रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

दोष


दोष
*****

असे नाही कि दोष हे
दिसत नाही मजला
असे नाही की ओहोळ 
मिळत नाही नदीला 

जरी जाणतो इथे की
मी नच गुणसागर 
वागवतो जन्मजात 
किती विचार विकार 

घालूनिया साकडे ते 
सदैव दत्तप्रभूला 
दोष सारे पाहतो हे 
जरी सदा धुवायला 

काम क्रोध लोभ मोह 
मीच आहे वाहणारा 
थांबती तरंग परी हे 
थांबताच क्षुब्ध  वारा 

थांबणारा वारा परी
कृपा असे खरोखर 
पडे जळी प्रतिबिंब 
शांत होता सरोवर 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘..



शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

भक्ती देई


भक्ती देई
*******

दत्ता देई भक्ती
तुझे गुण गाया
रूप वर्णावया
प्रेमभावे ॥

जरी वानवाच
तिचा माझ्या ठाई 
धनिक तो पाही 
दत्त बाप॥

जरी राजयाचा 
लेक हा ढोबळ 
सामर्थ्ये सबळ 
लोकमाजी ॥

दत्त शब्द येता 
माझ्या कवनात
दत्तकृपा त्यात 
उतरते ॥

अवघे दत्ताचे
करणे घडणे 
विक्रांत लिहणे 
नाममात्र ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.८/२४३ 

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

जाहलो दत्ताचे

जाहलो दत्ताचे
**********

आम्ही जाहलो दत्ताचे 
भक्ती पावून कृपेचे ॥

आता भय ते कसले 
जन्म आले काय गेले ॥

देवे धरिले हाताला 
प्रेमे ठेविले पदाला ॥

मज भेटला भेटला 
ठेवा जन्मजन्मातला ॥

पुण्य आले रे फळाला 
धर्म केलेला हाताला ॥

दत्त अति आवडला 
जीवा सोयरा जाहला॥

लावी भस्म कपाळाला 
म्हणे करूणा पदीला॥

स्तोत्रे थोरल्या स्वामींचे 
प्रेम ह्रदयात नाचे ॥

कधी वारी गिरनारी 
वाडी वा गाणगापूरी  ॥

जाता दत्ताच्या वाटेला 
जीव होतो हरखला ॥

गातो विक्रांत हे गाणे
दत्ता स्मरून प्रेमाने ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

आले बोलावणे


बोलावणे
********

आले बोलावणे 
आले बोलावणे 
आले गं साजणे
बोलावणे 

कण कण होय 
धुंद आनंदाने 
रुपेरी चांदणे 
डोळीयात 

चालेन गं आता 
मोहक ती वाट 
अनवट घाट 
आवेगाने 

जीवलग गाव  
गावाची ती वेस 
करता प्रवेश 
मोहरेल 

आणिक माझिया
जीवाचे ते घर 
पंचेंद्रिया धर 
नसलेले ॥

भेटता तयाला 
देह हा वाहीन 
प्राण मी अर्पीन 
सांगू काय ॥

सुखाचे साजीरे
वस्त्रचि नेसेन
अहंता सांडेन
मळलेली ॥

प्रेमाची नुतन
दृष्टि मी होईन
डोळ्यात नांदेन
भक्तांचिया 

विक्रांत आतूर 
मनात काहूर 
कधी गिरणार 
पाहील गं ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

देव तत्व

देव तत्व
*******
जैसे ज्याचे मन
तैसा भगवान 
तैसे चे दर्शन 
तया होई ॥१

राम शिव कृष्ण 
रूप ही सगुण 
कुणाला निर्गुण 
रुचतसे॥२

तर मग खरा 
देव असे कोण 
पहावा शोधून 
ज्याचा त्याने ॥

सगुणाची काया 
निर्गुण आकाश 
आवडीचा भास 
ज्याचा त्याचा ॥

चित्ती अवतरे
देव कुणा एक
होय प्रकाशक 
तोच तया 

काचेचा तो हट्ट 
कोणी करतात 
आणि धावतात 
दुजी तोडू ॥

तया या मूढांची 
मनेची ओखटी 
तम अरबडी
वेढलेली ॥

विक्रांत दत्ताचा 
पाहतो रूपाला 
जाणून तत्त्वाला 
सर्वव्यापी ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.२६२

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

राहू दे


राहू दे
******

राहू दे रे दत्ता
मागील ते सारे
हासिल तया रे 
काही नाही ॥

चुकले माकले 
पथ भटकले 
घरी परतले 
लेकरू हे ॥

तैश्या माझ्या त्रुटी 
जाय विसरून 
घेई कवळून 
दत्ता मज ॥

अजुन देहात 
बहु रानभुली 
मन रानोमाळी 
भटकते ॥

परी तुझी याद 
आणते खेचत
मज सांभाळत
सर्वकाळ ॥

तुझिया प्रेमाची
सदा असो ओढ
विक्रांता आवड
दत्त नामी ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

जुगार


जुगार 
******

मध लावलेले बोट 
देवा तुझे भागवत 
चार सार्थ झाले संत 
तुझ्या प्रचाराचा थाट 

चाले दुकान चांगले 
पूर गिराईक थोर 
घेता माल हाती कळे
हा तो अवघा जुगार 

कोण एक मिळवतो 
खुर्दा वाजवून जातो
भूल पडते जीवाला 
जन्म पणाला लागतो 

असे लागुनिया नादी
किती गेले देशोधडी
असे भुलुनिया खेळा
बहू झाली बरबादी

खेळ जुगार हा तोटा 
परी  सुटेना सोडता
विक्रांत लागला पणा
आता काही नाही हाता 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...