गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

ऋतू

ऋतू 
*****

ऋतू कोरडा तो जाता 
मेघ ओशाळे सावळा 
पान रुसत एकेक  
झाली मातीवर गोळा 

हाती असते कुणाच्या 
इथे रुजणे फळणे 
पाणी ओघळते डोळा 
व्यर्थ हसणे रडणे 

पुढे असेल-नसेल 
जन्म पाहिला तो कुणी 
लाख सुचतात ओळी 
परी होत नाही गाणी

दिसे भिजलेले स्वप्न 
कधी पहाट वार्‍याने 
पण उघडता डोळे 
जग तेच सुने सुने 

दुःख साकळून गाठ 
मनी होय काळी-निळी 
तुझे प्रेम आहे दत्ता 
माझी दवा सर्वकाळी 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

साधू भेटी


साधू भेटी
*******

थोर या जगती
किती ऋषीमुनी
देवाला पाहुनी 
पूर्ण झाले ॥१

परी तयांची ती 
पडेनाची गाठी 
मिटेनाच‌ भ्रांती 
जीवनाची ॥२

भेटून कधी ते 
नच रे भेटती 
उदास वागती 
जगण्यात ॥३

कधी पोहोचणे 
देहा न घडते 
काय आड येते 
कुणा ठाव ॥४

विक्रांत दत्ताला 
मागतो मागणे 
घडू दे भेटणे 
तया सवे ॥५

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

आधार



आधार
******
फुटक्या नावेस किनार्‍याची आस
तैसा जगण्यातदत्ता तुझा ध्यास

लागता लागता परी कधी थडी 
वाढतो प्रवाह जातो देशोधडी 

काय दैव  करे अशी काही कृती 
पाप फळून वा होय ताटातूटी

कळे ना मजला काय हे फेडणे
तरता तरता संसारी बुडणे 

बुडता बुडता पुन्हा देई हाक
येवून कृपाळा मजलागी राख 

कोमल कृपाळू देई तुझा हात 
नकोस विसरू विक्रांता हे नाथ
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

बासरी

बासरी
*****

दूर कुठेतरी 
वाजते बासरी 
मनात साजरी 
मुर्त तुझी ॥

तुझे मंद हसणे 
तुझे मृदू बोलणे 
डोळ्यात पाहणे 
खोलवर ॥

तव आठवांची 
मालिका क्षणात
वाहते डोळ्यात
पुन:पुन्हा ॥

तव खांद्यावर 
ठेवुनिया मान
हरवून भान 
जाते जणू ॥

कधी गमे मज 
बासरी मी होते
अन सुरावते 
तव ओठी ॥

होते तो चंद्रमा 
शुभ्र पौर्णिमेचा
तुझिया रुपाचा 
दर्पणची ॥

होते वा यमुना 
खळाळती मंद 
कणोकणी धुंद 
उसळती ॥

हरवते कृष्णा 
माझे राधापण 
जगते होवून
कृष्णमय ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 




रविवार, २६ डिसेंबर, २०२१

ज्ञानदेव कृपा

ज्ञानदेव कृपा
**********

ज्ञानदेवे केला 
दीनांचा उद्धार 
पतिता आधार 
होऊनिया ॥१

जातीभेदा चूड 
लावली पहिली 
गुढी उभारली 
मानव्याची ॥२

विटाळ चांडाळ 
धर्माला किटाळ
मनास भोंगळ 
मोडियले ॥३

देवाचिया दारी 
समान ते सारी 
विश्व वारकरी 
सिद्ध केले ॥४

नेली ज्ञानगंगा 
गीर्वाणी कुटिरी 
भगीरथा भारी 
कृती केली ॥५

विश्व पुरुषाच्या 
हृदयात दिवा 
जाणिवेचा नवा 
पेटविला ॥६

अमृत ते कण 
वेचतो विक्रांत 
होत ऋणाईत
जन्माचा हा ॥७

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

माणूस माझे नाव


माणूस माझे नाव
******

माणूस माझे नाव रे
धरती माझे गाव रे 
जाणतात सारे परी
कुठाय बंधूभाव रे ॥१

कुणी म्हणतो तावाने
अरे माझा धर्म मोठा 
सोडुनिया तुझ्या वाटा
सामील हो माझ्या गोटा ॥२

पैसा घेई हवा तर 
मार खाई नाहीतर
असे कर वा तसे ते
मरशील नाहीतर  ॥३

कोणी जगतो भिकारी 
भीक मागे दारोदारी
कोणी धनिक नशीबी
देैवाची का लीला सारी ॥४

माणुस  नाव तुझे ही
माणूस नाव माझे ही  
परंतु तू तो मी नाही
श्रेष्ठ सदा श्रेष्ठ राही ॥५

तुझी जात खालची
माझी जवळी राजाची
मैत्री ही मैत्री पुरती
बात न रोटी बेटीची ॥६

जरी माणूस समान
मन बुध्दि असे एक 
रंग वंश जात धर्म 
करती भेद अनेक ॥८

या भेदाच्या पलिकडे 
एक दोघे फक्त जाती
बाकी सारी आंधळी ती
त्या डबक्यात राहती ॥९

माणूस माणुस आम्ही
वर वरचि म्हणती
डर डरावाच्या भेदी
घरे आपुली  भरती ॥१०

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

काही गूढ प्रश्न

काही गूढ प्रश्न 
=========
उमटण्याआधीच रे
प्रश्नही  पुसून गेले 
उत्तराचे भाग्य थोर 
मग हरवून गेले ॥

तसे पाहीले तर तो 
पेपर सोपा  नव्हता 
कधी नच वाट्या आला 
विषयाचा स्पर्श होता ॥

खरे खोटे त्यात काही 
कळण्या मार्ग नव्हता
म्हटले तर खेळला 
नकळत  डाव  होता॥

डोळ्यावर काचा काळ्या 
खोल किती असे ठाव 
पाहण्यास पाहणाऱ्या 
नव्हता मुळीच वाव ॥

तरी उडी घेतली नि 
काच काळी तडकली 
काच असे काच अंती 
उगाच कापून गेली ॥

कापलेच काही जरी 
घाव खोल नसे तरी 
डोळीयांची चिंता का रे 
सदोदित असे उरी ॥

ते ही गूढ हे  ही गूढ 
गूढ असे सारे  काही 
प्रश्न हवा होता तरी  
सुटल्या तो वाचूनही ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

https://kavitesathikavita.blogspot.com 

☘☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...