गुरुवार, ४ मार्च, २०२१

दत्त अवतार

  दत्त अवतार
***********
दत्त माझा भाव 
दत्त माझा देव 
जीवीचा या जीव 
दत्त माझा  ॥

दत्त माझा स्वामी 
श्रीनृसिंह मुनी 
श्रीपाद होवूनी
लीला दावी ॥

दत्त अक्कलकोटी 
असे स्वामी रुपी
मज भवतापी  
आश्वासितो॥

दत्त दिगंबर 
शेगांवी नांदतो
हाकेला धावतो 
सदोदित ॥ 

शंकर माणीक 
अन टेंबे स्वामी
दत्तची होवूनी
ह्रदयात॥

धन्य अवतार 
जितुके प्रभूचे 
मज प्रिय साचे 
तितुकेही॥

विक्रांत तयांच्या  
दासांचाही दास
पावुलांची आस 
मनी वाही॥

******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, ३ मार्च, २०२१

आई


आई
*****
माय सुखाचा सागर 
सदा प्रेमे ओथंबला  
लाटा क्षणात उदंड 
मिती नाही गं तयाला 

जन्म जोजावणे सारा
तळ हाताचा गं झुला  
किती जपले जिवाला 
सडा प्राजक्त वेचला 

घास प्रेमे भरविले 
रस  सजीव तू केले 
अष्ट प्रहर भोगले 
तुझ्या कौतुकाचे लळे

माझे भाग्य विनटले 
तुझे लेकरू मी झाले 
तुझा पदराची छाया 
स्वर्ग सुख दुणावले 

कशी होऊ उतराई  
तुकी काहीच नाही 
पंच प्राणांच्या दीपकी
तुज ओवाळते आई  

( विनटले= रंगणे .मग्न होणे,
दुणावले =दुप्पट झाले,
तुकी =तुलना)


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, १ मार्च, २०२१

पाहता गणपती

पाहता गणपती
*********
सुख वाटे किती किती 
पाहता श्री गणपती 
आनंदाने पाणावती 
झरतात नेत्रपाती ॥

सर्व सुखाचा हा दाता 
सदा संभाळतो भक्ता 
विघ्न कल्लोळी कैवारी 
नेतो धरुनिया हाता ॥

चार दुर्वांकुरे तया 
एक फुल जास्वंदाचे 
भावभक्तीने वाहता 
मानी ऋण त्या जीवाचे ॥

स्वामी सिद्धींचा सकळ 
वाट पाहतो भक्तांची 
रिद्धी अपार अनंत 
वांच्छा तयास देण्याची ॥

दास दत्ताचा विक्रांत 
तया ह्रदयी धरीतो 
किती दिलेत हो स्वामी 
कृपे अनंत नमितो॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

प्रसाद

प्रसाद
*****

मिळाला प्रसाद 
दत्ताच्या दारात 
शुभ आशीर्वाद 
कृपा कर ॥१॥

कृष्णावेणी तीरी
पाहिली श्री मूर्ती  
आनंदली वृत्ती 
मनोहर ॥२॥

वाहिले सुमन 
प्रसाद सुमन 
कृतार्थ जीवन 
सुमनाचे ॥३॥

अथांग अपार 
माईचा तो तीर 
सुवर्ण संभार 
रवी करे ॥४॥

चैतन्य दाटले 
देहाच्या खोळीत
श्रीदत्त कृपेत 
भिजलेले ॥५॥

निमाला विक्रांत
क्षण चौकटीत 
बहू ऋणाईत 
सखयांनो ॥ ६॥
*******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

हस्तांतरण


हस्तांतरण
*******
हे गूढ निर्मितीचे 
हस्तांतरण जीवनाचे 
जीवाकडून जीवाकडे 
आहे युगायुगांचे 

हि साखळी अमरत्वाची 
देहावाचून वहायाची 
सोडूनही देहास या 
देहपणी मिरवायची 

नसेल तेव्हाही मी 
अरे असेलच रे मी 
सांगतो बजावूनी 
जणू मलाच की मी 

बाप जगतो मुलांमध्ये 
आहे कुठे वाचलेले 
हे ज्ञान गुणसुत्रातले 
राहते इथे साचले 

पुन्हा मी पुन्हा मी 
येतच राहतो मी 
पुन्हा पुन्हा नवेपणानी
पुन्हा जीर्ण होऊनी

*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

स्वातंत्रवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर
*****************

शिवबाच्या तलवारीचे तेज होते 
स्वातंत्र्यवीर सावरकर 
तिला माहीत नव्हती माघार 
तिला माहीत नव्हती हार 
तिला फक्त माहित होते लढणे 
सर्वस्व पणाला लावून 
शत्रूवर तुटून पडणे.

तिच्या घणाघाती घावांनी 
हादरून टाकले होते आंग्लभूमीला 
तिचा खणखणाट घाबरत होता 
कृत्रिम पुरोगामित्वाला
तेथे नव्हते लपने-छपने 
राजकीय खेळ खेळणे 
पदासाठी गादीसाठी स्वार्थासाठी 
स्वतःला हिरव्या रंगात रंगून घेणे 
म्यानात गपचूप लपून बसणे.

भरमध्यांनी आकाशात तळपणार्‍या 
सूर्याचे तेज होते 
स्वातंत्र्यवीर सावरकर 
जे व्यापून  घेत होते 
सारे आकाश 
दिगंतापर्यंत पसरत होता 
त्याचा प्रकाश 
दिवा भितांना ते 
कधीच कळले नाहीत 
काळोख्या खोबणीत 
तोंड लपवून बसणाऱ्या 
निशाचारांना 
ते कधीच दिसले नाहीत.

राष्ट्रदेवते पुढे अखंड पेटलेल्या 
धूनीतील अंगार होते सावरकर 
आणि त्या धूनीत पडत होती 
आहुती 
देहाची मनाची घराची दाराची 
बंधूंची पत्नीची सर्वस्वाची 
स्वातंत्रा आधीही 
आणि स्वातंत्र्यानंतरही 

निरपेक्ष निरामय 
कुठलीही लांछन नसलेली 
काळीमा नसलेली धूर नसलेली
ही धूनी विटाळण्याचा विझवण्याचा 
प्रयत्न केला अनेक स्वार्थी लोकांनी
आणि संधिसाधू नतद्रष्टांनी  
त्यांचे हात भाजले 
त्यांची वस्त्रे जळाले
आणि ती लपून बसले 
आपापल्या  ढोलीत 
तोंड लपवित 
अन मेले विस्मृतीत.

भगवान शंकराच्या 
तिसऱ्या डोळ्यांतील 
साक्षात अग्नी होते 
स्वातंत्र्यवीर सावरकर  
जहाल भेदक कठोर 
इथे नव्हती जागा  
माया मोह ममतेला 
स्वत: च्या जगातील 
इवलाल्या स्वार्थांना 
तिला नको होते 
ताम्रपत्र मानपत्र सन्मान  
ती आग जाळत होती
अनार्य असत्य आणि मालिन्य 
पसरलेले या भूमीवर सतत  

ती आग अजूनही विझली नाही
ते तेज अजुनही मावळले नाही
ते आहे विद्यमान हजारो लाखो  
डोळस विवेकी धीर अन 
दूरदृष्टी असलेल्या हृदयात  

त्या प्रकाश वृक्षाचे 
हजारो लाखो अग्निकण
येऊन पडले आहेत 
आमच्या मनात काळजात रक्तात  
जे देत राहील आम्हाला 
सदैव धैर्य  प्रेरणा आश्वासन
निराशेच्या प्रत्येक क्षणी
पेटून धडाडून आतून 
हे महापुरुषा 
हे पुण्यपुरूषा 
हे आमच्यातील अंशा 
तुम्हास कोटी कोटी अभिवंदन

********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********



गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

चकवा

चकवा 
******
आशा अनंत घेऊन 
तुझ्या रानात हिंडलो 
वृक्ष विविध पाहूनी 
तया सुखे हरवलो ॥१

कधी सावली कुणाची
मज  फार आवडली   
फळे रुचिर कुठली
बहू  प्रेमाने चाखली ॥२

किती रंग उधळणं 
किती ऋतूंचे सोहळे  
किती काळ गमावला  
भान नाहीच उरले ॥३

याद आली अचानक 
मग रानच्या राव्याची 
केला आटापिटा सारा 
वांच्छा जया भेटण्याची ॥४

चित्त भरले ग्लानीने 
असे कसे हे घडले 
मन वाटवधे झाले 
मज लुबाडून गेले ॥५

आता घालतो मी साद 
प्राण शब्दात ओतून 
येई जीवलगा येई 
मज जाई गा घेवून॥६

मन बेरकी बहूत 
मज भरवसा नाही 
काय चकव्यात जीव 
पुन्हा पडणार नाही॥७

उभा ठायीच मी आता 
सारा सोडून देखावा 
कधी भेटेल श्रीदत्त
माझा प्राणाचा विसावा ॥८

******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...