बुधवार, २१ एप्रिल, २०२१

येई रामचंद्रा

येई रामचंद्रा
**********

येई रामचंद्रा 
पतित पावना 
रिपु या मर्दना 
छद्मचारी ॥१॥

डोळीया दिसेना
हातास येईना 
मारता मरेना 
काही केल्या ॥२॥

हतबल प्रजा 
हतबल राजा 
गुन्ह्याविन सजा 
पामरांना ॥३॥

गांजली धरती 
तिर्थक्षेत्र ओस
मरण हौदोस
ठायी ठायी ॥४॥

म्हणती कोरोना 
शब्द मुकुटाचा 
परी करूणेचा
लेश नाही॥५॥

झुंजती लेकरे 
मरती लेकरे 
लवकरी ये रे 
पद्मनाभा ॥६॥

दिनांचा दयाळू 
सदा लोकपाळू
कृपा आळुमाळू 
देई गा बा ॥७॥

सरू दे संकट 
विश्वाचे विकट
मागतो विक्रांत 
तुज देवा ॥८॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

पुस्तक

पुस्तक
******

पान उलटते 
जीणे सरकते 
जीवन पुस्तक 
एक असते ॥

आपुल्या रिती
लिहते नियती
काही लावून
मागील संगती ॥

नवीन पानात 
नवीन घटना 
नवीन पात्रांची 
नवीन रचना ॥

प्रकाश पडला 
म्हणून आजचे 
जाताच तमात 
होते कालचे ॥

ग्रंथ केवढा नि
कितीक लिहणे
कुणा न ठावे
चालेल वाचणे ॥

आणि वाचक 
काळ भुकेला 
थांबेना मुळी 
वाचत चालला ॥

पुन्हा वाचणे 
पान उलटणे 
कोण ठरविते 
कोण जाणे ॥

****
होवून पोथी
पडलो पदी
दत्ता स्मरती
साथी संगती॥

बरे विक्रांता 
छंद लागला 
दत्त भजनी 
जीव रंगला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘४७

येणे जाणे

येणे जाणे
*******

तुझे येण्याविन येणे
तुझे जाण्याविन जाणे

तुझे असणे नसणे
मनी जागवते गाणे 

काळ मिटलेली स्पप्ने
तरी हृदयी तराने 

माझे मजला कळते 
माझी नच मी उरते 

तुला डोळी साठवुन 
जाते तुझीच होवून

शब्द असतात काही 
रूप डोळीयाच्या डोही

जीव  क्षणी शांत होतो
पुन्हा विरही झुरतो

देही असुनी विदेही 
नाव प्रीतीस या नाही 

वाटे जावे हरवून
काळ्या डोहात बुडून

तुझे येणे खरे नाही 
तुझे जाणे खोटे नाही

दृश्य भास प्रकाश ही
मज कळत का नाही

माझे तुझ्यात असणे
सवे तुझ्या हे जगणे

देह शब्दांची मिळणी 
हि तो द्वैताची खेळणी 
***
भक्ती विक्रांता भेटली
राधा राणीच्या पावुली

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, १८ एप्रिल, २०२१

दत्ता वाचून


दत्ता वाचून 
*******

दत्ता वाचून काहीही 
भजू नको माझ्या मना
सोड सारी स्वप्ने खोटी
सोड सार्‍या रे कल्पना ॥

दुनिया सारी क्षणिक 
जगणे आहे मायिक 
त्यात गुंतून वाहता 
जगणे होईल धिक् ॥

जसे होईल तसे रे
तुवा करावे साधन 
बघ भेटत जाईल 
पुढचे मार्गदर्शन ॥

शोधेल तया भेटेल 
मागेल तया मिळेल 
सुत्र हे तो सनातन 
बघ तुजला कळेल.॥

दत्तासी शरण आला
अन जन्म फुका गेला
बघ जगती विक्रांता 
कुणीच नाही दिसला ॥

एका दत्ता ठेवि चित्ती
दत्ताधिन करी वृती
हरतील क्लेश सारे 
उपजता मनी भक्ती॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘







शनिवार, १७ एप्रिल, २०२१

शब्द पडीक


शब्द पडीक
********

शब्दातला पडीक मी 
शब्दामध्येच जगतो 
शब्दातून हिंडतो मी 
शब्द उरात पेरतो 

प्रतिभेचा दावा नाही
अभ्यासी आवड नाही 
या शब्दांनी सुखावतो
शब्द श्री चा राव नाही 

शब्द प्रेमी मित्र माझे 
शब्दांच्याच नात्यातले
असेच हे खुळावले 
गडी याच खेळातले 

शब्दांचा मी ऋणी सदा 
त्यांनी नवजन्म दिला 
सुंदर करूनी जग 
जगण्याला अर्थ दिला 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘


शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

काच

काच
****

फुटलीच काच अंती
फुटणार बघ होती 
विझलीच बघ अंती 
विझणार आग होती 

हा खेळ चाललेला 
घडण्या नि मोडण्याचा 
असे अंतहीन किंवा 
एकाच अरे क्षणाचा 

घडणे हे मोडणेच 
मोडे तेही अखंडीत
भ्रम दाटले मनात 
उगा वाहती जगात

बाप दत्त असे स्पष्ट 
भरला कणाकणात
वेड कुठल्या खुळ्याच 
शोधे ब्रह्म आरशात 

क्षण पुसे काळ होई
दिसतात लक्ष युग
विक्रांते जाणली मेख
हरपले  सारे जग


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

दत्त कृपेने धन

दत्त कृपेने धन
***********

दत्त कृपेने धन येते 
दत्त कृपेने धन जाते ॥

आलो होतो रित्या हाताने 
जाणारही ना रित्या हाताने ॥

तर मग तृष्णा कुठून येते 
धन हरवता रडू  का येते ॥

सारे काही दत्ता दिधले 
आता माझे काही उरले ॥

खाणे बोलणे कुणी भेटणे
सुख दुःख नाही मध्ये वर्तने॥

माझे काहीच नाही इथले 
प्रारब्ध ही मी तया वाहिले ॥

मर्जी तयाची तर भोगतो 
मर्जी तयाची तो बदलतो ॥

दत्त चरणी मस्त मजेने 
प्रेम भारले म्हणतो गाणे ॥

दत्त कृपेचा वाहतो वारा 
म्हणे विक्रांत शीड उभारा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...