शनिवार, १७ जुलै, २०२१

घर वाळूचे

घर वाळूचे
🏰🏰🏰

घर वाळूत बांधले
एका लाटेत मोडले
गेली त्वरे तू निघून 
तुज सांगावे आलेले

उगा थोडासा इकडे 
उगा थोडासा तिकडे 
जीव अडकला कसा
होते तुलाही ते कोडे 

कधी जमवली फुले
काचाकवड्या शिंपले 
पाय पुरून वाळूत 
किती सूर्यास्त पाहिले 

येता अंधारा चाहूल 
जग पालटून जाई
जाय ओढीने पावुले
वाळू झटकून काही

पाणी होतसे सावळे 
तुच मनी हिंदकळे
तुझे नसून असणे 
दिसे सर्वत्र दाटले

कुण्या संध्याकाळी एका 
तुझे झाले नाही येणे 
पाय माझेच वाळूत 
घर झाले ना बांधणे

किती उलटले मास
वाट  पाहणे थांबले
कुण्या ओढ्याचे पाणी
कुण्या नदीत चालले

येता अंधार दाटून
जाता सागर विझून 
मनी होतेस तू गाणे 
जीणे जाते उजळून 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सेनापती


सेनापती 
******
काही सेनापती असतात 
उत्कृष्ट आखणी करणारे 
माणसं हेरणारे 
आणि त्यांची 
नीटस पेरणी करणारे 

काही सेनापती असतात 
रणात उतरणारे 
घोड्याला टाच देऊन 
शत्रूला भिडणारे 

काही सेनापती असतात 
या दोन्हींचे समन्वय साधणारे 
अस्मानीच्या सुलतानीला 
तलवारीच्या टोकावर पेलणारे 

आपल्या वाक्य चातुर्याने 
आणि संयमी भाषणाने 
अंतर्गत बंडाळी मोडणारे 
छुप्या विरोधकांना नमवणारे 

आणि या सर्व गुणांनी युक्त 
सेनापति आम्हाला लाभले होते 
ते कधी सक्त होते 
कधी काटेकोर होते 
कधी धारदार होते 
पण अंतरी क्षीरसागर होते 

🙏🙏
 

उर्मी

उर्मी
******

कधी उरातून
येथे उफाळून 
उर्मी ती प्राचीन 
जाणण्याची ॥१

शोधतो उपाय
तयाचे उत्तर
मारतो चक्कर 
कुठे कुठे  ॥२

कुठे तो धनाचा 
चाले कारभार 
दक्षिणा व्यापार 
खुशी खुशी ॥३

कुठे नियमाच्या
जाचक आखीव
स्वप्नांच्या रेखीव
भुलथापा ॥४

सांगतसे कुणी
अमुक कोर्सनी
येतसे घडूनी 
सारे काही ॥५

ऐकतो आणिक 
पाहतो विक्रांत 
धावतो जगात 
पुन्हा त्याच्या ॥६

हि तो पुरवणी  
त्याच जिंदगिची
सुखे जगण्याची 
अधिक रे ॥७

जगणे म्हणजे 
असते कळणे 
नि वाहत जाणे
तरी सुद्धा ॥८

देई दत्तात्रेया
जगण्या साधन 
सार्थसे कारण
वाहण्याला ॥९

 
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


शुक्रवार, १६ जुलै, २०२१

प्रेम बळे



प्रेम बळे
*******

देवा तुझे नाम 
घेताच प्रेमाने 
अवघे जगणे 
गोड  होते ॥

संत कृपा होते
गुरु कृपा होते
वाट सापडते
हरवली ॥

दुःख आणि दैन्य 
अवघे ते जाते
भाग्य ची धावते
शोधावया ॥

मागीतल्यावीन
दातार होऊन 
देतो उधळून 
सुख पळे ॥

प्रेमाचे रे बळ 
जाणतो केवळ 
विक्रांता कृपाळ
पदी ठेवी ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १४ जुलै, २०२१

भासवत

भासवत
******

असे तिथे असे
निराळा विक्रांत 
दृष्टीच्याही आत 
बसलेला ॥

जगण्याचा सोस 
असतो देहाला 
काळ ठरलेला 
परी त्याला ॥

जगणे मरणे
मिळून दिसते
नसणे कळते 
व्यापलेले ॥

देहाचा आकार 
कळतो प्रकार 
कशाचा आधार 
नसलेला॥

मिटू जाते खंत 
सारे शांत शांत 
शून्य आकाशात 
शून्य दाटे ॥

सांगया ही मात 
नाही रे सांगत 
होऊन निवांत 
विक्रांत हा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, १३ जुलै, २०२१

गुंतणे


गुंतणे 
****
गुंतण्याला मोह माया
कधी कुणी म्हणू नये 
पौर्णिमेच्या चांदण्याला 
क्षणिकसे गणू नये 

एका क्षणी एक उर्मी 
मनी हळू उमलते 
दिले दान दैवाने जे 
उद्यावर नेऊ नये 

गुंतणे ते घडू दे रे
आकांक्षाच्या ताटव्यात 
बहरून ऋतू येता 
फुलण्या ना म्हणू नये

देता यावे घेता यावे 
नकारात मरू नये 
उपेक्षेच्या ओझ्याखाली 
जीव उगा दबू नये 

फळफुली बहरतो 
पानझाडी हरखतो 
झाल्याविना वृक्ष असा 
जीवनाला भेटू नये


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १२ जुलै, २०२१

मालक


 

मालक
""""
दत्त जीवनाचा 
झाला या मालक
आवक जावक
तया हाती 

तया मर्जी विना 
कोणीही येवुनी
उगा या जीवनी 
प्रवेशे ना

शत्रु मित्र किंवा 
असो प्रियजन 
सारे ठरवून 
त्याचे कृपा 

तयाचेच देणे 
मान-अपमान 
घेतसे भोगून 
सुखाने मी 

जेैसी सुत्राधिन
काष्टाचे खेळणे 
विक्रांत जगणे 
दत्ता हाती


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...