शनिवार, १५ मे, २०२१

वठताच झाड



वठताच वृक्ष 
**********

वठताच वृक्ष 
पक्षी उडून जातात 
घरटी खाली होतात 
आणि उरते ते फक्त 
वृक्षाचे एकटेपण 
त्यात पक्ष्यांची 
काहीच चूक नसते 
अन वृक्षाचेही 
काही चुकलेले नसते 

हा नियम आहे जगण्याचा 
वठलेल्या झाडाला कवटाळून 
जर  पक्षी बसले असते
तर त्यांचे मरण ठरलेले होते

होय तो वृक्ष सुंदर होता 
फळाफुलांनी बहरला होता 
कित्येक पिढ्या पक्ष्यांच्या 
अंगाखांद्यावर वाढवल्या त्याने 
कित्येक पाखरांना पांथस्थांना 
सावली दिली आहे त्याने 

पण आता तो वठला 
हे सत्य आहे 
कुठल्यातरी वादळात 
जोराच्या पावसात 
कधीतरी उन्मळून पडेल तो 
जसा प्रत्येक वृक्ष वाढतो 
फळतो फुलतो आणि वठतो

वृक्षाशी ज्यांना बोलता येते 
त्यांना विचारून पहा 
ते सांगतील 
म्हणूनच 
कुठलाही वृक्ष रडत नाही
कधीच कुढत नाही
 
खरं तर त्याच्या प्रत्येक पानातून 
तो रोज मरत असतो 
माती होऊन पुन्हा रूजत असतो 
बहरत असतो 
ते क्षण दिवसांचे असते 
अन हे कायमचे असते 
त्या आकृती पुरते

पण तो येणारच असतो पुन्हा 
जसा मी आलो आहे 
आलो होतो 
आणि येणार आहे 

कारण जीवन अनंत आहे 
ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे 
प्रज्ञेच्याही पलीकडे 
म्हणूनच मृत्यूसकट या जीवनाच्या
संपूर्ण स्वीकारातच 
मुक्ती आहे .
इथे या क्षणी

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

जीवन अपघात


जीवन व अपघात
💮💮💮💮
.
जन्मास येतो आपण 
तो असतो एक अपघात 
आपण का जन्मलो 
इथेच का जन्मलो 
असेच का जगलो 
या कुठल्याही प्रश्नाला 
वैज्ञानिक उत्तर नसलेला .

जशी असतात भौतिक जगतात 
बहुतेक प्रश्नांना उत्तरं
अन अपघातांना कारणं 
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत 

जन्मानंतर घडणारी प्रत्येक घटना 
जगण्याचा निरंतर प्रवास 
ती जगण्याची आसक्ती 
ती जिजिविषा 
त्यात असलेल्या 
काळ्याकुट्ट निराशा सकट 
हा सारा प्रवास अकारण असतो 
अकारण दिसतो 

हात पाय तुटून माणसं जगतात 
सरपटत खुरडत चालत राहतात 
मुळे उन्मळून झाडे पडतात 
त्यांच्या पडलेल्या कलेवरांना 
धुमारे फुटतात 
आणि मुळे ही रूजतात कधी कधी 
ती जगत राहतात 
आडव्या बुंध्यातून वर जात 
हा ही एक अपघातच 

आणि मरण !
जन्माला येणे अपघात असेल तर 
मरणे दुसरे काय असणार 
रस्त्यावर गाडीखाली येवून
पाण्यामध्ये बुडून 
वीज अंगावर पडून 
वगैरे वगैरे मरणं 
तर शब्दशः अपघाती मरण असते 

पण वय होऊन 
हृदय बंद पडून 
अवयव निकामी होऊन 
कुठल्याशा अनामिक 
साथीच्या रोगाला बळी पडून 
जे जाणे असते 
तो ही अपघातच असतो
जीवाला जीवना पासून 
तोडून उपटून टाकणारा 

बाकी जीवनातील घटना 
जश्या  शाळेतील ऍडमिशन 
लग्न नोकरी बदली हे सारे 
अपघातच असतात नाही का ?
पुर्वकल्पना नसणारे

असे सारे जीवन अपघातांनी 
वेटाळून टाकलेले दिसते 
कारण 
अकस्मात माहित नसतांना  
कल्पना केली नसताना 
घडणारी
तसेच  फलश्रुतीची वा परिणामाची
शाश्वती नसणारी  घटना 
म्हणजेच अपघात 

इथे त्यांना कोणी 
गोड अपघात म्हणा 
वा कडू अपघात म्हणा 

अन अशी ही 
अपघाताने सुरू झालेली 
अपघातांची मालिका 
अपघातातच संपते 

आपण म्हणतो 
जीवन जगले 
पण जीवन जगले जात नसते 
तर घडले जात असते 
पाण्यात पडलेल्या ओंडक्यासारखे 
पुढे पुढे सरकत 
तटावर धडकत 
कातळावर आपटत 
डोहावर तरंगत वा 
धबधब्यात आपटून फुटत
त्याचे असलेले किंवा नसलेले 
प्रयोजन संपेपर्यंत 

एकदा हे कळले की 
नुसते जगता येते 
आहे त्या जीवनात 
मिळालेल्या प्रवाहवर वाहत 
सुख-दुःखाना तोंड देत 
शांतपणे तरंगत 
कारण
जगणे घटित होत असते
अन ते पाहता येते.


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शुक्रवार, १४ मे, २०२१

पुन्हा. .


पुन्हा
*****

पुन्हा रोग तोच एक लागू दे गं मला 
पुन्हा तुला एकटक पाहू दे गं मला  ॥

मनामध्ये तुझे ते ठाण मांडून राहणे 
रूसने तुझ्यावरी मी वा मोहून बोलणे ॥

पुन्हा डंख जीवनाचे होऊ दे गं मला 
सदा त्या नशेत धुंद असू दे गं मला  ॥

ते तुझे दूरदूर जाणे क्षणिक जवळ येणे 
त्या क्षणाच्या मोहराचे नवीन गाणे होणे  ॥

पुन्हा सूर हळवे ते गाऊ दे गं मला 
हरवून डोळ्यात गूढ जगू दे गं मला  ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गोष्ट


गोष्ट
*****

तुच सुरू केली होती 
तुच शेवटा नेलीस 
गोष्ट तुझी माझी खुळी
हसून पुसून गेलीस

चार थेंब दवाचे हे 
मंतरलेल्या क्षणाचे 
म्हणालीस एवढेच  
आयुष्य असे रे यांचे 

छोट्याश्याच गोष्टीचा त्या
छोटासा शेवट झाला
फुलण्या आधीच गोष्ट
शेवट  वाट्यास आला

काय कुठे घडले ते
नसे कुणास कळले
कुठे काही अंकुरले
मातीवरती न आले

आता गोष्ट लिहायला 
सांगूच नको कधी तू
फाटलेल्या पानांना या
फाडू नको अधिक तू

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, १३ मे, २०२१

देव,लढाई व परीक्षा

देव परीक्षा व लढाई
🌸🌸🌸🌸🌸🌸

नापास झालेल्या मुलांने
घालाव्यात 
कॉलेजला प्राध्यापकाला 
आणि युनिव्हर्सिटीला 
पोटभर शिव्या 

तसा देवा  
मी तुझ्यावर घसरलो होतो 
आणि 
आश्वासन देणाऱ्या
गुरूच्या घरादाराचा
मठाचा शिकवणूकीचा
परंपरेचा 
केला होता उद्धार

होय चुकलंच होतं माझं
पण पूर्णत: नाही
कारण परीक्षा देऊन आलं की 
नापास होणार्‍या 
त्या विद्यार्थ्यांनाही आशा असते 
पास होण्याची 
अकस्मात 
चुकून 
अपघातानेही  

तस तुझ्याकडे येण्यासाठी 
गुरुपायी स्थिरावण्यासाठी 
कोणती परीक्षा असते  
हेही मला माहीत नव्हते .
आणि आपण करतो आहोत तो  
अभ्यास आहे की परीक्षा आहे 
हेही कळत नव्हते.
पण तरीही आपण कुठेच नाही 
हे जाणवत होते 
किंबहुना आपली 
अडलेली अडकलेली 
गती डाचत होती.
मुळात आपण 
सुरुवात केली आहे की नाही 
वा कुठल्या गाडीत आहोत की नाही 
तेही माहित नव्हतं

थोडक्यात आपल्या मनासारख
काहीच होत नाही हे पाहून 
अथवा बरोबरीच्या लोकांची
होत असलेली 
तथाकथित प्रगती पाहून 
ईर्षेने जळून जाऊन 
केलेली प्रार्थना 
फळत नाही हे बघून 
मनात उमटलेला संताप 
आला असावा उफाळून.

काय असेल ते असो 

पण दोर तुटलेल्या 
कोंडाण्याच्या कड्यावर 
उभ्या असलेल्या 
मावळ्या सारखी 
माझी स्थिती झाली होती 
मेलेला तानाजी हि मीच होतो 
चिडलेला सूर्याजीही मीच होतो 
आणि अडलेला मावळाही मी होतो 
आता लढण्या शिवाय 
दुसरा मार्गच नव्हता

मग पुन्हा तलवार उपसली 
पुन्हा स्तोत्र उमटली 
पुन्हा जपमाळ घेतली 
ढाल पुढे सरसावली
हरहर महादेवाची गर्जना केली 
आवळून तुला साद घातली

पण  एवढं नक्की की
आता लढाई खूपच बदलली होती.

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

मावूली


माऊलीच्या दारी
*********
माऊलीच्या दारी 
खेळे जन्मभरी 
ग्रंथ ज्ञानेश्वरी 
घेऊनिया ॥

कृपे कोसळल्या 
अमृताच्या धारा 
भिजलो दातारा 
चिंब तया ॥

वेचियले कण 
इवल्या हातानं
आणि सांभाळून 
ठेवियले ॥

कृषक मी नाही 
मोती पिकविता 
जगास या देता 
तयातून ॥

बलहीन बाळ 
खेळे अंगणात 
आनंदे नाचत 
वर्षावात ॥

पाहते माऊली
परि कौतुकाने 
होतो आनंदाने 
धुंद मनी  

विक्रांत लेकरू 
शब्द  सौदर्यात
मग्न खेळण्यात
आई सवे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, १२ मे, २०२१

पाय घसरता.

पाय घसरता
*********

पुन्हा पाय घसरला
पुन्हा पाय मोडला
होय तस वय झालंय 
अन वजनही वाढलय
हे हि  खरं आहे.

पण बघताच येत नाही 
अजून नीट वळून
कोण जातंय कुठून
ओळखीचं अनोळखीचं
नाहीच येत कळून
तसा चश्माचा प्रॉब्लेम तर 
आहेच सोबत अजून 

पण आता विचारू नका 
कुणाकडे बघत होता म्हणून 
झालय बायकोन विचारून 
(अन् असं  सांगतो का कोण
कुणाला हरिश्चंद्र होवून )

पण तशी मजाही असते काही
या घसरण्यात
विचारणारे भेटतात 
सावरणारे भेटतात 
सल्ले देणारे भेटतात 
मुरगळा काढणारे सुद्धा भेटतात

पण ज्याच्या मुळे घसरलो 
ते काही केल्या नाही भेटत .
नाही . .
जाब नसतो विसरायचा
वा शोध घ्यायचा कारणाचा
माहित आहे हे नेहमीचे
फळ धांदरट पणाचे
जमलच तर फक्त 
एक निरोप 
असतो द्यायचा 
.
.
.
तोच तो हो
पायरी नीट करायचा .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘






 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...