रविवार, २५ एप्रिल, २०२१

एक्सपिरिअन्स (अनुभवणे)

अनुभवणे
********:
आता प्रेम पुरे झाले 
भेटणे बिटणे पाहिजे सरले 
अरे घरच्यांना आहे संशयाने घेरले 
म्हटली ती त्याला 
अन तिने त्याचा अखेरचा निरोप घेतला 
ओके म्हणाला तोही तिला 
अन त्याने आपला रस्ता धरला 

किती सहज संपली ती कथा 
जसा की  पायातून सहज निघावा काटा 
मग ती गेली नाचतच घरी 
तोही परतला निमूटपणे आपल्या दारी 

मग जे घडले ते काय होते 
जणू काही मनाची खेळणे होते 
किंवा अतृप्त अनुभूतीचे 
पुन्हा उगवून येणे होते 

ते भेटणे ते बोलणे 
रुसणे आणि रागावणे 
ते मिठीत बहरणे 
ते ओठांचे थरथरणे 
ते होते का 
so called experience  घेणे
अनुभवामधून जाणे ?

मदिरेचा कैफ असतो तरी कसा ?
गांजा डोक्यात भिनतो तरी कसा ?
स्वप्ने अफुची कशी बरी सुखावतात ?
गर्द हशिम रंगात कुठल्या घेऊन जातात ?
तसेच काही असावे हे अनुभवणे 
तिचे अन त्याचेही 

एकदा नशा केल्यावर 
त्याची लत लागतेच असेही नाही 
अन समाजाची घरादाराची 
बंधनेही असतातच काही 
नशेसाठी असावी लागते 
एक बेदरकार हिंमतही 
कुठल्या लैला मजनू सारखी 
हिर रांजा सारखी 
ती नव्हतीच
त्याच्यातही अन तिच्यातही.


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

आई


आई
****
तळपते उन असो वा 
कडाक्याची थंडी
सदैव आपल्या कामामध्ये 
हरवून गेली असे ती
लागेल ऊन फाटेल कांती 
तिला मुळी क्षिती नव्हती

किती वेगळी होती ती 
काय म्हणू तिला न कळे 
वेरूळातील सुंदर लेणे 
लोकगीत वा कुणी गायले 
गर्द हिरव्या रानातील 
अनाम फुल वा गंध भारले

खळखळत्या झर्‍यासारखे 
तिचे निर्मळ सरळ बोल 
मृदगंधाने मोहरलेली 
तिच्या शब्दामधील ओल 
नव्हता गर्व अहंकार 
पण करारी स्वाभिमान 
जनप्रिय ती मन मोकळी 
छक्के पंजे या जगताचे 
ठावुक असूनी ठावूक नसली

अशी माऊली जगावेगळी 
कणखर शीतल साधी सावळी 
होती जणू माझ्या जीवनी
आनंदाचा मेघच बनली 

गेला वर्षा ऋतु बरसून
जीवन सारे आले उमलून 
वाहू म्हणतो तिला सुमन
हरवून गेले परी ते चरण

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

दत्त सोन्याचा

दत्त सोन्याचा
**********
दत्त सोन्याचा सोन्याचा 
रत्न जडित रूपाचा ।
करी संहार तमाचा 
वर्ण सहस्त्र रश्मीचा ॥

दत्त पितळ तांब्याचा 
जरी एकाच साच्याचा ।
प्रिय आत्मकाम असे 
जणू प्रत्येक घराचा ॥

दत्त पाषाण अश्माचा 
कोणी कोरल्या हाताचा ।
स्त्रोत अखंड ऊर्जेचा 
लाख भक्तांच्या भेटीचा॥

दत्त मातीचा मातीचा 
अंग सुरेख रंगाचा ।
काच घरात ठेवला 
ठेवा कुणाच्या सौख्याचा ॥

दत्त मनाचा मनाचा 
द्वैत अद्वैत रसाचा ।
नाद ओंकार गुंजतो 
होतं स्पंद जगताचा ॥

दत्त पाहियेला ऐसा 
भाव भक्तीत नटला ।
देखे विक्रांत कौतुके
चित्ती दृढ ठसावला ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

साकडे

साकडे
******

पाहणे पाहणार्‍या सोडून गेले आहे 
किनारे पाणीयाने ओढून नेले आहे ॥
उद्ध्वस्त घाट सारे उध्वस्त मंदिरे ही 
लापता देव हे पुजाऱ्यासह झाले आहे ॥

आता या जगाचे करू तरी काय मी 
वाटोळेच पूजणाऱ्या मनाचे झाले आहे ॥
हे दुःख आसमंती आकाश व्यापलेले 
वणव्याचीच वस्ती हे शहर झाली आहे ॥

आक्रोश हे कुणाचे या कानात साचलेले 
का अंतर रुदनाचे गर्भागार झाले आहे ॥
विरतात हाका इथे कानात येण्याआधी 
पाहून वेदनांना पाषाण वितळले आहे ॥

हा अंत जगाचा नाही जाणती शहाणे ते
सुटून हात तयांचे जे विषण झाले आहे ॥
हा न्याय वर्तुळाचा जागेवरी यावयाचा  
ते दीर्घ लघु कुणी रे व्यास मोजले आहे ॥

पडणार वीज कुठे कळते ना कुणास
जग सारेच प्रार्थनेचे हात झाले आहे  ॥
विक्रांता कोडे तेच जगण्या नि मरण्याचे 
कळण्यास साकडे दत्तास घातले आहे॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

वाट

वाट
****
वाट चालूनी 
थकली 
चाल पायात
निजली 

चढ-उतार 
ते किती 
मागे पडली
वस्ती 

कधी घाटाची
वळणे
कधी पथाचे
तुटणे 

कुठे चालली  
कशाला 
नसे ठाव ची 
कुणाला 

प्रश्न उत्तर
नसले
दाही दिशांना
सांडले

जग दाटले
तिच्यात
खीळ तरीही 
पायात

देह अडली 
इथली 
नच  उरली
तिथली 

वने बांधून 
घेतली 
गावे  पालथी
घातली

शोध तरीही 
नव्याचा 
कुणासाठी तो
आजचा

आस व्याकूळ 
मनात
आशा उसनी 
डोळ्यात
 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

येई रामचंद्रा

येई रामचंद्रा
**********

येई रामचंद्रा 
पतित पावना 
रिपु या मर्दना 
छद्मचारी ॥१॥

डोळीया दिसेना
हातास येईना 
मारता मरेना 
काही केल्या ॥२॥

हतबल प्रजा 
हतबल राजा 
गुन्ह्याविन सजा 
पामरांना ॥३॥

गांजली धरती 
तिर्थक्षेत्र ओस
मरण हौदोस
ठायी ठायी ॥४॥

म्हणती कोरोना 
शब्द मुकुटाचा 
परी करूणेचा
लेश नाही॥५॥

झुंजती लेकरे 
मरती लेकरे 
लवकरी ये रे 
पद्मनाभा ॥६॥

दिनांचा दयाळू 
सदा लोकपाळू
कृपा आळुमाळू 
देई गा बा ॥७॥

सरू दे संकट 
विश्वाचे विकट
मागतो विक्रांत 
तुज देवा ॥८॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

पुस्तक

पुस्तक
******

पान उलटते 
जीणे सरकते 
जीवन पुस्तक 
एक असते ॥

आपुल्या रिती
लिहते नियती
काही लावून
मागील संगती ॥

नवीन पानात 
नवीन घटना 
नवीन पात्रांची 
नवीन रचना ॥

प्रकाश पडला 
म्हणून आजचे 
जाताच तमात 
होते कालचे ॥

ग्रंथ केवढा नि
कितीक लिहणे
कुणा न ठावे
चालेल वाचणे ॥

आणि वाचक 
काळ भुकेला 
थांबेना मुळी 
वाचत चालला ॥

पुन्हा वाचणे 
पान उलटणे 
कोण ठरविते 
कोण जाणे ॥

****
होवून पोथी
पडलो पदी
दत्ता स्मरती
साथी संगती॥

बरे विक्रांता 
छंद लागला 
दत्त भजनी 
जीव रंगला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘४७

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...