शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

सांगावा

सांगावा
****:
धाडला सांगावा दत्तात्रय देवे 
भक्ताचिया सवे मजलागी ॥

दत्ताची कवणे ज्ञानदेव भक्ती 
येऊ देत पंक्ती सुंदरश्या ॥

माझिया सेवेचा खारीचा हा वाटा 
तुज भगवंता पोहोचला ॥

भक्तांच्या रुपी राही भगवंत 
होऊनिया मूर्त प्रेमळ ती ॥

स्वीकारी आदेश जोडोनिया कर
विक्रांत सादर सेवेलागी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ४


शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

आधीव्याधी


आधीव्याधी
*********
दिल्या आधीव्याधी जरी त्या प्रभुने 
प्रारब्धवशाने आल्या किंवा ॥
दवा हि प्रारब्ध पथ्य ही प्रारब्ध 
भोगणे प्रारब्ध बरे होणे ॥
वेळ येता नच पथ्य कामी येते 
दवा न लागते देहास या ॥
कुणाची काय ती असे वेळ इथे 
ठाऊक नसते कुणालाही ॥
नियमात सारे बांधलेले जग 
नियमात वाग सांगे ऋतू ॥
देह तो  टाकणे आज वा उद्याला 
मग ही कशाला चिंता उरी ॥
आधी व्याधी तना षडरिपू मना 
चालला सामना चालू दे रे ॥
हाती आला क्षण दे रे स्मरणाला 
आळवी प्रभूला पुन्हा पुन्हा॥
देह त्याचा आहे मन त्याचे आहे 
निसंगत्वे राहे जगतात ॥
देवे दिली वृत्ती ज्योतही पेटती 
सदोदित चित्ती आस त्याची ॥
जगतो विक्रांत जग राहटीत
 पथ्य नियमात खेळे उगा  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ १

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

कळेना

कळेना
*******

मजलागी जग हे कळत नाही 
कोण खरे खोटे उमजत नाही 

कधी पाहतो मी रावणात राम 
कधी पांघरून रावणास राम 

कुणी वाहतात कुण्या मोहनात 
कुणी हरवती कुठल्या भ्रमात 

कुणा काय हवे कधी न कळते
बोलणे साऱ्यांचे खरेचि वाटते 

टीचभर पोट  कुणाचे भरेना 
हवेपणा मोठा ठासलेला मना 

कोण कुठे जातो ते दिसत नाही 
हरवला कुठे सापडत नाही 

रूपाला साजऱ्या होतो वश कधी
पैशास चार नि जाणे यश कधी

पुढले पाढे तेच  पंचावन्नाचे 
सुख लाचावल्या लुब्धक जगाचे


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ १



बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

जाणल्यावाचून

जाणल्यावाचून
************
जाणल्यावाचून 
जाणतो मी तुला 
पाहिल्या वाचून 
पाहतो मी तुला 

अर्थ ना शब्दात 
सुर ना श्वासात 
घडतो संवाद 
तरीही डोळ्यात

ओढ ही कसली 
तनाला मनाला 
तिढा हा कुठला 
कुण्या जन्मातला 

तुला न कळते 
मला न कळते 
ओठातले गाणे 
ओठात थांबते 

मौनात मनाच्या 
केशराचे रान 
कस्तुरी सुगंध 
धुंद माळरान 

देहात चांदणे 
निळे झिरपते 
सुरांच्या वाचून 
मन झंकारते


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कळते


कळते
****
जगलो जरी इथे मी 
कळते 
जगणे राहून गेले 

फुललो वसंतात इथल्या 
कळते 
उधळणे राहून गेले 

मारल्या  गाठी अनेक 
कळते 
उलगडणे राहून गेले 

चांदणे तुझेच होते 
कळते 
देणे राहून गेले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

सुर्वे सिस्टर

सुर्वे सिस्टर (सेवा पुर्ती)
********

जसा आपल्या नजरेने आपण पाहतो.
आकाशातील तळपता सूर्य 
जो त्याचा मार्ग कधीच बदलत नाही 
तो नेहमी एका सरळ रेषेत प्रवास करीत असतो 
तो नियमाला पक्का असतो  कर्तव्यपरायण असतो 
ऋतूप्रमाणे त्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा जरी बदलत असली 
तरी तो मार्ग, तो प्रवास सरळ स्पष्ट असाच असतो  


आणि आजच्या उत्सव मुर्ती आपल्या सुर्वे सिस्टर 
यांचे आडनाव सुद्धा सुर्वे असावे 
आणि त्यांच्यात  तसेच गुण असावे 
हा फार मोठा योगायोग आहे

तर सुर्वे सिस्टर या तशाच सरळ एक मार्गी 
आणि कर्तव्य परायण आहेत
त्यांची कर्तव्यातील पूर्णत्वाची ओढ 
हाती घेतलेले काम नीट व्हावे
त्यात कुठल्याही कमीपणा न यावा
ही प्रामाणिक तळमळच 
त्यांचे वेगळेपण अधोरेखित करते 

ती तळमळ त्यांच्या बोलण्यात शब्दात 
आणि भाषेतून उमटत असते 
मग ती कधी कधी प्रशासनाला विद्ध ही करते
 तर कधी कधी त्यांना स्वतःलाही विद्ध करते 
पण तो ध्यास ती धडपड कधीच कमी होत नाही

त्यांचे निरीक्षण व समज अचूक आहे 
त्यामुळे पालिकेतील कामातील अडथळे 
अन अडचणी त्याची जाणीव त्यांना आहे
आणि त्या दूर करण्यासाठी त्यांनी केलेला 
आटापिटाही मला माहित आहे

 सध्या आपले रुग्णालय 
अडथळ्याच्या शर्यतीतून जात आहेत 
तीन सुकाणू  असलेले तीन तुकड्यांचे 
जणू हे जहाज आहे 
त्यात अशा प्रचंड अडचणीतून आपण रूग्ण सेवा देत आहोत 
त्यात आपल्या सिस्टर कामगार 
टेक्निशियन क्लर्क हे सर्व एका दिव्यातून जात आहेत 

अशावेळी सुर्वे सिस्टर सारखी व्यक्ति सोबत असतील तर
ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून काम करणे फार सोपे जाते 
कारण अनेक बारीक सारी गोष्टीत लक्ष देणे शक्य नसते 
त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करणे  हे मोठे टास्क असते 
आणि सिस्टर ते खूप सुंदर रितीने पार करत होत्या त्यात संशय नाही .

खरंतर रिटायरमेंटचे वेध सिस्टरांना 
दोन अडीच वर्षांपासूनच लागलेले होते 
त्या नेहमी माझे इतके महीणे राहिले 
इतके दिवस राहिले असे सांगत असत .
आणि ते साहजिकच आहे
 इतके वर्ष प्रामाणिकपणे दिवस रात्र 
महानगरपालिकेत रूग्णसेवेचे 
काम करणे फार मोठे दिव्य आहे 

आणि ते  केवळ एक नोकरी म्हणून 
न करता त्यात आपले मन ओतून 
ती एक पूजा समजून काम करणाऱ्या ज्या काही 
स्टाफ सिस्टर मला माहित आहेत 
त्यापैकी  एक अग्रमणी आहेत 

त्यामुळे त्यांचे रिटायर होणे 
हा माझ्यासाठीतरी  एक मोठा लॉस आहे
तरी पण त्यांनी केलेल्या सेवेच्या अंती
त्या सन्मानाने आनंदाने निवृत्त होत आहेत 
ही त्यांच्यासाठी सुखाची आणि आनंदाची गोष्ट आहे 
व त्यांच्या त्या सुखात आणि आनंदात मी सहभागी होत आहे 
आणि त्यांना आनंदाने निरोप देत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

मुंगी देव


मुंगी देव 
******

मुंगीचे जगणे कळले मुंगीला 
मार्ग ठरलेला चालायचा ॥
शोधता शोधता वारूळ शिखरी 
मुंगी पोहोचली एकटीच ॥
क्षितिजा पर्यंत दिसली वारूळं
चाललेला खेळ दाण्यासाठी ॥
जरी ना दिसला मुंगी देव तिला 
प्रश्न न सुटला अस्तित्वाचा ॥
मुंगीपण तिचे तिला पुरे झाले 
स्वीकारी फुटले पंख दोन ॥
मग ती उडाली कुणा न दिसली 
विरूनिया गेली आकाशात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...