बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

दगड



दगड
:*****
राजवाड्याच्या बागेमध्ये पडलेला 
एक क्षुल्लक दगड 
मिरवत होता फुशारत होता 
मी राजाच्या बागेतील दगड आहे म्हणून 
राजाला तर त्याचा पत्ताही नव्हता 
आणि पत्ता होणारही नव्हता 

तो दगड कदाचित 
राजवाडा होण्याच्या अगोदरही तेथे होता 
किंवा कुठल्यातरी सामानातून 
तिथे येऊन पडला होता 
किंवा कोणीतरी कुठून तरी  फेकला होता 
पण तेही त्याला आठवत नव्हते 

पण ज्या क्षणी त्याला जाणीव झाली 
आपल्या असलेपणाची आपल्या क्षुल्लकपणाची
आणि निरर्थकथेची तो झाला राजाचा दगड 
आणि त्या स्वनिर्मित सांत्वनेत 
त्याने शोधला अर्थ स्वतःचा स्वतःपुरता 
अन तो म्हणून घेऊ लागला स्वतःला 
राजाचा दगड राजाचा पाईक राजाचा समर्थक 
आणि राजाचा भक्त ही
फक्त आजूबाजूची शहाणे त्याला 
विक्रांत म्हणत होते एवढेच

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

गाणं आभाळाचे

गाणं आभाळाचे
******

गाणं आभाळाचे तुझे 
माझ्या मनी सुरावले 
तनु सावळी आवेगी 
मज विजे लपेटले॥

लोट धमन्यात खुळे 
अन उर धपापले 
श्वास होतं सागराचा
पाणी डोळ्यात दाटले ॥

तुझ्या खुळ्या सहसाने 
किती नग ओलांडले 
सारे लावून पणाला 
प्रेम मिठीत घेतले ॥

ऐसा भेटता हा ऋतू 
झाले सार्थक जन्माचे 
प्रीत कळली धरेला 
द्वैत मिटले मनाचे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

फसलो असा

फसलो असा
******

बुडून 
डोळ्यात तुझ्या 
मी मरू नये 
म्हणून 

पाहणे 
डोळ्यात तुझ्या 
दिलेच होते 
सोडून

हाय हे 
जगणे पण 
शाप गेलाय 
होऊन 

मूर्ख मी 
फसलो असा 
उगा सुरक्षा
शोधून 

बघ ना
पुन्हा एकदा 
इकडे डोळे 
मोडून 

टाकले
तुझ्यावरून
पंचप्राण मी
ओवाळून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

चाहूल

चाहूल
******
हृदयात दत्त वसो सदोदित 
डोळ्यात दत्त रूप राहो ॥१
वाचेवरी दत्त नांदो सदोदित 
श्वासातील गीत दत्त होवो  ॥२
पेशी पेशीतुन दत्ताचे स्पंदन 
होऊ दे गुंजन अविरत ॥३
जंगमा जंगम जे काही जगती 
दिसावी मज ती दत्तरुपी ॥४
घटिता घटीत दिसू दे तयात 
दत्त कृपा हस्त सदोदित ॥५
सुख दुःख सारे दत्तासाठी व्हावे 
मन न रमावे अन्य कुठे ॥६
तन मन करो दत्ताचे चिंतन 
तयाने येऊन भेटी देण्या॥७
विक्रांत दत्ताच्या दर्शना व्याकुळ
लागू दे चाहुल पावुलांची ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

दत्त वाटेवरी


दत्त वाटेवरी
*********
दत्त वाटेवरी मुक्काम तो नाही 
वाहणे प्रवाही सदोदित ॥१
दत्त वाटेवरी सांत्वना ती नाही 
दुःख गणणाही करू नये ॥२
दत्त वाटेवरी सुखाची सावली 
नाहीच ठेवली कधी कोणी ॥३
दत्त वाटेवरी अखंड तापणे 
सूर्याचे बांधणे डोईवरी ॥४
दत्त वाटेवरी अन्न वस्त्र पाही 
लंगोटीची नाही खात्री काही॥५
दत्त वाटेवरी घरदार पुत्र 
नाही रे कलत्र कुणालाही ॥६
जैसे बिंब तैसे प्रतिबिंब दिसे 
भक्त देव तसे एकरूप  ॥७
विक्रांत आतुर याच या सुखाला 
चालण्या वाटेला दत्ताचिया ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

दारी

दारी
*****
आलो दिगंबरा दारी 
सरे क्लेशवार्ता सारी 
दत्त सांभाळी सावरी
दुःख अवघे निवारी ॥१॥

कैसा म्हणू मी रे आलो 
मज संतांनी आणला 
काही घडली जी पुण्य 
आज आली ती फळाला ॥२॥

आता रंगव रंगात 
मज बुडव तुझ्यात 
ऐसा करी रे विक्रांत 
नच उरावा विभक्त ॥३॥

सारे सुटो रे साठले 
माझे पणे मी जपले 
देई तृप्ती जी भेटता 
सारे संत सुखी झाले ॥४॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .


सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

महामानवास


महामानवास,
**********
तसे तुमचे वैयक्तिक वैर 
तर कोणाशीही नव्हते 
तरीही तुमचे युद्ध खरे होते 
ते समतेसाठी न्यायासाठी 
माणुसकीसाठी मांडलेले रण होते 
त्यात तुम्ही जिंकलाही 
पण युद्ध संपले नाही 
युद्ध संपत नसतात 
युद्ध फक्त शमतात 
तुम्ही गेलात ते युद्ध लढून 
कर्मयोग्या समान कर्तव्य करून 
पण तुमची ती पडलेली शस्त्रे 
ती आता कुणालाही उचलत नाहीत 
तेवढी ताकदच नाही कुणात 
मग सगळे त्या शस्त्राला फुले वाहून 
त्यावर रंग उधळून करतात त्याची पूजा 
त्याची धार दाहकता मारकता हरवून
त्याची आर्तता कळकळ विसरून 
त्या शस्त्रा सवे फोटो काढून 
आपलाच कंपू तयार करून 
राहतात मिरवत 
हे शस्त्र माझे आहे म्हणवून 
त्या शस्त्राने त्याचे 
तोडायचे  काम चोख केले 
पण त्याचे ते जोडायचे काम 
ते बाकी आहे अजून
एक संघ, एक मताचा, 
एक विचाराचा, बंधुत्वाचा,
प्रेमाचा निखळ समाज करणे 
बाकी आहे अजून.
त्या साठी कदाचित 
तुम्हाला परत यावे लागेल 
या खरच या, 
आम्ही तुमची वाट पाहतोय
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...