सोमवार, ७ जून, २०२१

शेवटचे स्वप्न


शेवटचे स्वप्न
**********

शेवटचे स्वप्न माझे 
जेव्हा गळून पडले 
आभाळ रिते मोकळे 
येऊन कुशीत बसले 

मागे-पुढे भरलेले
अथांग हे निळेपण 
जाणिवेला वेटाळून 
होते एक रितेपण 

हवे पणाचा कल्लोळ
नको पणाचा गोंधळ 
कवड्यात मोजणारा 
सरला होता बाजार 

सोबतीला फक्त होता 
श्वास एक संथ मुक्त 
कणाकणात स्वागत 
अज्ञाताचे बिनशर्त 

होतो मी म्हटले तर 
म्हटले तर नाही ही
वाऱ्याचे असणे होते
नव्हत्या कुठे दिशाही


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

आतली वाट


आतली ती वाट 
मज दावी दत्त 
प्रकाश पहाट 
होऊनिया ॥

साधने चालता 
अंधार दाटता  
प्रकाश दिवटा 
देऊनिया॥

सुखाची चढणं 
दुःख उतरण 
एकटा चालून
कळू येई॥

टोचती न काटे 
जाणती न खड्डे 
मग ओरखडे 
कैसे काय ॥

कुठून मी आलो 
कुठे मी चाललो 
सारे विसरलो 
दत्तानंदी ॥

आणले तू बापा 
नेशिल तू बापा
कशाला मी धापा 
टाकू उगा॥

विक्रांतची वाट 
वाटेचा विक्रांत
दत्त संकल्पात 
पडलेली ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, ६ जून, २०२१

शककर्ता

🌷॥ शककर्ते शिवराय ॥🌷
*********
हिंदुभूमीच्या भाळावरती  
आज लागला टिळक 
उभा राहिला तट बुलंदी 
होऊनिया दीन रक्षक 

छत्रपती शिवराय जाहले 
उठली मोहर नभात 
उराउरातील घोष उमटला 
इथल्या कणाकणात 

रायगडावर आज जाहली 
सुवर्ण मंगल पहाट 
परवशतेच्या मिटला अंधार 
दिसू लागली नवी वाट

शतकांचे ते रक्त सांडले 
रणवेदी वर होत आहुती
तर्पण झाले त्या पितरांचे 
पाहता पटी शिवछत्रपती 

ठसा उमटला काळ पटावर 
शककर्त्याचा जय जयकार 
आनंदाचे अन अभिमानाचे 
अजून गारुड मनामनावर


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ५ जून, २०२१

शोध अंतरी

शोध रे अंतरी
*******:***

आणिक ती भेटी
काय घ्यावी दत्ता
सदैव तू चित्ता 
बसलेला ॥१

यावे गिरनारी
वाडीला अथवा 
जरी वाटे जीवा
सदोदित ॥२

चैतन्याचे गाणे 
फुटे देहातून  
येताची धावून 
तया स्थळी ॥३

परी देश काले 
घडेना ती सेवा 
म्हणूनिया दैवा
रुष्टु नये ॥४

जणू सांगे दत्त 
शोध रे अंतरी 
शोध आतातरी 
वळूनिया ॥५

शोधले बाहेरी 
तुवा आजवरी 
झाले ते बहुरी 
आता पुरे ॥

विक्रांत अंतरी 
पाहतो दत्ताला 
पूजतो पदाला 
सुखावून ॥६



🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ३ जून, २०२१

दत्तदेव शिरी


दत्तदेव शिरी 
*********

दत्तदेव शिरी 
ज्ञानदेव उरी 
प्राणात श्रीहरी 
सोहं भाव 

तयाच्या खेळात
रमतो सुखाने 
दासाचे गाणे 
आळवितो 

संत सज्जनांचे 
योगीया भक्तांचे 
बोल मनी साचे 
साठवतो 

आता आताच ही 
चालू लागे वाट
झाली सुरुवात 
याच जन्मी

काय सांगू पण
सुखाचे हे सुख 
तया नाही मुख
बोलावया

कुठल्या जन्माचे 
पुण्य आले फळा 
लागला डोहळा 
स्मरणाचा

सगुण-निर्गुण 
गुणातीत गुण 
बुडालो संपूर्ण 
आनंदात

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, २ जून, २०२१

प्रेत टाळू लोणी

प्रेत टाळू लोणी
******

प्रेत टाळूवरी 
ठेवियले लोणी 
पाहिले मी कोणी 
खाणारे ते ॥

तया मोठा मान 
जगती सन्मान 
खोटे पुण्यवान 
धूर्त मोठे ॥

सत्ता संडासाचा 
तया अभिमान 
तर्र ते पिऊन 
उपमर्द ॥

कृमी कीटक ते
जणू नरकाचे 
वस्त्र रेशमाचे 
पांघरले ॥

धन हाच धर्म 
तीच तया निष्ठा 
सुवर्णाची विष्ठा 
सुखविती ॥

जन्म कोटी दुःख 
तया ललाटासी 
पापे महाराशी
केली त्यांनी ॥

विक्रांता करूणा
पाहुनिया तया 
देई देवराया 
बुद्धी जरा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

मंगळवार, १ जून, २०२१

मज खुणावते




मज खुणावते 
🌸🌸🌸

नको धन मान 
नको मोठेपण 
सुख भोगी मन 
नको आता ॥

दयाळा विटलो 
सारे संभाळता 
भार  होई चित्ता 
आता सारे ॥

देई रे कफनी 
देई रे कटोरा 
सांडून पसारा 
जावे वाटे ॥

आकाशाचे छत 
मज खुणावते 
धरा ये  म्हणते 
रहायला ॥

कुठवर साहू 
अडले नकार 
एकांता होकार 
कधी देऊ ॥

येई दत्तात्रेया 
येई रे हदया 
जाणून सदया 
भाव माझा ॥

विक्रांत जगात 
परक्या घरात 
तुझं आठवत
राहतो रे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...