शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

सत्ता

सत्ता
*****:
जरी पदोपदी असे तुझी सत्ता 
लागतो न पत्ता कधी तुझा ॥१
तुझ्या माझ्यामध्ये मायेचा पडदा 
का रे हा सर्वदा टांगलेला ॥२
बहु लांब रुंद बदले क्षणात 
पाडी संभ्रमात मजलागी ॥३
जीवलग नाती प्रीतीच्या त्या गोष्टी 
संसार आसक्ती सुटेनाचि ॥४
हुशारीच्या बाता ज्ञानाचे दर्शन 
येतसे घडून वारंवार ॥५
देहाच्या संगती गुणाचे वर्तन 
चाले रात्रंदिन जीवनात ॥६
थकलो कृपाळा साऱ्या पसार्‍यास 
प्रभू तुझा दास शक्तीहीन ॥७
कृपाची केवळ अन्य न साधन 
त्राही भगवन तूच मज ॥८
विक्रांत पतीत संसार पंकात 
धरून मनात आशा तुझी ॥९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

वैरी

वैरी
****
देहाची ही वाट देहाच्या गावाला 
जातसे वळून सुखाच्या डोहाला 
हिरव्या जाळीत पिकलेली फळे 
आंबट वा गोड रुचिर मधाळे 
थांबणार पाय वळणार हात 
घेता ओंजळीत कैसी रीत भात 
कधी जाता भेटे बकुळीची सडा 
वेचतांना फुले जीव होतो वेडा 
हसू देत कुणी बघू देत कुणी 
छातीत भरुनी  घ्यावी ती हुंगुनी 
फळ फुले पाने बहराचे गाणे 
पहावे ऐकावे म्हणावे प्रेमाने 
सुख नाकारून आनंद मारून 
कर्म दरिद्री तो जातसे निघून 
तयाला कैसे रे कळेल जीवन
घेतो जो वैरी स्वत:ला करून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

प्रकाश


प्रकाश
*****:
प्रकाशाच्या घरी प्रकाशाच्या सरी 
एक एकावरी ओघळती ॥१

प्रकाश अंतरी प्रकाश बाहेरी 
प्रकाश उजरी दिशा होय॥२

एक एक पेशी देहात प्रकाशी 
चैतन्याच्या राशी स्वयंभूचि॥३

घनीभूत झाली प्रभा ती कोवळी 
मूस वितळली सुवर्णाची॥४

मी पणे विक्रांत जाणीवी जिरत 
पाहणे पाहत  कौतुकाने॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

सावळी राधा


सावळी राधा
**********

पाहणे ते तुझे शब्दाविण गाणे 
लाख लाख तारे उरी कोसळणे
हसणे ते तुझे वासंतिक वारे 
तार काळजाची झणाणे थरारे 
दिसणे असे की आषाढ दाटला
मल्हार सावळा गात्री थरारला
रुसणे जणू की हिम गोठलेला 
अंतरात उष्ण बाहेर थिजला 
टाळले तुजला किती ठरवून
उमलते कळी येता तू दिसून
भाळलो कसा मी मला न कळून
हरवलो जळी जळचि होवून
जाणतो जरी हे असे व्यर्थ  खुळ 
क्षण सवे तुझ्या सुखची केवळ 
असू दे अंतरी चित्र सावळे ते 
सावळ्या राधेस कृष्ण तो कळू दे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

कण


कण
*****

डोळे वितळले भान .साकळले 
दिशात कोंदले पाहणे हे ॥१

अद्वैत फुलाला शून्य गंध आला 
ध्वनी निनादला अनाहत ॥२

गूढ अस्मानात झगागली वीज 
सरू गेली निज जन्मांतरी ॥३

पाषाण फुटले सूर्य उगमीचे 
झाले अशनीचे शतखंड ॥४

उजेड लाजला अंधार निमाला 
तेजाने तेजाला गिळियले ॥५

विक्रांत कुठला कुठे पोहोचला 
कण पांघरला अवनीने॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

रविवार, ३१ जुलै, २०२२

वर्तुळ


वर्तुळ
*****

सुटल्याच अंती साऱ्या व्यर्थ गाठी 
दूरावले धागे गेले ताटातुटी ॥

तुला दोष नाही तुझा द्वेष नाही 
झाला अपघात पण गुन्हा नाही ॥

विझल्या मनाचे जग एकट्याचे
एकटे वाहणे ओझे जीवनाचे ॥

तुझे जग तुला आता माझे मला 
भेदल्या वाचुनी वर्तुळ वर्तुळा ॥


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.
529

शनिवार, ३० जुलै, २०२२

रिते डोह


रिते डोह
*******

तुझी गाणी
झाली जुनी
कोमेजल्या 
फुलावानी

रंग नाही 
गंध नाही 
विझलेले 
स्वप्न काही

तरी जीव 
तुटतोच
देठ उरी
रुततोच 

कातरश्या
संध्याकाळी 
काही शब्द 
ओठावरी 

नको तरी
आठवती 
रिते डोह
उपसती 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.


रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...