मंगल संगीत ॥
तिच्या हसण्याची एक मोहक रीत 
कानात गुंजायाचे शब्दा विना गीत ॥
फुले वेदनांची जरी की ओंजळीत 
नव्हतीच कटुता शब्द देह बोलीत ॥
ती शांत समयी जणू की देवघरात 
जरी रोष तडकून येई कधी वातीत ॥
ती आई शोधणारी प्रिय पाडसास 
तिचे डोळे तसेच करुणा हंबरीत ॥
ती गेली आता मागण्यास न्याय देवा 
संपली मेणमुर्त आज कोरली मेणात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

शहर

शहर
*****

तेच चार स्वीकार तेच चार नकार 
जीवनाचा आकार  लोळागोळा ॥

त्याच चार वाटा त्याच चार खाटा 
देहाचा भोगवटा ठरलेला ॥

तीच सकाळ देही तीच संध्याकाळीही 
जीवनाची वही कोरी कोरी ॥

तीच काळी नजर तेच जुने जहर 
तेच धूर्त शहर विखारी रे ॥

अंता वाचून अंत तरी काळ अनंत
ठेचलेली खंत पार पूर्वीच ॥

साचले शब्द सारे विझले शब्द सारे 
आकाशीचे तारे अशनी झाले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..


सोमवार, २ जानेवारी, २०२३

कैवारी


कैवारी
******
दीनांचा कैवारी म्हणती तुज रे 
देतो भक्ती त्वरे भक्ता लागी ॥१

वेगळे ते काय मागतोय मी ही 
देत का रे नाही दत्तात्रेया ॥२

देई म्हणतो मी वैराग्याची छाटी
ज्ञानाच्या पावुटी चालवी रे ॥

घेई रे जवळी नाम दे मुखात 
तुझ्या प्रेमात भिजू दे ना ॥

काय कधी खोटे प्रेम ते असते 
जीव जे देते जीवासाठी ॥

घेऊनिया प्राण विक्रांत हातात
तुझ्या दारात उभा आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

काळ

काळ
****
काळ सरता सरतो सूर्य विझता विझतो 
चंद्र झिजता झिजतो हळू विक्रांत मरतो॥१

जन्मा आधी रे तो होता राही देह तो सरता
सांगे भगवद् गीता मग कशाला ती चिंता ॥२

जन्मा आधी रे परंतु तो हा  नव्हता विक्रांत
मन पुसता विझता कैसा येईल विक्रांत॥३

काही नाव या देहाला अन गाठी संस्काराला 
चिंता आकाराची का रे अशी पडे पुतळ्याला ॥४

खेळ मातीचा मातीला व्यथा का रे चैतन्याला 
सुख दुःखाच्या मुशीत नक्षी क्षणाची काळाला ॥५

काळ असतो अकाल वेळ मानवे निर्मिली 
जन्म मृत्यूची साखळी अन तयात गुंफली ॥६

काही कळू कळू येते काही हळू निसटते 
शून्य स्पंदाच्या शेवटी काही आत लकाकते ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

वाणतो


वाणतो
******
सोडून हात हा 
तू आता कुणाची 
सोडुन साथ ही 
तू आता स्वतःची ॥१॥

नव्हती कधीच 
गाठ बांधलेली 
चालता प्राक्तनी  
गाठ पडलेली ॥२॥

कुणाचे असे हे 
काही देणे घेणे 
तयालागी इथे 
असे हे भेटणे ॥३॥

घडे भेटणेही 
घडे सुटणेही 
उमलता कळी 
घडे पडणेही ॥४॥

परी जाहले हे 
गंधित जगणे 
वाणतो क्षणास 
त्या कृतज्ञतेने ॥५॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

दत्त दावितो

दत्त दावितो
*********
दत्त दावितो जगणे 
मज करून खेळणे 
डाव उलटा सुलटा 
त्यात हसणे रडणे ॥१

कधी फुगवी हवेने 
उंच नेई रे वाऱ्याने 
मग फजित करुन
हवा काढतो सुईने ॥२

कधी दावून ज्ञानाला 
टाकी स्तिमित करून 
कधी लावून कामाला 
टाकी हाडास मोडून॥३ 

मित्रपरिवार सुख 
देई भरभरूनिया 
ठेवी एकांति विरक्त 
मृत्यू खेळ दाऊनिया॥४

देई यश धनमान 
सुखे भौतिक भरून 
त्यात अपूर्णता पण 
देई हळूच पेरून ॥५

आत कळते मनाला 
खेळ निरर्थ चालला 
आस जागते अंतरी 
भेटण्याची शाश्वताला ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...